संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन शिबीर 2022 मध्ये महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने जिंकला प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वज (पीएम बॅनर)

Posted On: 28 JAN 2022 6:38PM by PIB Mumbai

पुणे, 28 जानेवारी 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्णिम विजय वर्ष कालावधीत आयोजित राष्ट्रीय छात्रसेनेच्या वार्षिक प्रजासत्ताक दिन शिबीर 2022 चा समारोप 28 जानेवारी 2022 रोजी करिअप्पा संचलन मैदान  , दिल्ली कॅंट येथे पंतप्रधानांच्या संबोधनाने  झाला.या वर्षी महिनाभर चाललेल्या प्रजासत्ताक दिन  शिबिरात विविध राज्यांतील 17 राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) संचालनालयातील छात्रसैनिक  सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या  संचालनालयाच्याही  राज्यातील विविध जिल्ह्यांमधील  मुला-मुलींचा समावेश असलेल्या 57 छात्रसैनिकांच्या  एका तुकडीचा समावेश होता.

महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी  कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये तुकडीच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्रला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा मान मिळाला. 28 जानेवारी 2022 रोजी करिअप्पा संचलन मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय पी खंडुरी यांना प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वज प्रदान केला. सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव पंतप्रधान ध्वज वाहक तर छात्रसैनिक कॅप्टन निकिता खोत चषक वाहक होती.

प्रतिष्ठित पंतप्रधान ध्वज राज्य संचालनालयाने सात वर्षांनंतर जिंकला आहे. यापूर्वी राज्य संचालनालयाने 2014 मध्ये पंतप्रधान ध्वज जिंकला होता. महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. छात्रसैनिकांनी  सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. या तुकडीतील   प्रशिक्षण अधिकारी, प्रशिक्षण  कर्मचारी आणि छात्रसैनिकांची निवड करण्यात आणि प्रशिक्षण देण्यात  एनसीसी समूह, पुणे यांचे योगदान आहे. त्यांनी प्रजासत्ताक दिन शिबीराच्या तयारीसाठी  18 डिसेंबर 2021 पर्यंत  दोन महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र मेहनत घेतली.

इथे नमूद केले पाहिजे की, ऑक्टोबर 2021 मध्ये, महाराष्ट्र संचालनालयाच्या नेमबाजी संघाने प्रतिष्ठित आंतर संचालनालय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजय मिळवला होता.  या स्पर्धेत संघाच्या दहा पैकी 09 नेमबाजांनी  09 पदके जिंकली, यात पुणे समूहाचे योगदान आहे आणि त्यांनी संघाला दिलेले प्रशिक्षण विसरता येणार नाही. या एका  पाठोपाठ एक मिळालेल्या विजयामुळे, चांगली कामगिरी करण्यासाठी तसेच एनसीसी आणि त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांमध्ये सहभागी होण्यासाठी  प्रयत्न करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी राज्यात योग्य वातावरण आहे.

यावेळी बोलताना एनसीसी समूह, पुणेचे कमांडर ब्रिगेडियर आर के गायकवाड यांनी  उत्कृष्ट कामगिरीबद्दल लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिंह यांच्या नेतृत्वाखालील मेजर आरुषा शेटे यांच्या सहकार्याखालील तुकडीचे  आणि एस/ओ मनोज फिरंगे आणि छात्रसैनिकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, सशस्त्र दलांची व्यावसायिक नैतिकता आणि मूल्ये समाजाच्या मूल्यांशी दृढतेने संलग्न आहेत, जी लोकांना आकर्षित करतात. कोविड आणि ओमायक्रॉन संसर्गाचा प्रादुर्भाव असूनही ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना  शिबिरात सहभागी होण्याची परवानगी दिली ते पालक कौतुकास पात्र आहेत.

छात्रसैनिकांनी आत्मसात केलेली स्पर्धात्मक भावना आणि लढाऊ मूल्ये जोपासण्यात समाजाचे समान योगदान आहे. संचालनालयाच्या तुकडीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मिळाल्यापासून समूहाने अथक परिश्रम घेतले आणि सुरुवातीपासून ते ध्वज जिंकण्यापर्यंतच्या प्रवासात, तुकडीमध्ये एकालाही कोविड संसर्ग झाला नाही  ही अभिमानास्पद बाब आहे.

 

 S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793332) Visitor Counter : 281


Read this release in: English