रेल्वे मंत्रालय
ठाणे आणि दिवा यांना जोडणा-या लोहमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन गाड्यांना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
2022-23 च्या केंद्रीय रेल्वे अंदाजपत्रकामध्ये महाराष्ट्रासाटी 11हजार कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद
Posted On:
18 FEB 2022 11:22PM by PIB Mumbai
मुंबई, 18 फेब्रुवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ठाणे आणि दिवा यांना जोडणा-या लोहमार्गाचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे, याचा उल्लेख करून, पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण करून आपल्या भाषणाला प्रारंभ केला. शिवाजी महाराज म्हणजे भारताचे अभिमान, अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचे रक्षक होते, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
ठाणे आणि दिवा यांना जोडणा-या पाचव्या आणि सहाव्या लोहमार्गाबद्दल मुंबईकरांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले, या नवीन रेल्वे मार्गांमुळे सदैव धावत असलेल्या महानगरातल्या रहिवाशांचे जीवन अधिक सुकर होईल. या लोहमार्गामुळे होणारे चार लाभ त्यांनी अधोरेखित केले. प्रथम उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असतील, दुसरे म्हणजे इतर राज्यांमधून येणा-या गाड्यांना उपनगरीय गाडी पुढे जाण्यासाठी थांबावे लागणार नाही. तिसरे म्हणजे मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण ते कुर्ला या विभागामध्ये कोणत्याही अडथळ्याविना धावू शकणार आहेत. तसेच चौथा फायदा म्हणजे कळवा, मुंब्रा भागातल्या प्रवाशांना दर रविवारी मेगाब्लॉकमुळे होणारा त्रास आता बंद होईल. पंतप्रधान म्हणाले, मध्य रेल्वेवरील मार्ग आणि 36 नवीन उपनगरी गाड्यां आता सेवेसाठी असणार आहेत. यापैकी बहुतांश गाड्या वातानुकुलित असणार आहेत. उपनगरी गाड्यांच्या सुविधेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून हे काम केले जात आहे.

स्वतंत्र भारताच्या प्रगतीमध्ये मुंबई महानगराचे योगदान खूप मोठे आहे, याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भातही मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘‘ म्हणूनच आमचे विशेष लक्ष मुंबईमध्ये 21व्या शतकाला अनुरूप पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आहे. ‘‘पंतप्रधान यावेळी म्हणाले, मुंबई उपनगरी रेल्वे यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असल्यामुळे रेल्वे संपर्क व्यवस्थेसाठी हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरांचे अतिरिक्त 400 किलोमीटर क्षेत्र जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच 19 स्थानके आधुनिक सीबीटीसी सिग्नल प्रणालीसारख्या आधुनिक सुविधायुक्त करण्याची योजना आहे.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘अहमदाबात ते मुंबई अशी अतिवेगवान रेल्वे सुरू करणे ही देशाची गरज आहे. यामुळे मुंबई हे स्वप्नांचे महानगर आहे, ही या शहराची ओळख अधिक दृढ होईल. हा प्रकल्प जलदतेने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत, असेही ते म्हणाले.
भारतीय रेल्वेला नवीन चेहरा देण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. ते म्हणाले, गांधीनगर आणि भोपाळ यासारखी आधुनिक स्थानके भारतीय रेल्वेची नवीन ओळख बनत आहेत. आता 6,000 पेक्षाही जास्त रेल्वे स्थानके वायफाय सुविधांनी युक्त आहेत. वंदे भारत गाड्या देशाच्या रेल्वेला नवीन गती आणि आधुनिक सुविधा देत आहेत. आगामी काही वर्षात देशाच्या नागरिकांच्या सेवेत आणखी 400 वंदेभारत गाड्या रूजू होतील, असे त्यांनी सांगितले.
रेल्वेचा कायाकल्प घडवून आणण्यासाठी यंदाच्या रेल्वे अंदाजपत्रकामध्ये विक्रमी निधीची तरतूद करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार व्यक्त करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले की, रेल्वेने 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 11हजार कोटींपेक्षाही जास्त तरतूद केली आहे. रेल्वे मंत्री पुढे म्हणाले की, ठाणे आणि दिवा यांना जोडणा-या या लोहमार्गामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना लाभ होणार आहे. म्हणजेच वर्षाला जवळपास 3.5 कोटी प्रवाशांना लाभ होईल.

या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्रीरावसाहेब दानवे, यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी केली. तसेच ठाणे ते दिवा या धीम्या उपनगरीय गाडीने प्रवास करून प्रवाशांबरोबर संवाद साधला.
कल्याण हे मध्य रेल्वेचे प्रमुख जंक्शन आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून येणा-या गाड्या कल्याण स्थानकावरच विलीन होतात आणि त्यांचा ‘सीएसएमटी’कडे (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) जाण्यासाठी प्रवास सुरू होतो. कल्याण ते सीएसटीएम दरम्यान चार मार्गिकांपैकी दोन मार्गिका धीम्या उपनगरी आणि दोन मार्गिका जलद उपनगरी गाड्यांसाठी, मेल-एक्सप्रेस आणि मालवाहू गाड्यांसाठी वापरण्यात येतात. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करून त्यांच्यासाठी दोन अतिरिक्त मार्गिका बनविण्याची योजना तयार करण्यात आली होती.
ठाणे आणि दिवा यांना जोडणा-या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिकांच्या निर्माणासाठी सुमारे 620 कोटी खर्च करण्यात आले आहेत. आणि त्या मार्गावर 104 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 लहान पूल आहेत. या मार्गामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणारे अडथळे दूर होणार आहेत. या मार्गांमुळे शहरामध्ये नवीन 36 उपनगरीय गाड्या सुरू करता येणार आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799440)
Visitor Counter : 216