माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय बालिका दिन: विशेष चित्रपट प्रसारित करुन फिल्म्स डिव्हिजन आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा करणार


बालिकांचे हक्क, आरोग्य आणि शिक्षण या विषयावर सहा चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत

Posted On: 24 JAN 2022 2:25PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जानेवारी 2022

 

मुलींचे महत्व आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, दरवर्षी 24 जानेवारी रोजी, राष्ट्रीय बालिका दिन देशभरात साजरा केला जातो. आज 24 जानेवारी 2022 रोजी, यानिमित्ताने मुलींचे हक्क, आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत फिल्म्स डिव्हिजन ऑनलाइन चित्रपट महोत्सव आयोजित करत या उत्सवात सहभागी होत आहे.

https://filmsdivision.org/ वर “डॉक्युमेंटरी ऑफ द वीक” विभागांतर्गत आणि फिल्म डिव्हिजनच्या YouTube चॅनल वर https://www.youtube.com/FilmsDivision या लिंकवर सहा लघुपट दाखवले जातील.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ उत्सवाचा भाग म्हणून हा महोत्सव आयोजित केला आहे.

प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये पुढील चित्रपट समाविष्ट आहेत:

चिमुकली - मुलगी वाचवा (2013/सोनल ठाकूर) - या चित्रपटात स्त्री भ्रूण वाचवण्यासाठी भावनिक आवाहन केले आहे. मुलींकडे प्रेम आणि मायेचं प्रतीक म्हणून पाहिले जात असल्याने, या चित्रपटातील मुलगी तिला जगू द्या आणि या जगात बदल घडवू द्या अशी नम्र, काव्यात्मक विनंती करते. या चित्रपटात मुलीच्या जन्माबाबत  सकारात्मकता, आशा आणि बालिका जन्माची स्वीकृती अधोरेखित करण्यात आली आहे.

एज्युकेशन ओन्ली हर फ्युचर (1998 /अरुण गोंगाडे) - हा संगीतमय लघुपट ही एका गरीब कुंभाराच्या मुलीची कथा दाखवतो. जेव्हा तिचा जन्म होतो, तेव्हा तिच्या वडिलांनी हे गृहीत धरले की आपली मुलगी घरातलीच सर्व कामे करेल, परंतु नंतर त्याला आपल्या मुलीची अभ्यास करण्याची दृढ इच्छा लक्षात येते आणि तिला शिक्षण देण्याचा निर्णय तिचे वडील घेतात.

प्रतिभा (1999/मुकेश चंद्र) - ग्रामीण भारताच्या पार्श्‍वभूमीवर आधारित माहितीपट आपल्या समाजातील मुलीचे महत्त्व दर्शवतो.  समान संधी मिळाल्या की मुली मोठी ध्येय गाठू शकतात असा स्पष्ट संदेशही यातून दिला आहे.

कुलदीपक (1995/कुमार सोहोनी) - हा चित्रपट मुलीच्या सशक्तीकरणाचे महत्त्व दर्शवतो आणि तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या परीश्रमांना देखील अधोरेखित करतो.

माय फेयरी - माय स्ट्रेंथ (1986/कामिनी कौशल) - एका बुलबुल नावाच्या लहान मुलीच्या कथेद्वारे, हा चित्रपट असा संदेश देतो की स्वयं-सहाय्य आणि चिकाटीने काहीही साध्य करता येते. बुलबुल, ही एक शाळकरी मुलगी, आव्हाने पेलत तिची स्वप्ने पूर्ण करते.

रोशनी (1988/भीमसैन) – जीवनात चांगले मूल्ये रुजवणारा ऍनिमेशन चित्रपट. या चित्रपटातील प्रिया नावाची नायिका प्रत्येक विपरीत परिस्थितीतून चांगला मार्ग शोधते. तिच्या या सवयीमुळे, प्रिया तिच्या सभोवतालच्या प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलू शकते.

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792135) Visitor Counter : 283


Read this release in: English