संरक्षण मंत्रालय

पॅनएक्स-21 (PANEX-21) चे पुणे येथे उद्घाटन

Posted On: 20 DEC 2021 7:50PM by PIB Mumbai

पुणे, 20 डिसेंबर 2021 

 

पॅनएक्स -21 (PANEX-21) हा एक बहु- राष्ट्रीय-बहु -संस्थांचा सहभाग असलेला  सराव 20 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आला असून बिमस्टेक  राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन बाबींमध्ये सामायिक क्षमता विकसित करणे हा याचा उद्देश  आहे. या सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड मधील  प्रतिनिधी आणि विषय तज्ञ उपस्थित आहेत.  

महामारीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रभावी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम राबवण्याशी संबंधित विविध पैलूंवर ते चर्चा करतील. पुणे येथील सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय (एएफएमसी) येथे आयोजित कार्यक्रमात दक्षिण कमांडचे  प्रमुख लेफ्टनंट जनरल जेएस नैन यांनी उद्घाटनपर भाषण केले. आपल्या भाषणात, आर्मी कमांडर यांनी   वारंवार उदभवणाऱ्या विविध भीषण राष्ट्रीय आपत्तींकडे  उपस्थितांचे लक्ष वेधले,  आणि या देशांनी मानवतावादी संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करण्याचे आवाहन केले. आकस्मिक परिस्थितींत सर्वसमावेशक प्रादेशिक प्रतिसाद यंत्रणा उभारण्यासाठी सदस्यांनी व्यापक चर्चा करावी असे आवाहन  त्यांनी केले.

लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या आपल्या प्रमुख भाषणात महामारीसारख्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करताना जागतिक आणि प्रादेशिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, बिमस्टेक राष्ट्रांमधील सुव्यवस्थित प्रक्रिया आणि समन्वय मानवी जीवन वाचवण्यात मोलाची मदत करू शकते. अधिसूचना, तयारी आणि प्रतिसाद यंत्रणा यांचा आढावा घेण्यावर या सरावात भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

सशस्त्र दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संबंधित  तज्ञांच्या प्रतिनिधित्व असलेल्या  विविध संस्थांचा सराव अशी PANEX-21 ची रचना असून  महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या आव्हानांशी लढा देणे हा उद्देश आहे. तसेच, सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन द्यावे  आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी बिमस्टेक संयुक्त प्रतिसाद यंत्रणा उभारण्यासाठी शिफारस करावी हाही उद्देश आहे. 

आजचे चर्चासत्र तीन पूर्ण सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. . प्रत्येक सत्रात आपत्‍ती निवारण आणि महामारी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ आणि डोमेन तज्ञांनी आपले विचार मांडले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ सौम्या स्वामीनाथन , नीती आयोगाचे डॉ व्ही के पॉल यांच्यासारखे  विषय तज्ञ या बैठकीला उपस्थित होते. पहिल्या सत्रात कोविड-19 संकल्पना, मूलभूत तत्वे आणि यातून मिळालेले धडे यासह महामारीला सामोरे जाण्याशी संबंधित विविध वैद्यकीय पैलूंवर चर्चा करण्यात आली. दुस-या सत्रात महामारीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद  यंत्रणेवर चर्चा करण्यात आली तर तिसरे सत्र प्रादेशिक आपत्तींदरम्यान देशांतर्गत प्रतिसादासाठी सशस्त्र दलांचे एकत्रीकरण करण्यावर आधारित होते.


* * *

PRO (Defence)-M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1783612) Visitor Counter : 292


Read this release in: English