रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मुंबईत आरसीएफ ट्रॉम्बे युनिट येथे ‘नॅनो युरिया प्रकल्प’ आणि ‘फॉस्फेट समृद्ध सेंद्रिय खत  (PROM)-शीतला’ प्रकल्पाची पायाभरणी केली


नॅनो युरिया हे एक क्रांतिकारी उत्पादन आहे जे  युरियाचा वापर 50 टक्क्यांपर्यंत कमी करून मातीचा कस जपण्यात मदत करेल

Posted On: 19 FEB 2022 9:44PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज मुंबईतील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स ट्रॉम्बे युनिट येथे नॅनो युरिया प्रकल्पआणि फॉस्फेट समृद्ध सेंद्रिय खत (प्रॉम)-शीतलाप्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी आरोग्य आणि  कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार देखील  उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि डॉ.भारती प्रवीण पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून दौऱ्याचा प्रारंभ केला.

सुविधांचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, प्रस्तावित नॅनो-युरिया संयंत्राचा अंदाजे प्रकल्प खर्च  150 कोटी रुपये आहे.  ते म्हणाले की , ‘आरसीएफ मधील प्रस्तावित संयंत्राची क्षमता दररोज 1.5 लाख बाटल्या (500 मिली ) आहे आणि शेतकऱ्यांची भविष्यातील मागणी पूर्ण करू शकेल. हा प्रकल्प एका वर्षात कार्यान्वित होईल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, आरसीएफ द्वारे उत्पादित नॅनो-युरिया एका वर्षात 20 लाख मेट्रिक टन पारंपरिक युरियाचे स्थान घेईल , असेही ते म्हणाले.

नॅनो-युरिया प्रकल्पाचा उद्देश सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित  करताना भावी  पिढ्यांसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवणे हा आहे. नॅनो युरिया हे एक क्रांतिकारी उत्पादन आहे जे  युरियाचा वापर 50 टक्क्यांपर्यंत कमी करून मातीचा कस जपण्यात मदत करेल. हा प्रकल्प मेसर्स आयएफएफसीओने(इफको) विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी कृषी क्षेत्रात पारंपरिक खतांना पर्याय म्हणून नॅनो खताचा वापर करण्याची भूमिका मांडली.  ते म्हणाले की, पारंपरिक युरियाचा माती आणि पिकांवर विपरित परिणाम होतो, त्यामुळे शेतकरी आजकाल मातीला  अनुकूल असणाऱ्या  नॅनो खतांचा वापर करण्यास प्राधान्य देतात.

जेव्हा द्रवरूप नॅनो युरियाची पानांवर फवारणी केली जाते तेव्हा ते वनस्पतींद्वारे अधिक प्रभावीपणे शोषले जाते ज्यामुळे पारंपरिक यूरियाच्या बाबतीत गळून निघून जाणे (लीच)आणि/किंवा पाणी धरून ठेवण्याच्या प्रवृत्ती मुळे होणारे नुकसान टाळले जाते.

केंद्रीय मंत्री डॉ. मांडविया पुढे म्हणाले की, येथे कार्यान्वित होणारे फॉस्फरस अधिक प्रमाणात असलेले जैविक खत (पीआरओएम PROM) तयार करणारे खतांचे  युनिट असुरक्षित खतांचा वापर कमी करण्यास मदत करेल.  प्रस्तावित फॉस्फेट रिच ऑरगॅनिक खत (PROM)- शीतला प्लांटची क्षमता 6,000 MTPA असण्याचा अंदाज आहे.

शीतला प्रोम हे रॉक फॉस्फेटच्या सह-कंपोस्टिंगद्वारे तयार केले जाते आणि रासायनिक खतांच्या तुलनेत वनस्पतींना मातीतून फॉस्फरस मिळवण्याचा एक कार्यक्षम मार्ग आहे.  हे उत्पादन सेंद्रिय शेतीसाठी पोषक तत्वांचा एक योग्य स्त्रोत आहे आणि मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारते आणि पीक उत्पादन वाढवते.  शीतला जमिनीतील फायदेशीर सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढवते आणि बुरशी तयार होण्यास मदत करते.

यावेळी  केंद्रीय मंत्र्यांनी आरसीएफने विकसित केलेल्या शहरी बागकामाच्या फ्लोरोला- गार्डनिंग किटचे देखील प्रकाशन केले.

***

S.Patil/S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1799703) Visitor Counter : 223


Read this release in: English