मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात राज्यस्तरीय बैठक
केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मडगाव येथे नवीन मासळी बाजाराची घोषणा केली
Posted On:
11 DEC 2021 7:53PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात 11 डिसेंबर 2021 रोजी गोव्यात केंद्र सरकारच्या सुधारित आणि पुनर्र्चीत पशुधन योजनांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सहसचिव, मत्स्योद्योग विभागाचे सहसचिव, गोव्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्य सचिव आणि संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या योजनांमधील विविध बदल अधोरेखित केले आणि विभागाच्या सुधारित आणि पुनर्रचित योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला. योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य हा प्रमुख हितधारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनांमध्ये आता प्रजनन संबंधी उद्योजक आणि चारा उद्योजकांचे घटक आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत, शेतकऱ्यांना उच्च जनुकीय गुणवत्तेच्या प्रजातींचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी प्रजनन फार्मसाठी, उद्योजकांना 50% भांडवली अनुदान थेट उपलब्ध करून दिले जाईल. राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ग्रामीण उद्योजकता निर्माण करण्यात मदत करेल तसेच बेरोजगार तरुण आणि पशुसंवर्धन करणाऱ्यांना गुरेढोरे, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, डुक्कर पालन, खाद्य आणि चारा या क्षेत्रातील उत्तम उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यात मदत करेल ज्यामुळे आत्मनिर्भर भारताचा मार्ग सुकर होईल.

दुग्धव्यवसाय विकासासाठी पुनर्रचित राष्ट्रीय कार्यक्रम (NPDD) दूध खरेदी, प्रक्रिया, विपणन आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता आणि पशुधन आणि कोंबड्यांच्या रोगप्रतिबंधक लसीकरण ,पशुवैद्यकीय सेवांची क्षमता वाढवणे, रोगांवर देखरेख आणि पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करणे या उपाययोजनांसह जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका कमी करण्याच्या उद्देशाने पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण यावर भर देतो.
या बैठकीदरम्यान, पशुधन शेतकऱ्यांवरील यशोगाथा सर्व सहभागींना दाखवण्यात आल्या आणि NLM/AHIDF पोर्टलवर थेट प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.

केंद्रीय मंत्र्यांनी पशुधन क्षेत्रातील विविध उदयोन्मुख समस्यांबाबत राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि उद्योजक/हितधारक/शेतकरी/राज्य पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे अधिकारी/आयसीएआर वैज्ञानिक /दूध महासंघाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
भारतातील नील क्रांतीने मत्स्यव्यवसाय आणि जलशेती क्षेत्राचे महत्त्व दाखवून दिले यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. हे क्षेत्र उदयोन्मुख क्षेत्र मानले जाते आणि भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी ते सज्ज आहे. पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत आणि जबाबदार विकास, तसेच मच्छिमार, मत्स्यपालक आणि मत्स्य कामगार यांचा सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी याची अंमलबजावणी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत केली जाणार आहे.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोव्यात गुरांसाठी लवकरच दोन फिरत्या पशुवैद्यकीय उपचार व्हॅन/रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गोव्यातील दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मोबाईल व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. रुपाला म्हणाले की , ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पशुसंवर्धन करणाऱ्यांच्या घराघरात तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. योजनेचा एक भाग म्हणून देशभरात गुरांसाठी फिरती रुग्णवाहिका सुविधा सुरू करण्यात येत आहे. मडगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने या बाजारासाठी 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे, हा बाजार इतर राज्यांसाठी देखील एक अनुकरणीय मॉडेल ठरेल.
रुपाला यांनी गुरांसाठी विविध जनुकीय सुधारणा प्रकल्पांचा तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या इतर विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेतला.
Status of Progress of KCC
Fisheries Profile of Goa
State Profile of Goa
Handbook on Animal Husbandry and Dairying
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780532)
अभ्यागत कक्ष : 361