संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुनीत सागर अभियान: राष्ट्रीय छात्र सेना मुंबईच्या कॅडेट्सनी जुहू येथे राबवली सागर किनारा स्वच्छता मोहीम


अभिनेता तेज सप्रू, पत्रकार मिलिंद वागळे यांनी सागर किनारा स्वच्छता मोहिमेत सामील होऊन तरुण कॅडेट्सला प्रेरित केले

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते बांधकामात वापरण्यासाठी गोळा केला प्लास्टिक कचरा

Posted On: 22 DEC 2021 7:07PM by PIB Mumbai

मुंबई, 22 डिसेंबर 2021

 

पुनीत सागर अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (NCC) मुंबई बी ग्रुप, NCC महाराष्ट्र संचालनालयाच्या वतीने, मुंबईत सागर किनारा स्वच्छता मोहीम राबवत आहे. NCC कॅडेट्सनी आज 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी मुंबईतील प्रमुख पर्यटन समुद्रकिनारा, जुहू चौपाटी येथे किनारा स्वच्छ केला.

समुद्र किनारे/चौपाटी प्लास्टिक आणि इतर टाकाऊ पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आणि या भागांना स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी NCC द्वारे राबवण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेचा हा एक भाग आहे. स्थानिक लोकांमध्ये आणि भावी पिढ्यांमध्ये स्वच्छ समुद्रकिनारे/चौपाटी यांचे महत्त्व सांगणाऱ्या संदेशाचा प्रसार करणे हे महिनाभर चालणाऱ्या पुनीत सागर मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

प्रख्यात अभिनेते तेज सप्रू आणि प्रख्यात क्रीडा पत्रकार मिलिंद वागळे यांनी आज जुहू चौपाटीवरील मोहिमेत 1 आर्मड स्क्वाड्रन NCC आणि 1 नेव्हल NCC च्या 80 हून अधिक कॅडेट मुली आणि मुलांसह भाग घेतला. कॅडेट्सनी पुस्तिकांचे वाटप केले आणि समुद्रकिनाऱ्यावर पथनाट्य केले. तेज सप्रू यांनी कॅडेट्सशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरित केले आणि जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना सांगितले.

  

कॅडेट्सनी गोळा केलेला कचरा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) सुपूर्द करण्यात आला असून, ते प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करणार आहेत. NHAI सोबत केलेल्या सामंजस्य कराराचा हा एक भाग आहे.

ग्रुप कॅप्टन नीलेश देखणे, मुंबई बी ग्रुपचे ग्रुप कमांडर कर्नल एस के दहिया, कर्नल मित्रा यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याबरोबरच त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि मोहिमेबद्दल जनजागृती केली.

  

सामाजिक आणि राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्ये तरुण कॅडेट्स नियमितपणेमोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784345) Visitor Counter : 240


Read this release in: English