माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 7

“शांतता असताना तुम्ही प्रेमात पडू शकता..”: सेतारे एस्कंदरी, 52 व्या IFFI मधील जागतिक चित्रपट पॅनोरमातील ‘द सन ऑफ दॅट मून’ या चित्रपटाची दिग्दर्शक


“आपल्याला हल्ली शांतता आणि प्रेम या गोष्टींचा विसर पडला आहे. या चित्रपटाच्या द्वारे मला प्रेम या भावनेची ताकद दर्शवायची होती आणि त्याचबरोबर स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री हक्कांचा पुरस्कारही करायचा होता.” - सेतारे एस्कंदरी

पणजी, 26 नोव्‍हेंबर 2021 

 

या चित्रपटात एका विधवा स्त्रीचे अपार दुःख आणि त्यातून निर्माण झालेली मूक राहण्याची तीव्र इच्छा दिसते. या परिस्थितीत तिच्या बालपणीच्या मित्राचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो आणि तिच्या अंधारलेल्या हृदयात पुन्हा एकदा प्रेमाची ज्योत फुलते.

बलोचि चित्रपट ‘द सन ऑफ दॅट मून’ हा सेतारे एस्कंदरी यांचा दिग्दर्शिका म्हणून पहिला चित्रपट आहे. विधवा बीबनच्या अंतर्मनातील खळबळ आणि परंपरावादी समाजाचा  तिच्या बालमित्राबद्दल असलेल्या प्रेमभावनेला विरोध या चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

बलोची भाषेत या चित्रपटाचे नाव आहे ‘खोरशिद- ए आन माह’ . सध्या गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  या चित्रपटाचे जागतिक प्रीमियर पार पडले. या चित्रपटाचे कथानक दक्षिण पूर्व इराणमधील सीस्तान आणि बलुचिस्तान मध्ये घडते. महोत्सवातील जागतिक पॅनोरमा विभागात तो सादर झाला आहे.

या चित्रपटात इराणी स्त्रियांचे अतिसामान्य जीवन आणि  इराणी संस्कृतीची आजवर अंधारात असलेली बाजू दाखवण्याचा प्रयत्न इस्कंदारी यांनी केला आहे. काल २५ नोव्हेम्बर २०२१ रोजी झालेल्या एका वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी या चित्रपटामागील प्रेरणेबद्दल सांगितले.

आपल्या जीवनातील हरवलेल्या प्रेम आणि शांततेच्या भावना पुन्हा एकदा जागृत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित  केली . “सध्याचे जग हिंसा आणि तिरस्काराने ग्रासलेले आहे, आपलयाला शांतता आणि प्रेम या भावनांचा जणू  विसर पडला आहे. या चित्रपटाच्या द्वारे मला प्रेम या भावनेची ताकद दर्शवायची होती आणि त्याचबरोबर स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री हक्कांचा पुरस्कारही  करायचा होता.”

चित्रपटाच्या नावाबद्दल इस्कंदारी म्हणाल्या, “इराणी संस्कृतीत पुरुषाला सूर्य तर स्त्रीला चंद्र मानले आहे. ही नावे अनुक्रमे  प्रकाश आणि अंधाराचे प्रतिनिधित्व करतात. या चित्रपटात पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे जीवन कसे अंधःकारमय असते ते दाखवले आहे. म्हणून हे नाव या चित्रपटासाठी निवडले आहे.”

इराणी जनतेला भारतीय चित्रपट फारच प्रिय आहेत असे त्यांनी सांगितल्यामुळे उपस्थित प्रतिनिधी आनंदित झाले.

इराणच्या खोरासान प्रांतात जन्मलेल्या सेतारे इस्कंदारी या पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी  नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर आपल्या  कामाचा  ठसा उमटवला आहे. इराणमधील नाट्यक्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या अली रफी यांच्या 'दे ट्रूप' या संस्थेत त्या कार्यरत होत्या. त्या दूरचित्रवाणीवरील  तसेच रंगमंचीय नाटकांचे दिग्दर्शनही करतात. ‘द सन ऑफ दॅट मून’ हा दिग्दर्शक या नात्याने त्यांचा पहिला चित्रपट आहे. 

 

* * *

Jaydevi PS/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

iffi reel

(Release ID: 1775433) Visitor Counter : 230


Read this release in: English , Urdu , Hindi