शिक्षण मंत्रालय

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे: केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 28 JAN 2022 4:42PM by PIB Mumbai

नागपूर, 28 जानेवारी 2022

उच्च शिक्षणाला सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आवश्यक आहे जेणेकरून ते देशाच्या शाश्वत उपजीविकेसाठी आणि आर्थिक विकासात योगदान देईल. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे, असे  आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरच्या (आयआयआयटीएन) पहिल्या दीक्षांत समारंला  ते संबोधित करत  होते.

देशातील स्टार्ट-अप्सचे महत्त्व अधोरेखित करताना  ते  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनाला अनुसरून स्टार्ट अप्स हा नव्या भारताचा कणा बनणार आहे. केंद्र सरकार सॉफ्टवेअर आणि उत्पादन क्षेत्रात नवीन स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकार यांनी प्राचीन भारतीय पारंपारिक ज्ञान प्रणालीच्या महत्त्वावर भर देतांना  सांगितले की प्राचीन भारताने गणिताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ऋग्वेदासारख्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये प्रकाशाचा वेग, जहाजे आणि विमानांची यंत्रणा यांसारख्या वैज्ञानिक संज्ञांचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांनी आपले मुळ  शोधण्यासाठी या पारंपरिक भारतीय ज्ञान पद्धती जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मंत्र्यांनी केली.

श्री के. संजय मूर्ती, उच्च शिक्षण सचिव, शिक्षण मंत्रालय आणि अध्यक्ष, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स (बीओजी), आयआयआयटी नागपूर म्हणाले की, महत्त्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' कार्यक्रम 3 लक्ष्यांवर आधारित आहे - देशात डिजिटल आर्किटेक्चर तयार करणे, नागरिकांना सेवांचे डिजिटल वितरण सुनिश्चित करणे आणि त्यांचे डिजिटल सक्षमीकरण करणे.   आयआयआयटीएन मधील विद्यार्थ्यांनी शिकलेली कौशल्ये हे लक्ष्य साध्य करण्यात मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी केली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या जवळच्या  समुदायांना नाविन्यपूर्ण मार्गांनी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचा मार्ग मोकळा करण्यासाठी उद्योजकता कौशल्ये जोपासण्याचे आवाहनही  केले.

याप्रसंगी 50 विद्यार्थ्यांना पी.जी. डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि 195 विद्यार्थ्यांना बी.टेक. संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी  अभ्यासक्रमाची  पदवी देण्यात आली.

आज झालेल्या दीक्षांत समारंभात संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेतील 2021 बॅचचे  सीजीपीए  9.99 सह श्री अंकित बाराई आणि  संगणक विज्ञान अभियांत्रिकी शाखेतील 2020 बॅचच्या  सीजीपीए 9.56 सह कु. अनुश्री लड्डा यांना   पदवीधर बॅचमधील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल "इन्स्टिट्यूट ॲकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड" प्रदान करण्यात आले.

सिनेटचे अध्यक्ष आणि आयआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला आणि विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या गेल्या 5 वर्षांतील कामगिरीवर प्रकाश टाकला. श्री कैलास दाखले, कुलसचिव , आयआयआयटीएन  यांनी आभार मानले.

डॉ. अश्विन कोठारी, डीनआयआयआयटीएन  आणि  बोर्ड  सदस्यकैलास दाखले, रजिस्ट्रार  ; डॉ. बी. पद्मा एस. राव, मुख्य शास्त्रज्ञ आणि प्रमुख, पर्यावरण लेखापरीक्षण आणि धोरण अंमलबजावणी विभागनीरीनागपूर आणि  बोर्ड सदस्यआयआयआयटीएन; डॉ.पी.एम. पडोळे, संचालकवीएनआयटी , नागपूर आणि  बोर्ड सदस्य, आयआयआयटीएन आतिष दर्यापूरकर सहाय्यक डॉ. प्रो. (बेसीक सायन्सेस ) आणि बीओजी सदस्यआयआयआयटीएन डॉ. अविनाश जी. केसकर, प्राध्यापकवीएनआयटी  आणि सिनेट सदस्यआयआयआयटीएन श्री. अरविंद कुमार, केंद्र प्रमुखटीसीएस , नागपूर आणि सिनेट सदस्य, आयआयआयटीएन; यावेळी उपस्थित होते. तसेच पदवीधर विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय, आयआयटीएनचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  हेसुद्धा उपस्थित होते. वर्धा रोड, नागपूर येथील वारंगा कॅम्पसमध्ये हा सोहळा पार पडला.

आयआयआयटीएनही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे आणि तिचे उद्घाटन 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडने 95% विकसित केलेल्या वर्धा रोडवरील वारंगा येथील कायमस्वरूपी कॅम्पसमधून ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था संगणक विज्ञान अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार या विषयात पदवीधर पदवी प्रदान करते. याशिवाय  ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग इक्विपमेंट ओरिएंटेशनच्या स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी एम.टेकच्या तरतुदीसह, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलि-कम्युनिकेशन इंजिनिअरिंग महू (मध्य प्रदेश) यांच्यासह संयुक्तपणे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये पीजी डिप्लोमाही आयआयआयटीएन  प्रदान करते.  

  

DW/DJM/PM 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793278) Visitor Counter : 232


Read this release in: English