अणुऊर्जा विभाग
बीएआरसीतर्फे (BARC) तंत्रज्ञान जागरूकता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण बैठकीचे आयोजन, वीस तंत्रज्ञान हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी
Posted On:
15 FEB 2022 4:49PM by PIB Mumbai
मुंबई, 15 फेब्रुवारी 2022
बीएआरसी अर्थात भाभा अणुसंशोधन केंद्राने (BARC) तंत्रज्ञान जागरूकता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण बैठकांच्या मालिकेतील पहिला कार्यक्रम आयोजित केला होता जो भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केला जात आहे. अणुशक्तीनगर येथील डीएई कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान आणि राष्ट्रीय राजधानी विभागातील 50 हून अधिक उद्योगांमधील बीएआरसी टेक्नॉलॉजीजचे अधिकारी आणि परवानाधारक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी वीस तंत्रज्ञान हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे बीएआरसी च्या तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहयोग विभाग (TT&CD) द्वारे नियमित तंत्रज्ञान हस्तांतरणाचा भाग आहेत. अणुऊर्जा आयोगाचे सदस्य आणि मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट चे मानद प्राध्यापक, प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. आर. बी. ग्रोव्हर यांच्या हस्ते तेवीस तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरल्याबद्दल परवानाधारकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव (DAE) के. एन. व्यास यांनी त्यांच्या भाषणात उद्योगांना पुढे येण्याचे आवाहन केले आणि भाभा अणु संशोधन केंद्र, (BARC), राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (RRCAT), इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च (IGCAR) आणि अणुऊर्जा विभागाची अनुदानित संस्था इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (IPR) या अणुऊर्जा विभागाच्या संशोधन आणि विकास केंद्रामध्ये अलीकडेच स्थापन झालेल्या इन्क्युबेशन केंद्रांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. डॉ. आर.बी. ग्रोव्हर यांनी, अणुऊर्जा विभागाने विकसित केलेल्या विविध सहाय्यकारी तंत्रज्ञानाच्या यशस्वी व्यावसायीकरणाचे कौतुक केले आणि नमूद केले की, हे गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे, कारण बीएआरसी आणि इतर अणुऊर्जा विभाग हे देशातील सर्वात श्रीमंत वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ गटांपैकी एक आहेत. अनेक खासगी उद्योगांव्यतिरिक्त अणुऊर्जा विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, न्यूक्लिअर फ्युएल कॉम्प्लेक्स आणि हेवी वॉटर बोर्ड या उद्योगांद्वारे बीएआरसी तंत्रज्ञानाच्या यशस्वी वापरावर प्रकाश टाकला. नॉलेज मॅनेजमेंट ग्रुपचे संचालक डॉ. ए.पी. तिवारी यांनी नमूद केले की, सध्या विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील सामाजिक फायद्याचे सुमारे 210 विविध तंत्रज्ञान बार्क (BARC) द्वारे तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी प्रकाशित केले आहेत आणि सुमारे 400 परवानाधारक अशा तंत्रज्ञानाचे देशातील शहरी आणि ग्रामीण भागात व्यावसायिकीकरण करत आहेत.
यावेळी उद्योग, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ, तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहयोग विभागाचे संपर्क अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तांत्रिक सत्राचेही आयोजन करण्यात आले होते.
S.Thakur/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798506)
Visitor Counter : 329