अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरी प्रकरणी दाम्पत्याला अटक

Posted On: 04 FEB 2022 4:00PM by PIB Mumbai

 

मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाच्या करचुकवेगिरीविरोधी विभागातील अधिकार्‍यांनी 12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी दाम्पत्याला अटक केली आहे. तपशीलवार माहिती शोधून काढल्यानंतर आणि माहिती विश्लेषणाच्या आधारे, मेसर्स डेटालिंक कन्सल्टन्सी या ठाणे स्थित कंपनीचे व्यवहार संशयास्पद असल्याचे निश्चित झाल्यानंतर या कंपनीविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. ही कंपनी विविध उच्चपदस्थ कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असल्याचे तपासात समोर आले. या कंपनीने ग्राहकांकडून जीएसटी  जमा केला होता, मात्र हा जमा केलेला जीएसटी एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत जमा केला नाही, यामुळे कंपनीने सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे.

पती (50 वर्षे) आणि पत्नी (48 वर्षे) असे या कंपनीचे दोन भागीदार असलेल्या या दाम्पत्याला 03.02.2022 रोजी अटक करण्यात आली. सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132(डी) चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ठाणे यांच्यासमोर या दाम्पत्याला हजर करण्यात आले. दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोषी सिद्ध झाल्यास, या दाम्पत्याला 5 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. ठाण्याचे सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी केलेली ही कारवाई, कर चुकवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सीजीएसटी मुंबई क्षेत्राने सुरू केलेल्या करचुकवेगिरीविरोधी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेदरम्यान सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने आतापर्यंत 1023 कोटी रुपयांची करचुकवेगिरी शोधून काढली असून  17 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि गेल्या पाच महिन्यांत 6 जणांना अटक केली आहे.

सीजीएसटी विभाग डेटा मायनिंग, डेटा अॅनालिसिस आणि नेटवर्क अॅनालिसिस साधनांचा वापर करून संभाव्य कर चुकवणाऱ्या आणि फसवणूक करणार्‍यांचा शोध घेत आहे. प्रामाणिकपणे अनुपालन करणाऱ्या करदात्यांसाठी अन्यायकारक स्पर्धा निर्माण करणाऱ्या   सेवा क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील कर चुकवणार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी, विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विभाग येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत ही करचुकवेगिरी विरोधातील  मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1795438) Visitor Counter : 233


Read this release in: English