आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस इथल्या दोन नव्या विभागांचे आणि केंद्रांचे उद्घाटन
नवीन विभाग आणि संशोधन केंद्रे विविध लोकसंख्या गटांच्या कल्याणावर आणि बिग डेटा विश्लेषणाच्या नवीन पद्धतींवर लक्ष केंद्रित करतील
Posted On:
20 FEB 2022 7:22PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज मुंबईतल्या देवनार येथे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS-आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान केंद्र ) येथे दोन नवीन विभाग आणि दोन नवीन संशोधन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. 'डिपार्टमेंट ऑफ सर्वे रिसर्च अँड डेटा अनॅलिटीक्स (सर्वेक्षण संशोधन आणि डेटा विश्लेषण विभाग)' आणि डिपार्टमेंट ऑफ फॅमिली अँड जनरेशन्स ('कुटुंब आणि पिढ्या विभाग)' हे आज उद्घाटन झालेले विभाग आहेत. तर ‘सेंटर ऑफ डेमोग्राफी ऑफ जेंडर(लिंग लोकसंख्याशास्त्र केंद्र)’ आणि ‘सेंटर फॉर एजिंग स्टडीज(वृद्धत्व अभ्यास केंद्र)’ ही आज उदघाटन झालेली केंद्र आहेत.

नवीन विभाग आणि केंद्रे भारतीय संस्थांना जागतिक स्तरावर नेण्याच्या आणि देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून काम करतील. या नवीन विभागांचे आणि संशोधन केंद्रांचे उद्दिष्ट मुली, महिला आणि वृद्ध लोकांचे कल्याण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2021 पासून या विभागांना आणि आयआयपीएस केंद्रांना (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस) मान्यता दिली होती.
भारताची लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी प्रचंड आहे आणि त्यामुळे डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून हा प्रचंड डेटा आपण मेटाडेटामध्ये समक्रमित करू शकू, असे मांडवीया यांनी आज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले. या डेटाचे विस्तृत विश्लेषण करण्याची आणि या डेटावर अहवाल तयार करण्याची क्षमता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसमध्ये असून केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी ते उपयुक्त ठरेल, असा विश्वास मांडवीया यांनी व्यक्त केला.
डॉ. भारती पवार यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले. भारताला आत्मनिर्भर करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आयआयपीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आयआयपीएसद्वारे निर्मित डेटा धोरण कर्त्यांना,धोरण तयार करण्यात मदत करतो,असे त्यांनी सांगितले. काही जिल्हे आणि परिसरात अधिक काम करण्याची गरज राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या डेटामधून दिसून आल्याची माहिती डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

सर्वेक्षण संशोधन आणि डेटा विश्लेषण विभाग: हा विभाग डेटा संकलनाच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी आहे. बिग डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांची क्षमता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. घरगुती सर्वेक्षणांमध्ये संकलित केलेल्या डेटाच्या गुणवत्तेचे परीक्षण आणि सुनिश्चिती करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर शास्त्रीय तंत्रे विकसित करण्याकडे विभाग लक्ष पुरवेल भारतासमोरील प्रमुख समस्या समजून घेण्यासाठी मशीन लर्निंग आणि स्थलविशिष्ठ विश्लेषण यांचे उपयोजन केले जाऊ शकते. सर्वेक्षण संशोधन आणि डेटा विश्लेषणाशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी विभाग योगदान देऊ शकेल.
कुटुंब आणि पिढ्या विभाग : हा विभाग बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धावस्थेतील जीवनक्रमातील बदल समजून घेण्यासाठी आहे.संपूर्ण जगभरात आणि भारतामध्ये होत असलेल्या वय-संरचनात्मक संक्रमणासंदर्भात आणि त्याच्या सामाजिक-आर्थिक परिणामांवर हा विभाग लक्ष केंद्रित करेल.त्याद्वारे हा विभाग भारत सरकारने वेळोवेळी अंमलबजावणी केलेल्या लोकसंख्या आणि सामाजिक कल्याण धोरणांचे मूल्यमापन करेल. जीवनक्रमाच्या विविध टप्प्यांवर आरोग्य आणि निरामयता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आणि लोकसंख्येच्या विविध घटकांसाठी कल्याणकारी धोरणे अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्याच्या अनुषंगाने हा विभाग योगदान देईल.
लिंगात्मक लोकसंख्याशास्त्र केंद्र : भारतात आणि परदेशात, लोकसंख्या, आरोग्य आणि विकासाशी संबंधित विविध पैलूंवर आधारित उच्च गुणवत्तेचे आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि अनुभवजन्य संशोधन करण्यासाठी हे केंद्र आहे. विविध हितसंबंधीतांच्या गरजेनुसार लिंग संबंधित अभ्यासक्रम विकसित करणे आणि अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या अनुरूप क्षमता बांधणी करणे हा देखील नवीन केंद्राचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.वेळोवेळी योग्य धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासकीय संस्थांना वेळेवर धोरण साहाय्य प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. मुलींचे अस्तित्व, शालेय शिक्षण, सुरक्षितता इत्यादी तसेच भारतातील महिलांचे आरोग्य आणि निरामयता चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी,वेगवेगळ्या लिंगाच्या लोकांसाठी कल्याणकारी धोरणांची उत्तम रचना करण्यासाठी या केंद्राचे योगदान अपेक्षित आहे.
वृद्धत्व अभ्यास केंद्र : भारतातील वृद्ध लोकसंख्या सामना करत असलेल्या समकालीन सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि सार्वजनिक आरोग्य समस्यांवर आधारित वैज्ञानिक माहिती संकलित करणे आणि ही माहिती संशोधन समुदाय आणि धोरणकर्त्यांना प्रसारित करणे, भारतातील सरकारांना आणि स्वयंसेवी संस्थांसह इतर संस्थांना, अनुभवावर आधारित पुरावे आणि वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित पैलूंवर सल्ला देणे आणि भारतात वृद्धांसाठी सुरु असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमांचे आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे निरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी हे केंद्र आहे. वृद्ध नागरिकांसाठीची दीर्घकालीन देखभाल प्रणाली चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, वृद्धत्व संबंधित धोरणे आणि वृद्धांसाठी कल्याणकारी कार्यक्रम सुचवण्यासाठी हे केंद्र योगदान देईल.
येथे आयआयपीएसच्या नवीन विभाग आणि केंद्रांबद्दल इथे अधिक जाणून घ्या.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था (आयआयपीएस) ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त जागतिक मान्यता असलेली एक प्रमुख शिक्षण आणि संशोधन संस्था आहे.देशातील सर्वेक्षण संशोधन आणि माहिती विश्लेषणामध्ये आघाडीवर असलेली ही संस्था राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचही फेऱ्या आयोजित करणारी मध्यवर्ती संस्था आहे.
***
N.Chitale/S.Kakade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799888)
Visitor Counter : 269