अर्थ मंत्रालय

मुंबई विभागाच्या नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने 70 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा लावला,  दोन व्यावसायिकांना केली अटक

Posted On: 08 JAN 2022 9:49PM by PIB Mumbai

 

मुंबई विभागाच्या नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 70 कोटी रुपयांच्या  वस्तू आणि सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा लावला आहे. यामध्ये 14 हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये त्यांचे जाळे पसरले आहे. त्यांनी वस्तू किंवा माल  न पुरवता  385 कोटींहून अधिक रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या.

मुंबई सीजीएसटी विभागाच्या केंद्रीय गुप्तवार्ता  विभागाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  कारवाई करत या  अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांपैकी एक मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक आहे ज्याने अलीकडेच पब्लिक इश्यू आणला होता आणि दुसरा  मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेडिंगचा मालक आहे.

बिटुमेन, अॅस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड इत्यादींच्या व्यापारासाठी दोन्ही संस्था जीएसटी बरोबर नोंदणीकृत आहेत आणि सीजीएसटी  कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा न मिळवता अनुक्रमे 20.75 कोटी रुपये आणि 11.31 कोटी रुपयांचे  इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणुक करून मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.  या दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसलेल्या संस्थांकडून बनावट आयटीसी मिळवत होत्या आणि ते या नेटवर्कमधील  इतर कंपन्यांना देत होत्या. इतर 12 कंपन्यांनी  38 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतला आहे किंवा इतरांना दिला आहे.

संचालक आणि मालक दोघांनाही सीजीएसटी  कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132  चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि आज वाशी इथल्या प्रथम वर्ग  न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.  त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली  आहे. मोठ्या प्रमाणावर अधिकार असलेल्या या उद्योगांना नोव्हेंबर 2021 मध्ये पब्लिक लिस्टिंग मिळाले होते  आणि बनावट आयटीसी नेटवर्कमधून मिळवलेल्या  निधीचा  इतर आर्थिक लाभांसाठी  गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पुढील तपास सुरु  आहे आणि इतर सक्तवसुली  संस्थांना देखील त्यांच्या बनावट व्यवहारांची माहिती दिली जाईल.

सीजीएसटी मुंबई विभागाने  सुरू केलेल्या विशेष कर चुकवेगिरी विरोधातील मोहिमेचा हा  एक भाग आहे. या विशेष मोहिमेमध्ये, अधिकाऱ्यांचा एक प्रशिक्षित गट  बनावट आयटीसी  नेटवर्क आणि कर चुकवेगिरीचा छडा लावण्यासाठी  डेटा अनॅलिटीक्स  आणि नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करत आहे.गेले  चार महिने सुरु असलेल्या या मोहिमेदरम्यान, 500 हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यात 40 जणांना अटक करण्यात आली आहे, 4550 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. आणि 600 कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.

अलीकडेच 3.01.2022 रोजी, ठाणे सीजीएसटी  आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी एका पिता-पुत्र जोडीला 22 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी  नेटवर्क चालवल्याबद्दल अटक केली होती. 5.1.2022 रोजी, मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी मेसर्स नूर टिंबरचा मालक असलेल्या लाकूड व्यापाऱ्याला  अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून 5.47 कोटी रुपयांचे  बनावट आयटीसी मिळवल्याबद्दल अटक केली होती.

मुंबई विभागाचे  अधिकारी डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यवसाय व्यवहार जसे की ऑनलाइन गेमिंग, नॉन फंगीबल टोकन्स, ई-कॉमर्स सारख्या संभाव्य कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यवहारांचे  बारकाईने विश्लेषण करत आहेत. अलीकडे, सीजीएसटी  मुंबई विभाग  आणि क्रिप्टो चलन एक्सचेंज  वझीरएक्सने करचुकवेगिरी केल्याचे देखील आढळून आले आणि तपासादरम्यान 49.2 कोटी रुपये जीएसटी वसूल  करण्यात आला.   येत्या काळात  फसवणूक करणार्‍याविरुद्ध  तसेच करचुकवेगिरी विरोधातील  मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे मुंबई विभागाच्या सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी म्हटले आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788643) Visitor Counter : 328


Read this release in: English