संरक्षण मंत्रालय
9 वी आर्मी टू आर्मी स्टाफ चर्चा (AAST): पुण्यात भारत आणि श्रीलंकेच्या लष्करादरम्यान चर्चा
Posted On:
13 FEB 2022 9:24PM by PIB Mumbai
श्रीलंकेच्या सशस्त्र दलाच्या सहा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ 10 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान उभय लष्करांमधील चर्चेचा भाग म्हणून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. पुणे येथील दक्षिण कमांडच्या मुख्यालया अंतर्गत अग्निबाज विभागातर्फे दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये अधिक चांगला समन्वय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने 9व्या आर्मी टू आर्मी स्टाफ चर्चेचे (AAST) आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेचे नेतृत्व भारतीय लष्कराच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मेजर जनरल अनिल कुमार काशीद,एव्हीएसएम, व्हीएसएम, आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिरिक्त महासंचालक, आणि श्रीलंकेच्या लष्कराच्या शिष्टमंडळाचे प्रमुख मेजर जनरल एचपी रणसिंघे आरडब्ल्यूपी, आरएसपी यांनी केले. दोन्ही देशांनी प्रशिक्षण, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सरावाचे आयोजन, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील संबंध वाढवणे या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली. अंमलबजावणी करण्यात आलेल्या बाबींच्या प्रगतीवर आणि आगामी वर्षांतील नियोजित कृती आराखड्यावर चर्चा झाल्यावर परिषदेचा समारोप झाला. ही चर्चा दोन्ही देशांदरम्यान वाढत्या द्विपक्षीय लष्करी सहकार्य आणि सामंजस्य याचे प्रतीक होती.

भारतभेटीवर आलेल्या शिष्टमंडळाने 11 फेब्रुवारी 2022 रोजी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT) आणि नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA), खडकवासला येथे भेट दिली. या पथकाने कमांडंट आणि शिक्षकांशी प्रशिक्षण पद्धती आणि एमआयएलआयटीमध्ये अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल संवाद साधला. शिष्टमंडळाला एमआयएलआयटीमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र दलांशी संबंधित तांत्रिक अभ्यासाविषयी माहिती देण्यात आली आणि एमआयएलआयटीमध्ये डीएसटीएससी अभ्यासक्रम शिकणाऱ्या श्रीलंकेच्या लष्करातील शिकाऊ अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) च्या भेटीचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील ‘प्रशिक्षण आदानप्रदान कार्यक्रमाचा’ भाग म्हणून सहकार्य वाढवणे हे होते. भारत-श्रीलंका द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा हा सर्वात मजबूत आणि शाश्वत स्तंभ आहे. शिष्टमंडळाच्या सदस्यांना एनडीए मधील प्रशिक्षण पद्धती आणि संबंधित पायाभूत सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या श्रीलंकन कॅडेट्सनीही कॅडेट्स मेस येथे या शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने एअर मार्शल संजीव कपूर, एव्हीएसएम, व्हीएम, कमांडंट, एनडीए यांची भेट घेतली.

श्रीलंकन शिष्टमंडळाने कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग (CME), पुणे येथेही भेट दिली. इथे त्यांना या महाविद्यालयातील प्रशिक्षण संबंधी पायाभूत सुविधांबद्दल माहिती देण्यात आली, ज्याचा वापर लढाईशी संबंधित क्षेत्रातल्या उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांसाठी सर्व संबंधित अभियांत्रिकी पैलूंवर प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो. शिष्टमंडळासाठी लढाऊ अभियंता प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते. याशिवाय भारताच्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीची माहिती देणारा सांस्कृतिक दौराही प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आला होता.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798159)
Visitor Counter : 184