आयुष मंत्रालय
पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्ये सूर्यनमस्कारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन
Posted On:
14 JAN 2022 7:43PM by PIB Mumbai
पुणे , 14 जानेवारी 2022
14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आजादी का अमृतमहोत्सव सोहळ्यांतर्गत आभासी माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. मकर संक्रांतीचा सण आपल्या सभोवताली आरोग्य, संपत्ती आणि आनंदाचा प्रसार करणाऱ्या निसर्गमातेचे आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सध्याच्या काळात पुन्हा पसरत चाललेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मकर संक्रातीच्या निमित्ताने सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके अधिकच समर्पक ठरतात. आज 14-1-2022 रोजी जगभरातून सुमारे 75 लाख लोक सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था(एनआयएन) या स्वायत्त संस्थेने, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करत हा दिवस मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्गावरील आपल्या संकुलात तसेच गोहे, आंबेगाव येथील आदिवासी केंद्रातही आपले कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व आरोग्यप्रेमींच्या उपस्थितीत सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करून साजरा केला.

मकर संक्रातीच्या निमित्ताने पुण्यामध्ये राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत आयोजित सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रोफेसर डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी मार्गदर्शन केले
यावेळी संस्थेच्या संचालक प्रो. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. प्रत्येकाने नियमितपणे सूर्यनमस्कार करण्यासाठी आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावाने शरीरातील उर्जेमध्ये आणि रोगप्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होते, असे त्यांनी सांगितले. हा सराव सूर्यप्रकाशात केल्यास शरीरात ड जीवनसत्व देखील निर्माण होते जे संसर्गांना रोखण्यासाठी महत्त्वाचे असते, अशी माहिती त्यांनी दिली.

पुण्यात आंबेगावमधील गोहे येथील एनआयएनच्या आदिवासी केंद्रामध्ये सूर्यनमस्कार सादरीकरण
यावेळी एनआयएनचे डॉक्टर, उपचार देणारे आणि एनआयएनच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रात्यक्षिके सादर केली आणि आजादी का अमृतमहोत्सव सोहळ्यातील जागतिक स्तरावरील 75 लाख सूर्यनमस्कार सादरीकरणात आपले योगदान दिले.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789992)
Visitor Counter : 245