संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाकडून गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आयोजन
गोवा मुक्तीत सहभागी योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
Posted On:
14 DEC 2021 6:15PM by PIB Mumbai
गोवा, 14 डिसेंबर 2021
भारतीय नौदलाच्या गोवा क्षेत्राकडून गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आज आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हे या परिसंवादाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी गोवा क्षेत्राचे ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल फिलीपोस जी प्यूनमुटील, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल ए बी सिंग यांची उपस्थिती होती.
राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांचे उद्घाटन सत्रात बीजभाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात गोवा मुक्तीसाठी भारतीय नौदलाने दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. अशाप्रकारच्या परिसंवादामुळे जनतेला विशेषतः युवा पिढीला राष्ट्र उभारणीसाठी सशस्त्र दलांनी तसेच मागील पिढ्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती मिळते, म्हणून अशाप्रकारच्या परिसंवादाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
व्हाईस ऍडमिरल ए बी सिंग यांनी भारतीय नौदल आणि गोव्याचा विकास हे परस्परपूरक असल्याचे सांगितले. आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाची गोवा मुक्तीतील महती त्यांनी सांगितली. तसेच दाबोळी विमानतळ पूर्णवेळ कार्यरत राहण्यासाठी नौदलाच्या प्रयत्नांची माहिती दिली.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात रिअर ऍडमिरल (निवृत्त) एस वाय श्रीखंडे यांनी गोवा मुक्तीत सागरी शक्तीचा आढावा घेतला. त्यानंतर गोव्यातील लष्कराचा तळ असलेल्या 2 सिग्न ट्रेनिंग सेंटरचे ब्रिगेडिअर ए एस साहनी आणि कर्नल मानवेंद्र नागाईच यांनी गोवा मुक्तीत भारतीय लष्कराचे योगदान अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात गोवा विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ सीमा रिसबूड यांनी ‘गोवा मुक्ती लढा: आझाद गोमन्तक दल आणि दारुगोळा प्रतिकार’ या विषयावर सादरीकरण केले. तर, कमोडोर जॉन्सन ओडक्कल (निवृत्त) यांनी गोवा मुक्तीचा भू-राजकीय संदर्भ आणि राष्ट्रीय संदर्भ यात मलबार संदर्भावर प्रकाश टाकला. गोवा विद्यापीठातील प्राध्यापक पराग परब यांनी सादर केलेल्या ‘पोस्ट कोलोनिअल गोवा- सर्वांगीण दृष्टीक्षेप’ने परिसंवादाची सांगता झाली. इतिहास, गोवा मुक्ती आणि गोव्याचा विकास यावर परिसंवादात फलदायी चर्चा झाली. सागरी युद्ध केंद्र, मुंबई येथील संचालक कमोडोर श्रीकांत केसनूर यांनी परिसंवादाचे संचलन केले.
परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते गोवा मुक्ती लढ्याशी निगडीत सैन्यदलातील योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यात मनीपूर्थ भास्कर नायर, एक्स चीफ इलेक्ट्रीक्ल (पॉवर), दुर्गा बक्ष सिंग चौहान, एक्स चीफ एअर (एअर हँडलर) आणि मानद सब लेफ्टनंट (निवृत्त) कंसराज शर्मा यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
* * *
VK/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781440)
Visitor Counter : 241