आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून गोव्यात अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि योग-निसर्गोपचार संस्थेचे काम प्रगतीपथावर- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी राज्यात 100 वेलनेस सेंटरला मंजुरी, 10 केंद्राच्या कामाला सुरुवात
Posted On:
18 DEC 2021 3:36PM by PIB Mumbai
पणजी, 18 डिसेंबर 2021
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. राज्यात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून 300 कोटी रुपये खर्चाची अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि 200 कोटी रुपयांच्या खर्चातून योग आणि निसर्गोपचार शिक्षण संस्थेचे काम प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. ते आज आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक खनिज आणि सागरी औषधी संपदा संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या आयुर्वेद दिन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी औषधी बोर्डाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक डॉ दिगंबर मोकाट, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेचे डॉ हेमंतकुमार गुप्ता, गोवा आयुर्वेद महामंडळाच्या डॉ स्नेहा भगत यांची उपस्थिती होती.



केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्मितीनंतर अवघ्या दीड वर्षात जागतिक पातळीवर योगाचा स्वीकार करण्यात आला. हे या मंत्रालयाचे फार मोठे यश आहे. तसेच कोरोना संकट काळात जगाने आयुर्वेदाचे महत्व जाणले. याकाळात भारताने 150 देशांना आयुर्वेदीक औषधे आणि मदत पुरवली, असे श्रीपाद नाईक म्हणाले.


राज्यात राष्ट्रीय पातळीवरच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेबरोबरच 100 वेलनेस सेंटर (कल्याण केंद्र) केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. यातील 10 केंद्राच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात असल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. औषधी महामंडळाच्या माध्यमातून औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. त्याचे दृश्य परिणाम आता दिसून येते आहेत, असे मंत्री म्हणाले.


केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचा अभ्यास करुन जोपासना करण्याचा सल्ला दिला.
रायबंदर येथे संशोधन संस्थेबरोबरच 20 खाटांचे आयुर्वेद रुग्णालय सुरु आहे. लवकरच आणखी 5 ओपीडी सुरु करण्यात येणार आहेत. राज्यात प्रत्येकी 50 खाटांचे दोन रुग्णालये सुरु होणार आहेत. यातील मडगाव रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे, दुसरे रुग्णालय साखळी येथे सुरु करण्यात येईल,अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1783000)
Visitor Counter : 230