पंतप्रधान कार्यालय

उत्तरप्रदेशातील जेवर इथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिला समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 25 NOV 2021 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

भारत माता की जय, भारत माता की जय!

उत्तर प्रदेशचे कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, इथले कर्तृत्ववान, आमचे जुने सहकारी, उप-मुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्या जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, जनरल व्ही के सिंग जी, संजीव बालीयान जी, एस. पी. सिंग बघेल जी, बी. एल. वर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री लक्ष्मी नारायण चौधरी जी, श्री जयप्रकाश सिंग जी, श्रीकांत शर्मा जी, भूपेंद्र चौधरी जी, श्री नंदगोपाल गुप्ता जी, अनिल शर्मा जी, धर्म सिंग जी, अशोक कटारिया जी, श्री जी. एस. धर्मेश जी, संसदेतील माझे सहकारी डॉ महेश शर्मा जी, श्री सुरेंद्र सिंग नागर जी, श्री भोला सिंग जी, स्थानिक आमदार श्री धीरेंद्र सिंग जी, मंचावर विराजमान इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि लाखोंच्या संख्येत आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना, देशाच्या लोकांना, उत्तर प्रदेशच्या आमच्या कोटी कोटी बंधू आणि भगिनींना नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आज या विमानतळाच्या भूमिपूजनासोबतच, दाऊ जी जत्रेसाठी प्रसिद्ध असलेलं जेवर देखील आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. याचा खूप मोठा फायदा दिल्ली - राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या कोटी कोटी लोकांना होईल. मी यासाठी आपणा सर्वांचे, संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

21व्या शतकातला भारत, आज एकापेक्षा एक उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. उत्तम रस्ते, उत्तम रेल्वेचे जाळे, उत्तम विमानतळे, हे केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पच नसतात, तर ते संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करतात, लोकांच्या जीवनात त्यामुळे अमुलाग्र बदल घडून येतात. गरीब असो अथवा मध्यमवर्गीय, शेतकरी असोत अथवा व्यापारी, मजूर असोत अथवा उद्योगपती, प्रत्येकालाच याचा खूप खूप लाभ मिळतो. जेव्हा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अखंड संपर्कव्यवस्था असते, शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण सुविधा असतात, तेव्हा त्यांचे मूल्य आणि शक्ती अनेक पटींनी वाढते. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, दळणवळणाच्या दृष्टीने देखील एक सर्वोत्तम उदाहरण ठरेल. इथे येण्या जाण्यासाठी टॅक्सी पासून मेट्रो आणि रेल्वेपर्यंत, प्रत्येक प्रकारची साधने उपलब्ध असतील. विमानतळातून बाहेर पडताच तुम्ही थेट यमुना द्रुतगती मार्गावर येऊ शकता, नोएडा - ग्रेटर नोएडा द्रुतगती मार्गापर्यंत जाऊ शकता. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा कुठेही जायचं असेल तरी कमी वेळात बाह्य द्रुतगती मार्गावर पोहोचू शकता. आणि आता तर दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्ग देखील तयार होणार आहे. त्याद्वारे देखील अनेक शहरांत पोहोचणं सोपं होईल. इतकंच नाही, येथून समर्पित मालवाहू मार्गिकेवर जाण्यासाठी थेट संपर्कव्यवस्था असणार आहे. एकप्रकारे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर भारतातील लॉजिस्टिक सुविधांचे महाद्वार मानेल. हे या संपूर्ण क्षेत्राचे आणि राष्ट्रीय गतिशक्ती बृहद आराखड्याचे सशक्त प्रतीक बनेल.

मित्रांनो,

आज देशात ज्या जलद गतीने नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा विकास होतो आहे, ज्या गतीने भारतीय कंपन्या शेकडो विमानांची खरेदी करत आहेत,या सर्व घडामोडींसाठी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची भूमिका खूप मोठी असेल. हे विमानतळ, विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि कार्यान्वयनासाठी देखील हे देशातील सर्वात मोठे केंद्र असेल. इथे 40 एकर जागेवर देखभाल, दुरुस्ती आणि एमआरओ दुरुस्ती सुविधा केंद्र विकसित केले जाणार आहे, देशविदेशातील विमानांनाही इथे सेवा मिळतील. आणि शेकडो युवकांना इथे रोजगार मिळेल.

आपण कल्पना करा, आजदेखील आपण 85 टक्के विमानांना एमआरओ सेवेसाठी परदेशात पाठवतो.  या कामासाठी दरवर्षी आपले 15 हजार कोटी रुपये खर्च होतात. आपला हा प्रकल्प केवळ 30 हजार कोटी रुपयांत पूर्ण होणार आहे. केवळ दुरुस्तीसाठी आपले 15 हजार कोटी रुपये देशाबाहेर जातात. हजारो कोटी रुपये खर्च होतात. ज्याचा बहुतांश भाग इतर देशांकडे जातो. आता हे विमानतळ ही स्थिती बदलण्यात सहकार्य करेल.

बंधू आणि भगिनींनो,

या विमानतळाच्या माध्यमातून पहिल्यांदाच देशात एकात्मिक बहू-पर्यायी मालवाहतूक केंद्र देखील साकारले जाणार आहे. यामुळे या संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळणार आहे,नवे उड्डाण मिळेल. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की ज्या राज्यांच्या सीमा समुद्रकिनाऱ्याला लागून असतात, त्यांच्यासाठी बंदरे ही खूप महत्त्वाची संधी असते.विकासासाठी त्याची ताकद अत्यंत उपयुक्त ठरत असते. मात्र उत्तरप्रदेशासारख्या चहूबाजूंनी भू-सीमा असलेल्या राज्यांसाठी हेच महत्त्व विमानतळाचे असते. इथे अलिगढ, मथुरा, मीरत, आग्रा, बीजनौर, मुरादाबाद, बरेली यांसारखी अनेक औद्योगिक क्षेत्र आहेत. इथे सेवा क्षेत्राची एक मोठी व्यवस्था देखील आहे, आणि कृषी क्षेत्राचे देखील पश्चिम उत्तर प्रदेशाच्या विकासात मोठे योगदान आहे. आता या विमानतळामुळे या क्षेत्राचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय विमानतळ, निर्यातीचे एक खूप मोठे केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारांशी थेट जोडले जाणार आहे. आता इथले शेतकरी मित्र, विशेषतः छोटे शेतकरी, फळे-भाजी, मासे यांसारख्या नाशवंत वस्तूंची सहज निर्यात करु शकतील. आपल्या खुर्जा भागातले सिरॅमिक कारागीर, मीरतचा खेळण्यांचा उद्योग, सहारनपूरचा फर्निचर उद्योग, मुरादाबादचा पितळेच्या वस्तूंचा उद्योग, आग्र्याची पादत्राणे आणि पेठा उद्योग , आणि पश्चिम उत्तर प्रदेशात असलेल्या अनेक एमएसएमई क्षेत्रांनाही परदेशी बाजारपर्यंत पोहचवणे आणखी सोपे जाणार आहे.

मित्रांनो,

कोणत्याही प्रदेशात विमानतळ आल्याने परिवर्तनाचे एक असे चक्र सुरु होते, ज्यामुळे चारही दिशांपर्यंत लाभ पोचतो. विमानतळाच्या निर्मितीदरम्यान रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतात. विमानतळ सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी देखील हजारो लोकांची गरज असते.पश्चिम उत्तरप्रदेशातल्या हजारो लोकांना हे विमानतळ रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. राजधानी जवळ असल्यामुळे आधी अशा क्षेत्रांना विमानतळाच्या सुविधांशी जोडले जात नसे. असे समजले जात असे की दिल्लीत विमानतळाच्या इतर सुविधा आहेतच, मग इतर ठिकाणी त्याची काय गरज. आम्ही हा विचार बदलला आहे. आज बघा, आम्ही हिंडन विमानतळ प्रवासी सेवांसाठी सुरु केले आहे. याचप्रमाणे हरियाणातील हिस्सार इथेही विमानतळाचे काम जलद गतीने सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा हवाई वाहतूक सुविधा वाढतात, तेव्हा पर्यटन क्षेत्राचा  देखील विकास होतो. आपण सर्वांनी बघितलं आहे, की माता वैष्णो देवी यात्रा असो की केदारनाथ यात्रा, हेलिकॉप्टर सेवा सुरु झाल्यापासून भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रसिद्ध पर्यटन आणि श्रद्धास्थानांबाबत नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हेच होतांना दिसेल. 

मित्रांनो,

स्वातंत्र्य मिळून सात दशके झाल्यानंतर, पहिल्यांदाच उत्तर प्रदेशाला त्याच्या हक्काच्या गोष्टी मिळायला लागल्या आहे. या गोष्टींवर राज्याचा वास्तविक नेहमीच अधिकार, हक्क होता. डबल इंजिनाच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज उत्तर प्रदेशला आता देशाच्या इतर सर्व भागाशी सहजपणे संपर्क साधता येतो. सर्वात अधिक जोडलेल्या क्षेत्रामध्ये हे राज्य परिवर्तित होत आहे.  पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये लाखो-कोट्यवधी रूपयांच्या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. रॅपिड रेल कॉरिडॉर असो, एक्सप्रेस वे असो, मेट्राच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा असो, पूर्व आणि पश्चिमेकडील सागरी मार्गाने उत्तर प्रदेशला जोडणा-या समर्पित मालवाहतूक मार्ग असो, अशा आधुनिक विकासकामांमुळे उत्तर प्रदेशची आता नवीन ओळख बनत चालली आहे. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उत्तर प्रदेशला अनेकांकडून नाइलाजाने टीकेची बोलणी खावी लागत होती. कधी गरीबीविषयी बोलणी, कधी जाती-पातीच्या राजकारणावरून टीका, तर कधी हजारों कोटींच्या घोटाळ्यांवरून टीका, कधी गुन्हेगारी- माफिया आणि राजनीती यांच्या साटेलोट्याविषयी बोलणी, उत्तर प्रदेशातल्या कोटी- कोटी सामर्थ्यवान लोकांचा हाच प्रश्न होता की, खरोखरीच उत्तर प्रदेशची एक सकारात्मक प्रतिमा कधी बनू शकणार आहे की नाही?

बंधू आणि भगिनींनो,

आधीच्या सरकारांनी ज्या प्रकारे उत्तर प्रदेशला अभाव आणि अंधःकारामध्ये कायम ठेवले, आधीच्या सरकारांनी ज्या प्रकारे उत्तर प्रदेशाला नेहमी खोटी स्वप्ने दाखवली, तोच उत्तर प्रदेश आज राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी छबी निर्माण करून चांगली छाप पाडत आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वैद्यकीय संस्था निर्माण होत आहेत. महामार्ग, दृतगती मार्ग, आंतरराष्ट्रीय दर्जाची रेलमार्गाची संपर्क यंत्रणा, आज उत्तर प्रदेशात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गुंतवणूक केंद्र आहे. हे सर्व काही आज आपल्या उत्तर प्रदेशमध्ये होत आहे. म्हणूनच आज देश आणि दुनियेतले गुंतवणूकदार म्हणतात की, उत्तर प्रदेश म्हणजे उत्तम सुविधा, निरंतर गुंतवणूक. उत्तर प्रदेशची ही आंतरराष्ट्रीय ओळख बनल्यामुळे राज्याची आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क यंत्रणा आता नवीन ‘आयाम’ देत आहे. आगामी 2-3 वर्षांमध्ये ज्यावेळी या विमानतळाचे काम पूर्ण होईल, त्यावेळी उत्तर प्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य बनेल.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशमध्ये आणि केंद्रामध्ये आधी जी सरकारे होती, त्यांनी कशा प्रकारे पश्चिम उत्तर प्रदेशच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले, याचे एक उदाहरण म्हणजे हे जेवर विमानतळ आहे. दोन दशकापूर्वी उत्तर प्रदेशमधल्या भाजपा सरकारने या प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. परंतु नंतर या विमानतळाच्या कामाचा प्रश्न दिल्ली आणि लखनौ येथे आधी जी सरकारे होती, त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचाच्या खेळात अडकून पडला. उत्तर प्रदेशमध्ये आधी जे सरकार होते, त्या सरकारने तर रितसर पत्र लिहून, त्यावेळी जे केंद्रात सरकार होते, त्यांना कळवून टाकले की, या विमानतळाचा प्रकल्प बंद करून टाकला जाईल. आता डबल इंजिनाच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे आज आपण त्याच विमानतळाच्या भूमिपूजनाचे साक्षीदार बनत आहोत.

तसे पाहिले तर मित्रांनो, आज आणखी एक गोष्ट मी सांगणार आहे. मोदी- योगी यांची जर इच्छा असती तर 2017 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर इथे येवून भूमिपूजन केले असते. छायाचित्रे काढली असती. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या असत्या. आणि असे काही आम्ही केले असते तर आधीच्या सरकारची सवय सर्वांना असल्यामुळे त्यामध्ये आम्ही काही चुकीचे करीत आहोत, असे लोकांनाही वाटले नसते. आधी राजकीय लाभासाठी गडबडीमध्ये चिल्लर वाटल्याप्रमाणे पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली जात होती. कागदांवर रेषा ओढल्या जात होत्या. मात्र प्रकल्पाचे प्रत्यक्ष निर्माण काम कसे होणार, त्यामध्ये येणा-या अडचणी कशा पद्धतीने दूर केल्या जाणार, प्रकल्पासाठी लागणा-या निधीची तरतूद कुठून करणार, यावर कोणत्याही प्रकारे विचार केला जात नव्हता. या कारणांमुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प दशके उलटले तरी पूर्ण होत नव्हती. घोषणा होत होती. प्रकल्पाचा खर्च अनेकपटींनी वाढत जात होता. नंतर मग बहाणेबाजी सुरू होत होती. प्रकल्पाला विलंब झाल्याचे खापर दुस-या कुणावर तरी फोडण्याची कसरत केली जात होती. मात्र आम्ही असे काही केले नाही. कारण पायाभूत प्रकल्प हे राजकारण करण्यासाठी नाहीत तर राष्ट्रनीतीचा- देशाच्या धोरणाचा एक भाग आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आहे. आम्ही हे सुनिश्चित करतो की, प्रकल्पाला विलंब होणार नाही, प्रकल्पाचे काम विनाकारण थांबवले जाणार नाही. आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो की, निश्चित केलेल्या विशिष्ट कालावधीच्या आतच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे काम पूर्ण व्हावे. जर विलंब झाला तर त्या संबंधित लोकांना दंड करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

मित्रांनो,

आधी शेतकरी बांधवांकडून भूमी संपादन करण्याच्या कामामध्ये घोटाळा केला जात होता. यामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब होत असे. आधीच्या सरकारांनी आपल्या काळामध्ये अनेक प्रकल्पांसाठी शेतक-यांकडून जमीन तर घेतली. मात्र त्यांना देण्यात येणा-या मोबदल्या विषयी अनेक समस्या उत्पन्न झाल्या. त्यामुळे वर्षानुवर्षे या जमिनी बेकार पडून राहिल्या. आम्ही शेतकरी बांधवांच्या हिताचा विचार केला. प्रकल्पाच्या हिताचा विचार केला आणि या अडचणीही दूर केल्या. आम्ही हे सुनिश्चित केले की, प्रशासनाने शेतकरी बांधवांकडून योग्य वेळी, व्यवहारामध्ये संपूर्ण पारदर्शकता ठेवून जमिनींची खरेदी करावी. आणि त्यामुळे आता 30 हजार  कोटी रूपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत.

मित्रांनो,

आज प्रत्येक सामान्य देशवासियांसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा सुनिश्चित केल्या जात आहेत. देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला हवाई प्रवास करणे शक्य व्हावे, त्याचे हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरवण्याचे काम उडाण योजनेने करून दाखवले आहे. आज ज्यावेळी कोणीही सहकारी आनंदाने सांगतो की, आपल्या घराजवळच्या विमानतळामुळे आपल्या माता-पित्यांबरोबर पहिल्यांदा विमानप्रवास केला, ज्यावेळी तो आपले छायाचित्र दाखवतो, त्यावेळी मला वाटते की, आपला प्रयत्न यशस्वी झाला. मला आनंद आहे की, एकट्या उत्तर प्रदेशातच गेल्या वर्षांमध्ये आठ विमानतळांवरून विमान सेवा सुरू झाली आहे. काही स्थानांवर ही सेवा सुरू करण्यासाठी काम सुरू आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या देशामध्ये काही राजकीय पक्षांनी नेहमीच आपल्या  स्वार्थाला सर्वाेच्च स्थानी ठेवले. या लोकांची विचार करण्याची पद्धत अशी आहे की, आपला स्वार्थफक्त आपल्या परिवाराचा विचार करायचा. आपण जिथे राहतो, त्या भागातल्या कामांना ते विकास मानत होते. मात्र आम्ही राष्ट्र प्रथम या भावनेने पुढे जात आहोत. ‘सबका साथ- सबका विश्वास, सबका विश्वास -सबका प्रयास’ हाच आमचा मंत्र आहे. उत्तर प्रदेशचे लोक याचे साक्षीदार आहेत. देशातले लोक साक्षीदार आहेत. गेल्या काही आठवड्यामध्ये काही राजकीय पक्षांकडून कशा प्रकारे राजकारण केले जात आहे, हे सर्वजण पहात आहेत. मात्र भारत विकासाच्या मार्गावरून मागे हटणार नाही. काही काळापूर्वीच भारताने 100 कोटी लसीच्या मात्रा देण्याचा अतिशय अवघड टप्पा पार केला आहे. या महिन्याच्या प्रारंभी भारताने 2070 पर्यंत ‘नेट जीरो’चे लक्ष्य गाठण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. उत्तर प्रदेशामध्येच एकाच वेळी नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रारंभ करण्यात  आला आणि देशाच्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यात आली. महोबामध्ये नवीन धरण आणि सिंचन योजनांचे लोकार्पण करण्यात आले तर झांशीमध्ये संरक्षण कॉरिडॉरच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या आठवड्यातच उत्तर प्रदेशवासियांना पूर्वांचल द्रूतगती मार्ग समर्पित करण्यात आला. त्याच्या एकच दिवस आधी आपण आदिवासी गौरव दिवस साजरा केला. मध्य प्रदेशमध्ये एक खूप भव्य आाि आधुनिक रेल्वे स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या महिन्यात महाराष्ट्रातल्या पंढरपूरमध्ये शेकडो किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला. आणि आता आज नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाले आहे. आमच्या राष्ट्रभक्तीसमोर, आमच्या राष्ट्र सेवेसमोर काही राजकीय पक्षांची स्वार्थनीती कधीच टिकू शकणार नाही.

मित्रांनो,

आज देशामध्ये 21 व्या शतकाच्या  आवश्यकता लक्षात घेवून अनेक आधुनिक प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. हीच गती, हीच प्रगती एका सक्षम आणि सशक्त भारत बनविण्याची हमी आहे. हीच प्रगती, सुविधा, सुगमता घेवून सामान्य भारतीयाची समृद्धी सुनिश्चित करण्यात येणार आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने डबल इंजिन सरकार कटिबद्ध असल्यामुळे उत्तर प्रदेश अग्रणी भूमिका निभावणार आहे. आपल्याला सर्वांना मिळून पुढे जायचे आहे. या विश्वासाने आपले आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो.

माझ्याबरोबर जयघोष करावा -

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप-खूप धन्यवाद!!

 

G.Chippalkatti/R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775320) Visitor Counter : 190