कृषी मंत्रालय
आयसीएआर- सीसीएआरआय, गोवा यांनी साजरा केला 'जागतिक मृदा दिन'
Posted On:
06 DEC 2021 2:20PM by PIB Mumbai
गोवा, 6 डिसेंबर 2021
आयसीएआर - केन्द्रीय तटवर्ती कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय), जुने गोवा आणि आयसीएआर - कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), उत्तर गोवा यांनी 5 डिसेंबर 2021 रोजी 'जागतिक मृदा दिन' साजरा केला. 'जमिनीचे क्षारीकरण थांबवा, मातीची उत्पादकता वाढवा' ही वर्ष 2021 साठीची जागतिक मृदा दिवसाची (डब्लूएसडी) संकल्पना आहे.
केंद्रीय पर्यटन आणि बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग, राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी त्यांनी मातीचे महत्त्व विशद केले. मातीला आपली आई असे संबोधत तिचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा कसा घनिष्ठ संबंध आहे हे सांगितले. त्यांनी, कृषी उत्पादकता वाढवणे आणि गोवा तसेच किनारी भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्याच्या दिशेने आयसीएआर-सीसीएआरआय आणि आयसीएआर-केव्हीकेने केलेल्या कामाची प्रशंसा केली.
शेतकर्यांचे पारंपरिक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मिलाफ करून ‘आत्मनिर्भर गोवा’चे स्वप्न साकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी जागतिक मृदा दिनाच्या वर्तमान संकल्पना आणि किनारपट्टीवरील खारपट्टयातील माती (स्थानिक भाषेत खझान) या विषयावर जोर देऊन, त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्या शाश्वत उपयोगासाठी योग्य धोरणे सुचवली. माती परीक्षणावर आधारित खतांचा विवेकपूर्ण वापर करण्यावर आणि राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला.
डॉ. परवीन कुमार, संचालक, आयसीएआर – सीसीएआरआय, गोवा यांनी त्यांच्या भाषणात जागतिक मृदा दिन साजरा करण्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्यांनी राज्यातील मातीचे आरोग्य आणि त्याची स्थिती याबद्दल माहिती दिली. जमिनीच्या ऱ्हासाची व्याप्ती आणि प्रमाण अधोरेखित करून त्यांनी योग्य तंत्रज्ञानाच्या गरजेवर भर दिला. त्यांनी संस्था आणि तिची कामगिरी आणि गोवा तसेच किनारपट्टीच्या इतर भागातील कृषी विकासात संस्थेने कसे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे याबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी कृषी-पर्यटनाला मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन केले जेणेकरून तरुणांना शेतीकडे आकर्षित करून या क्षेत्रात टिकवून ठेवता येईल.
एचआरसी प्रभू, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्रभारी, आयसीएआर-केव्हीके, उत्तर गोवा यांनी मान्यवरांचे आणि सहभागींचे स्वागत केले आणि 'जागतिक मृदा दिवस' तसेच वर्ष 2021 च्या संकल्पनेबद्दल थोडक्यात माहिती दिली.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ. गोपाल रामदास महाजन, शास्त्रज्ञ (मृदा विज्ञान), आयसीएआर- सीसीएआरआय यांचे 'खताचा संतुलित वापर', शशी विश्वकर्मा, तांत्रिक अधिकारी (मृदा विज्ञान), आयसीएआर - केव्हीके, उत्तर गोवा यांचे 'मातीचे नमुने आणि विश्लेषण' आणि बीके दर्शना दीदीजी, ब्रह्म कुमारी, गोवा यांच्या 'योगिक शेती' या विषयांवरील व्याख्यानांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना 100 मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, विषय तज्ञ व संस्था आणि केव्हीकेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका सुरेश सिंग, एसएमएस (Agril. Extn.), आयसीएआर - केव्हीके, उत्तर गोवा यांनी केले. तर राहुल कुलकर्णी, एसीटीओ (मृदा विज्ञान), आयसीएआर- सीसीएआरआय, गोवा यांनी आभार मानले. विश्वजीत प्रजापती, तांत्रिक अधिकारी (संगणक), आयसीएआर- केव्हीके, उत्तर गोवा यांनी याचे दस्तऐवजीकरण केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वयन एच आर सी प्रभू, डॉ गोपाल रामदास महाजन, डॉ मोनिका सुरेश सिंग, शशी विश्वकर्मा, राहुल कुलकर्णी आणि विश्वजीत प्रजापती यांनी केले.
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778429)
Visitor Counter : 234