माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची 2022 ची आगळी दिनदर्शिका: “याद करो कुर्बानी”

Posted On: 07 JAN 2022 6:24PM by PIB Mumbai

पुणे, 7 जानेवारी 2022

 

"भारतीय सिनेमातील वेगवेगळ्या 'प्रतिमांचा वापर करून दरवर्षी आगळ्यावेगळ्या दिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती करण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नेहमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने यावर्षीही (2022) अशाच एका वेगळ्या आणि आकर्षक दिनदर्शिकेची त्यामध्ये भर घातली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही डिजिटल पद्धतीने दिनदर्शिका तयार करण्यात आली असून चित्रपट रसिकांना अतिशय आवडू शकेल अशी ही आकर्षक दिनदर्शिका राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. - https://www.nfai.gov.in/ 

भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरूद्ध हजारो महिला आणि पुरुषांनी निर्भयपणे लढा देऊन आपल्या मातृभूमीसाठी बलिदान केले. भारतीय स्वातंत्र्याचे यंदाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त ''याद करो कुर्बानी'' या  संकल्पनेच्या आधारावर ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या पडद्यावरील स्वातंत्र्याची गाथा समाविष्ट करण्यात आली आहे.  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन करून ठेवलेल्या विविध भाषांमधील चित्रपटांमधील स्वातंत्र्ययोद्ध्यांची   अतिशय दुर्मिळ छायाचित्रे या दिनदर्शिकेत पाहावयास मिळणार आहेत.

"आझादी का अमृतमहोत्सव" साजरा करताना या दिनदर्शिकेमागे मोठ्या पडद्यावर चितारलेल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अनेक धाडसी स्वातंत्र्ययोद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आमचा मुख्य हेतू होता असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

या दिनदर्शिकेत भारतीय स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या भूमिका साकार केलेल्या अनेक नामवंत अभिनेते आणि अभिनेत्री यांची दुर्मिळ छायाचित्रे पाहावयास मिळणार आहेत. अतिशय निवडक अशा बारा दुर्मिळ छायाचित्रांमध्ये, 'झाँशी की रानी ' ( हिंदी - १९५३ ) या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिकेतील मेहताब., ' शहिदे -ए  -आझम -भगतसिंग ' ( हिंदी- १९५४ ) या चित्रपटातील चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेतील पी. जयराज, ' वीरपांडीय् कट्टाबोम्मन ( तमिळ -- १९५९ ) या चित्रपटातील वीरपांडीय् कट्टाबोम्मनची  भूमिका करणारे शिवाजी गणेशन,  'कडू मकरानी' ( गुजराती- १९६० ) या चित्रपटातील कादिर बक्श ची भूमिका करणारे अरविंद पंड्या, ' उमाजी नाईक ' ( मराठी - १९६० ) या चित्रपटात उमाजी नाईकांची भूमिका करणारे गजानन जहागीरदार, 'कित्तूर चेन्नम्मा' ( कानडी - १९६१ ) या चित्रपटात राणी चेनम्माची भूमिका साकारणाऱ्या बी. सरोजा देवी,  'शहीद' (हिंदी -- १९६५ ) या चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका साकारणारे मनोज कुमार , ' सुभाषचंद्र ' ( बंगाली -- १९६६ ) या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करणारे अमर दत्ता, 'कुंजली मरक्कर' ( मल्याळम -- १९६७ ) या चित्रपटात कुंजली मरक्कर ची भूमिका साकारणारे कोट्टारक्कर श्रीधरन नायर,  'शहीद ऊधमसिंग" ( हिंदी-- १९९९ ) या चित्रपटात ऊधमसिंग यांची भूमिका करणारे राज बब्बर,  'मंगल पांडे द रायझिंग' ( हिंदी --- २००५ ) या चित्रपटात मंगल पांडे यांची भूमिका साकारणारे अमीर खान, आणि 'एक क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके' ( मराठी --- २००७ ) या चित्रपटात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारणारे अजिंक्य देव आदींचा समावेश आहे.

यावर्षी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची 'ई - दिनदर्शिका' https://www.nfai.gov.in/calendar-2022.php  या अधिकृत संकेतस्थळावर  वर ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याची 'प्रतिमा'  डाउनलोड करून ती इतरांशी शेअर करता येऊ  शकेल.

 

*  *  *

NFAI-PIB Mumbai/M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1788401) Visitor Counter : 218


Read this release in: English