विशेष सेवा आणि लेख
पलक्कडमध्ये उंच कड्यावर अडकलेल्या ट्रेकरची भारतीय लष्कराकडून सुटका
Posted On:
09 FEB 2022 8:45PM by PIB Mumbai
चेन्नई, 9 फेब्रुवारी 2022
भारतीय सैन्याने पलक्कडमध्ये एका उंच कड्यावर अडकलेल्या एका ट्रेकरची सुटका केली. भारतीय सैन्याने केरळच्या पलक्कड मधील मलमपुझा राखीव वनक्षेत्रात टेकडीच्या कडेला 600 मीटर खोल दरीत घसरलेल्या 23 वर्षांच्या आर बाबू या युवकाची यशस्वीपणे सुटका केली. हा युवक 48 तास तिथे अडकून पडला होता. ऑपरेशन पलक्कड मध्ये, आज सकाळी 10:15 च्या सुमारास, सैन्याच्या तुकड्यानी एकत्रित प्रयत्न करून ट्रेकरची सुरक्षित आणि सुखरूप सुटका केली आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.
बंगळुरूच्या पॅराशूट रेजिमेंटल सेंटर आणि वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या कुशलपथकांनी आज पहाटे 5. 45 वाजता बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान युवकाचे मनोबल उंचावण्यासाठी नियमित संपर्क आणि संभाषण ठेवले गेले. अत्यंत आनंदित झालेल्या पालकांनी आणि कृतज्ञ राज्य प्रशासनाने भारतीय लष्कराचे मनापासून आभार मानले. भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्ज ठेवण्यात आली होती.
केरळ राज्य सरकार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अध्यक्षांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार बंगळुरूच्या पॅराशूट रेजिमेंटल सेंटर आणि वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या निष्णात पर्वतारोहक आणि रॉक क्लाइंबिंग तज्ञांसह लष्कराच्या विशेष तुकड्या दक्षिण भारत एरिया, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्यात आल्या. संपूर्ण पाहणी केल्यानंतर पथकांनी मोहिमेला सुरुवात केली. तत्पूर्वी, भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्ससह स्थानिक लोक, पोलीस, अग्निशमन आणि बचाव सेवेचे प्रयत्न धोकादायक भूभागामुळे यशस्वी होऊ शकले नाहीत. पथकांनी दिलेला जलद प्रतिसाद आणि दाखवलेले कौशल्य यामुळे भारतीय लष्कराच्या अदम्य शक्तीवरील देशाचा विश्वास पुन्हा एकदा दिसून आला आहे.
* * *
M.Iyengar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1797016)
Visitor Counter : 213