वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत – युएई सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारामुळे रत्ने आणि आभूषणे क्षेत्राच्या विकासाला गती मिळेल – केंद्रीय वाणिज्य मंत्री
आपल्याला आभूषणे आणि रत्ने क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज; त्यामुळे यापुढे आपल्या देशांतर्गत आणि निर्यात प्रोत्साहन अशा दोन्ही बाबतीत, आत्मनिर्भरतेवर भर दिला जाणार : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री
आभूषणे आणि रत्ने, हे क्षेत्र ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ब्रॅंड इंडिया’ ची क्षमता तसेच सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक: केंद्रीय मंत्री पियुष गोयल
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, परषोत्तम रूपाला आणि दर्शना जरदोश यांच्या हस्ते संयुक्तपणे “भारतीय आंतरराष्ट्रीय आभूषणे आणि रत्ने प्रदर्शन-2022’ चे आज मुंबईत उद्घाटन
Posted On:
18 FEB 2022 4:36PM by PIB Mumbai
मुंबई, 18 फेब्रुवारी 2022
‘आभूषणे आणि रत्ने’ क्षेत्र, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘ब्रॅंड इंडिया’ या अभियानांची क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध करणारे प्रमुख क्षेत्र आहे, असे मत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. मुंबईत आज, ‘भारतीय आंतरराष्ट्रीय आभूषणे प्रदर्शन- सिग्नेचर 2022’ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत गोयल म्हणाले, की भारताला आपला आभूषणे आणि रत्ने उद्योग आत्मनिर्भर बनवायचा आहे. “आपल्याला आता आत्मनिर्भर आभूषणे आणि रत्ने क्षेत्राची गरज आहे, आणि म्हणूनच आपला देशांतर्गत विकास आणि निर्यात प्रोत्साहन दोन्हीमध्ये या आत्मनिर्भरतेवर भर दिला जाईल.”
केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री परषोत्तम रूपाला आणि रेल्वे, तसेच वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते. रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद (GJEPC) ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
यावेळी बोलतांना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, “जानेवारी 2022 पर्यंतच रत्न आणि आभूषण क्षेत्रातली आपली निर्यात 32 अब्ज डॉलर झालेली आहे, आणि आम्हाला विश्वास आहे, या वर्षी ही निर्यात 40 अब्ज डॉलर इतकी होईल. 2019-20 च्या कोविड काळाच्या तुलनेत, ही जवळपास 6.5% टक्के वाढ असेल, असेही त्यांनी सांगितले.
रत्न आणि आभूषण क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत खांब आहे, असे मंत्री म्हणाले. भारताचा सोने आणि हिऱ्याचा व्यापार सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 7% आहे आणि यात 50 लाख रोजगार आहेत, असे ते म्हणाले. “मला आशा आहे की येणाऱ्या काळात जग भारताच्या आभूषण उद्योगांकडे नजर लावून बसेल, करण भारतातील आभूषणांची शुद्धतेची खात्री असते, पारखलेले असतात आणि त्यांच्या गुणवत्तेची हमी असते, आणि भारतातून काहीही आले तरी त्यावर भारताची छाप असतेच.”
2022 च्या अर्थसंकल्पातील रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठीच्या तरतुदींबद्दलबद्दल बोलताना, वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले, या क्षेत्राच्या वाढीसाठी आणि जागतिक रत्ने आणि आभूषणे व्यापारात भारताचा हिस्सा वाढविण्याचा मार्ग प्रशस्त करण्यात आला आहे. यात कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हीऱ्यांवरचे आयात शुल्क 5% कमी करणे, सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांसाठी ECLGS मार्च 2023 पर्यंत वाढविणे, सोने आयतीसाठी बँक गॅरंटी ऐवजी वैयक्तिक हमी पत्र स्वीकारणे, रत्ने आणि आभूषणे निर्यातीसाठी ई कॉमर्ससाठी आणि छोट्या किरकोळ व्यापऱ्यांना त्यांची उत्पादने विदेशात नेण्यासाठी एक नवीन मुक्त विशेष आर्थिक क्षेत्र धोरण आणि सुलभ नियंत्रक आराखडा, याचा समावेश आहे. “आज झालेला भारत–युएई सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार या क्षेत्रासाठी आणखी एक आनंदाची बाब आहे, ज्याद्वारे रत्ने आणि आभूषण क्षेत्राच्या वाढीला वेग मिळेल,” गोयल म्हणाले.
गोयल म्हणाले की आभूषणे हा भारताचा अंगभूत भाग आहे आणि आजच्या समाजात प्रतिष्ठा आणि शैलीचे प्रतीक बनले आहे. आपल्या इतिहासात अनेक शक्तिशाली रत्नाच्या कथा आढळून येतात. आभूषण बनविण्याची कला भारतीय कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. “ज्या प्रमाणे कवि, कविता लिहितात, तसेच सोनारांनी सोने, चांदी आणि मौल्यवान धातूनच्या तारांनी अनेक आकर्षक कथा लिहिल्या आहेत.”
GJEPC ने दिलेल्या योगदाना बद्दल बोलताना गोयल म्हणले, की कोविडमुळे अर्थव्यवस्थेत अडथळे आलेले असतानाही या परिषदेने आपल्या उद्योजगकतेच्या अंगभूत स्वभावानुसार या संकटाचे संधीत रूपांतर केले. आभासी स्वरूपात व्यापार विषयक कार्यक्रम, विक्रेते आणि खरेदीदार यांच्या बैठका, वेबीनार यामुळे या उद्योग क्षेत्राला अडचणीतून पुनः उसळी घेण्यास मोठी मदत झाली. यामुळे देशांतर्गत विक्री आणि निर्यातीलाही चालना मिळाली असे त्यांनी सांगितले. उत्पादकतेत सुधारणा आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्थापन केलेली सामायिक सुविधा केंद्रे जगासाठी भारतात उत्पादन करण्याचे देशाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साकार करण्यास मोठे योगदान देईल असेही ते म्हणाले.
भारतासाठी उद्दिष्ट निश्चित करत रत्ने आणि आभूषणे क्षेत्रात जागतिक स्तरावर अव्वल स्थान मिळविण्याची हीच योग्य वेळ आहे असे सांगत गोयल यांनी देशांतर्गत आणि निर्यात क्षेत्रातही मोठी उद्दिष्टे ठेवण्याचे आवाहन उद्योजकांना केले. “आपण जागतिक संधींकडे बघायलाच हवं आहे, खरं तर आपण या संधी निर्माणही करायला हव्यात.”
केंद्रीय मंत्री परषोत्तम रूपाला म्हणाले, “आभूषणे आणि रत्ने क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आणण्यास सुरुवात झाली आहे. नवे खाणकाम तंत्रज्ञान देखील या क्षेत्रावर आणि त्याच्या उत्पादनांच्या निर्यातीवर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरेल.”
केंद्रीय राज्यमंत्री जरदोष यांनी 2022 च्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला. देशाच्या निर्यातीत महत्वाची भूमिका बाजवणाऱ्या या क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी उपयुक्त ठरतील, असे त्या म्हणाल्या.
वाणिज्य विभागाचे सहसचिव विपुल बंसल म्हणाले की रत्ने आणि आभूषणे ही सर्वाधिक संघटित शिस्तबद्ध, अत्याधुनिक, एकत्रित स्वरूपाचे व्यापारी क्षेत्र आहे. निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे या क्षेत्राच्या मागण्या प्रभावीपणे आणि सुसंगतपणे सरकार पर्यंत पोहोचविल्या जातात आणि म्हणूनच त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. GJPEPC चे अध्यक्ष कोलिन शाह इतर मान्यवरांसाह या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
DJM/SC/ST/RA/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799289)
Visitor Counter : 217