दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘गोवापेक्स 2021’ टपाल तिकीट संग्रहाच्या पहिल्या जिल्हास्तरीय आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
30 NOV 2021 9:54PM by PIB Mumbai
गोवा, 30 नोव्हेंबर 2021
गोवा टपाल विभागाच्या वतीने तिकीट संग्रहाचे जिल्हा स्तरावरील आभासी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी. मेनन यांच्या हस्ते झाले. अशा प्रकारे तिकीट संग्रहाचे आभासी प्रदर्शनाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पोस्टमास्टर जनरल कर्नल एस.एम.एच रिझवी, गोवा टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे आणि गोवा तिकीट आणि नाणी संग्राहक संस्थेचे प्रमुख तसेच तिकीट संग्रहाचा छंद जोपासणारे उपस्थित होते.

यावेळी विविध गोष्टींचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये 1. अगवादच्या किल्ल्याच्या चित्राचा शिक्का, 2. तसेच विशेष फेरीबोटीच्या चित्राचा लिफाफा आणि शिक्का. 3. गोव्याच्या जैवविविधतेचे प्रतीक म्हणून फुलपाखरू आणि पतंग यांची चित्रमय पोस्टकार्डे. 4. ‘टिन कॅन मेल एक्सपेरिमेंट’चा विशेष लिफाफा आणि शिक्का यांचा समावेश आहे.
गोवा फिलाटेलिक आणि न्युमिस्मॅटिक सोसायटी, यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘टिन कॅन मेल एक्सपेरिमेंट’चा विशेष लिफाफा आणि शिक्का यांची निर्मिती गोव्याच्या नदी जलवाहतूूक विभागाच्यामदतीने करण्यात आली आहे. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. हरिलाल बी. मेनन म्हणाले, तिकिटांवर इतिहास प्रदर्शित करण्याचे काम प्रशंसनीय आहे. याबद्दल टपाल विभागाचे त्यांनी अभिनंदन केले. कदाचित चक्रीवादळ आणि अज्ञात शास्त्रज्ञांवरही शिक्के बनवले जावू शकतील. गेल्या 10 वर्षातल्या चक्रीवादळांची कालक्रमानुसार नोंदी केल्या गेल्या तर आजच्या तरूण पिढीला इतिहासातल्या घटनांचे स्मरण देण्यासाठी मदत होवू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पोस्टमास्टर जनरल कर्नल एस.एफ.एच.रिझवी यांनी या आभासी प्रदर्शनाला शुभेच्छा देवून आपले पाठबळ असल्याचे सांगितले.
गोवा विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे यांनी आपल्या भाषणामध्ये गोव्याची समृद्ध सामाजिक- आर्थिक विविधता तिकिटांच्या माध्यमातून चित्रीत करण्याची भूमिका कौतुकास्पद आहे, या मुद्यावर प्रकाश टाकून तरूण पिढीने तिकिटांचे महत्व समजून घ्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये प्रकाशित करण्यात आलेले सर्व लिफाफे आणि शिक्के पणजीच्या मुख्य टपाल कार्यालयात, फिलाटली ब्युरोमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776621)
Visitor Counter : 152