रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पामुळे 'काटोल' नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाईल- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा नितीन गडकरींच्या हस्ते आरंभ
Posted On:
02 JAN 2022 5:24PM by PIB Mumbai
नागपूर, 2 जानेवारी 2022
ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचे काम आता वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून काटोल ते नागपूर हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटात कापता येईल आणि काटोल ही नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर ते काटोल या रस्त्यामध्ये वनविभागाच्या परवानगीचा तसेच इतर अनेक अडचणी आल्या यासंदर्भातील अडचणी दूर करून आता या चौपदरी करण्याचे काम आता चालू झाले आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितल. या प्रकल्पामध्ये असणा-या कामासाठी एकंदरीत 1 हजार 184 कोटी निधीची तरतूद केली असून रस्त्याच्या याभागाची लांबी 48.20 किलोमीटर आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये काटोल बायपासच्या शेवटी आणि कळमेश्वर बायपास या दोन्ही टोकावर एका बाजूचे उड्डाणपूल बांधण्याचे काम देखील अंतर्भूत आहे त्यामुळे कळमेश्वर आणि काटोल शहराकडे जाणारी वाहतूक सुरक्षित आणि सोयीची ठरणार आहे.नागपूर जवळच्या रिंग रोडचे काम सुद्धा फेटरी जवळ चालू होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
या रस्त्यामुळे नागपूर शहराची काटोल, वरुड तालुक्यासोबतची कनेक्टिव्हिटी चांगली होणार असून यामुळे स्थानिक तसेच उत्पादनांची बाजारपेठापर्यंत वाहतुक सुकर होणार आहे. या रस्त्यावर 5 उड्डाणपुल तसेच 13 भुयारी मार्ग असून रेल्वे क्रॉसिंग मुळे वेळ आणि इंधनाच्या बचत होण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणात मदत होणार आहे.
काटोल नगर परिषदेने राज्यातील पहिल्या 5 नगरपालिकेमध्ये आपल्या कार्यकतृत्वाने नाव मिळवले असल्याचा उल्लेख करत काटोल नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जलतरण तलाव यासारख्या सुविधांमुळे येथील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळत असून काटोलचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक तसेच सांस्कृतिक विकास होत आहे असेही गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपुरातील वर्धा ते बुटीबोरी रस्त्याचे चौपदरीकरण खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम, लिबर्टी सिनेमा ते मेंटल हॉस्पिटल येथे उड्डाणपुलाचे बांधकाम, ऑटोमोटिवे चौक ते कन्हान या बहुपदरी रस्त्याचे बांधकाम तसेच रेडिसन ब्लू हॉटेल ते प्राइड हॉटेल पर्यंत उड्डणपूलाचे बांधकाम, बुटीबोरी येथील चौपदरी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या सर्व विकास कामाची लांबी 87. 97 किलोमीटर असून यासाठी 2, 943 कोटी रुपये निधी खर्च झालेला आहे.
याशिवाय नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एन.एच.ए.आय.द्वारे प्रगतीपथावर असलेल्या कामामध्ये नागपूर-उमरेड रस्त्याचे चौपदरीकरण, सावनेर ते धापेवाडा रस्त्याचे चौपदरीकरण, नागपूर आऊटर रिंगरोड भाग 1 आणि 2 चे बांधकाम, पारडी पुलाचे बांधकाम, गड्डीगोदाम ते कडबी चौक येथे उड्डाणपुलाचे बांधकाम तसेच अजनी येथे इंटरमोडलस्टेशनचे बांधकाम प्रस्तावित असून या सर्व कामासाठी 5,504 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इंदोरा चौक ते पाचपावली ते शीतला माता चौक वर उड्डाणपुलाचे बांधकाम, नागपूर भंडारा रस्त्याचे सहापदरीकरण या प्रकल्पाचा सुद्धा विस्तृत प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे.
या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
***
S.Rai/D.Wankhede/D.Dubey/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786944)
Visitor Counter : 268