विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तीन गिनीज विश्वविक्रम नोंदवत भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची सांगता
देशात दालचिनीची लागवड हे आयआयएसएफचे सर्वात मोठे यश आहे- डॉ शेखर मांडे
Posted On:
13 DEC 2021 11:02PM by PIB Mumbai
गोवा, 13 डिसेंबर 2021
तीन गिनीज विक्रमांची नोंद करत आज गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव-2021ची सांगता झाली. आयआयएसएफमध्ये 11 डिसेंबर रोजी 'एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी मॉडेल रॉकेट किटची जोडणी करून ' पहिल्या गिनीज विश्वविक्रमाची नोंद केली. 12 डिसेंबर रोजी आयआयएसएफमध्ये ‘ऑनलाइन आणि एकाच ठिकाणी एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग किट्सची जोडणी ' करत दुसऱ्या विक्रमाची आणि महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी ‘एकाच ठिकाणी सर्वात मोठा अवकाश संशोधन धडा’ या तिसऱ्या विक्रमाची नोंद केली.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव -2021 च्या समारोप समारंभाला गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्य सचिव परिमल राय; भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम. रविचंद्रन ; सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर मांडे, सहसचिव इंदिरा मूर्ती आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटक सचिव जयंत सहस्रबुद्धे उपस्थित होते.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या भाषणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतीय मूल्यांचे जतन करण्याच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “आपल्या स्वतःच्या विचारांचा प्रसार करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. कोविड-19 महामारीमध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी 9 महिन्यांत लस विकसित करण्यात यश मिळवले आणि लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडली. विज्ञान आणि अभिनवतेचा उत्सव साजरा करण्याचे हे उदाहरण आहे. आपल्या देशातील भव्य नद्यांप्रमाणे विचारांना वाहू द्या. पुढील 25 वर्षांत भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात आघाडीचे राष्ट्र म्हणून उत्तुंग झेप घेईल. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव गोव्याला विज्ञानाचे केंद्र बनण्यास मदत करेल."
भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी आपल्या भाषणात सलग तीन दिवस तीन गिनीज विक्रम नोंदवणाऱ्या आयोजकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात हा महोत्सव यशस्वी ठरत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. शेखर मांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात शेतकरी मेळाव्याद्वारे भारतात दालचिनीची लागवड सुरू करून इतिहास घडवला आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा विज्ञानाचा उत्सव आहे. गेल्या सहा महोत्सवांमधून आयआयएसएफ हे प्रत्येक नागरिकाला विज्ञानाशी जोडण्याचे व्यासपीठ बनले आहे. आयआयएसएफ- 2021 हे प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल अशा दोन्ही पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. 10,000 हून अधिक प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते आणि 20,000 व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवात 25 देशांतील 100 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. विज्ञानाबाबत संवाद साधणारा ‘विज्ञानिका’ हा विज्ञान साहित्य महोत्सव यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात शेकडो लेखक, कलाकार सहभागी झाले होते.
आयआयएसएफमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत असलेल्या 300 मॉडेल्सचे प्रात्यक्षिक दाखवले. ‘विज्ञान ग्राम महोत्सवा’च्या माध्यमातून गोव्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 200 पारंपारिक हस्तकला कारागिरांनी महोत्सवात सहभाग घेतला आणि पारंपारिक विज्ञानाची माहिती दिली. 'जागृत भारत इकोफेस्ट' मध्ये देशभरातील शालेय मुलांनी सामील होऊन पर्यावरण संरक्षणाविषयीचे त्यांचे किस्से सांगितले.
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान भारती (व्हीआयबीएचए) यांचा संयुक्त कार्यक्रम आहे.
आयआयएसएफचा पहिला कार्यक्रम 2015 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या वार्षिक कार्यक्रमाची सहावी आवृत्ती 2020 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आयआयएसएफ चा मुख्य उद्देश भारतातील आणि जगभरातील लोकांसह विज्ञानाचा सोहळा साजरा करणे हा आहे.
* * *
M.Chopade/Sushma/Vinayak/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1781291)
Visitor Counter : 196