ऊर्जा मंत्रालय
"ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय जागरूकता मोहीम"
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
दोन गटातील 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये, 30,000 रुपये आणि 20,000 रुपयांचे बक्षीस आणि 20 उत्तेजनार्थ पारितोषिके
Posted On:
10 DEC 2021 5:38PM by PIB Mumbai
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे आज राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. इयत्ता 5 ते 7 आणि इयत्ता 8 ते 10 या दोन गटातील 6 विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. हे विजेते नवी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी गोव्याचे प्रतिनिधित्व करतील. यावेळी श्री एस. रविंदर कुमार, कार्यकारी संचालक, पश्चिम क्षेत्र, श्री महेश वेंगुर्लेकर, सेवानिवृत्त प्राचार्य, गोवा ललित कला महाविद्यालय, विवेक वसंत बेलोकर, सहायक संचालक; तंत्रशिक्षण संचालनालय आणि श्री आर. नारायण, व्यवस्थापकीय संचालक , पॉवर ग्रीड उपस्थित होते.
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विद्यार्थ्यांना व्यासपीठ आणि मार्गदर्शन देऊन त्यांचे संगोपन करेल, असे श्री रविंदर कुमार म्हणाले. गोवा ललित कला महाविद्यालय आणि विविध शाळांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
ऊर्जा मंत्रालयाच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर्फे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन अभियानांतर्गत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ‘ऊर्जा कार्यक्षम भारत’ आणि ‘अधिक स्वच्छ ग्रह ’ या विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इयत्ता 5 ते 7 आणि इयत्ता 8 वी ते 10 अशा दोन गटात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातून एकूण 2235 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
5 वी ते 7 वी इयत्तेच्या गटातील सारा परेराला प्रथम, खुशी पेडणेकर आणि वेरियन वलादारेस यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले. इयत्ता 8 वी ते 10 वी गटातील कनिष्क फळदेसाई हिला प्रथम तर आर्यन वेंगुर्लेकर व कुणाल बार यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक रु. 50,000, द्वितीय पारितोषिक रु. 30,000 आणि तृतीय पारितोषिक रु. 20,000 देण्यात आले. तर यावेळी प्रत्येक गटातील 10 जणांना 7500 रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
ऊर्जा मंत्रालयाने देशात ऊर्जा संवर्धनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय जागरूकता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतील उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणून शाळा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना केवळ ऊर्जा बचतीच्या गरजेबद्दल जागरूक केले जात नाही तर त्याच वेळी या कार्यात त्यांच्या पालकांना शिक्षित आणि सहभागी करून घेता येईल. निवडलेला उपक्रम हा अनेक उपायांपैकी एक आहे, जो देशांतर्गत क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यास मदत करू शकतो.
***
S.Thakur/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1780202)
Visitor Counter : 201