माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ब्रुनो कुटिन्हो याने मतदार जागरुकतेबाबत लोक संपर्क विभागद्वारा आयोजित पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केले


दयानंद बांदोडकर मैदानावर पाच दिवसीय मतदार जागरूकता प्रदर्शनाला प्रारंभ

तुमचे मत, तुमचा अधिकार: प्रदर्शनामधून सक्रिय मतदार सहभागाचे आवाहन

Posted On: 12 JAN 2022 10:20PM by PIB Mumbai

पणजी, 12 जानेवारी 2022

 

दयानंद बांदोडकर मैदानावर पाच दिवसीय मतदार जागरूकता  प्रदर्शनाला प्रारंभ झाला. केंद्र  सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क विभाग -गोवा द्वारे हे प्रदर्शन आयोजित केले  आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मतदारांचा  सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 12 जानेवारी 2022 रोजी गोव्यातील पणजी येथे कला अकादमीजवळच्या  दयानंद बांदोडकर मैदान येथे गोव्यातील प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार  ब्रुनो कुटिन्हो याने  मतदार जागरूकतेवरील  पाच दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना कुटिन्हो याने मतदान हा आपला हक्क असल्याचे सांगत सर्वांनी  विशेषतः युवा मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क  बजावण्याचे आवाहन केले.

उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्य निवडणूक अधिकारी  कुणाल (आयएएस)  म्हणाले की, मतदानासाठी उत्सवाचा उत्साह कायम राखला  जावा. निवडणुकीच्या विविध पैलूंबद्दल नागरिकांचे प्रबोधन करण्याचा आणि भारतातील निवडणुकांचा इतिहासाचे दर्शन घडवणारा  हा उपक्रम नक्कीच  स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले.  निवडणूक आयोग आगामी निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे, विकृत बाबी  दूर करून, ज्ञात आणि संभाव्य गुन्हेगारांवर सक्रिय कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.  आम्ही  मतदान केंद्रांमध्‍ये पायाभूत सुविधा सुधारत  आहोत आणि ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्‍यक्‍तीसाठी विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.  इथली  मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी ही आहे , त्यामुळे लोकांनी मतदान गांभीर्याने घेतले  पाहिजे आणि जगाला दाखवून दिले पाहिजे की त्यांचे मत हे त्यांचे पहिले प्रेम आहे आणि त्यासाठी त्यांनी वचनबद्ध रहायला हवे  असे ते  म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या मतदार जागरूकता  उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. लोक संपर्क अधिकारी रियास बाबू यांच्या हस्ते पाहुण्यांना स्वीप (SVEEP)  स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

हे प्रदर्शन, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) SVEEP कार्यक्रमांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, गोवा यांच्या सहकार्याने आयोजित केले जात आहे.  सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्राम, जो  SVEEP या नावाने ओळखला  जातो , हा  भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि भारतात मतदार साक्षरतेला चालना देणारा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

   

या प्रदर्शनात सुमारे 40 डिस्प्ले आणि एलईडी वॉल्स  आहेत जे निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती  देतात, अभ्यागतांना प्रक्रिया स्पष्टपणे समजण्यास मदत करतात. या  डिस्प्ले मध्ये गोवा आणि देशातील निवडणूक प्रक्रियेचे दुर्मिळ फोटो समाविष्ट आहेत. प्रदर्शनात एक सिग्नेचर वॉल देखील आहे जिथे अभ्यागत त्यांचा ऑटोग्राफ देऊ शकतात.

हे प्रदर्शन रविवार, 16.01.2022 पर्यंत  जनतेसाठी  खुले आहे.

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789515) Visitor Counter : 191


Read this release in: English