अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हज 2022 बाबत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्र्यांनी आज मुंबईत भारतीय हज समितीसोबत घेतली आढावा बैठक


हज 2022 साठी आतापर्यंत 20,000 हून अधिक नागरिकांचे अर्ज दाखल

हजसाठी ऑनलाइन आणि "हज मोबाईल ॲप" द्वारे नागरिक करत आहेत अर्ज

"मेहरम" शिवाय श्रेणीतील महिला अर्जदारांना सोडत प्रणालीतून सूट दिली जाणार, हज 2022 साठी या श्रेणीतील 2020 आणि 2021 मधील महिला अर्जदार पात्र

Posted On: 25 NOV 2021 3:42PM by PIB Mumbai

मुंबई, 25 नोव्हेंबर 2021

हज अनुदान रद्द करणे, मुस्लिम महिलांना "मेहरम" (पुरुष साथीदार) शिवाय हजला जाण्यावरील निर्बंध उठवणे, 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन हज प्रक्रिया यासारख्या प्रभावी आणि दूरदर्शी सुधारणांनी भारतीय मुस्लिमांसाठी "हज यात्रा सुलभ करणे " हे सुनिश्चित करण्यात आले आहे.  केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईतील हज हाऊस येथे हज 2022 च्या तयारीसंदर्भात भारतीय हज समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या  बैठकीनंतर ही माहिती दिली. हज 2022 ची संपूर्ण प्रक्रिया 100 टक्के डिजिटल/ऑनलाइन असेल, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय हज समितीचे पोर्टल; हज समूह आयोजकांसाठी पोर्टल ज्यात समूह आयोजक  आणि त्यांचे पॅकेज इत्यादी सर्व तपशील असतील; डिजिटल आरोग्य ओळखपत्र;"ई-मसिहा" आरोग्य सुविधा; मक्का-मदीनामधील निवास/वाहतुकीसंबंधी सर्व माहिती प्रदान करणारे  "ई-सामान  प्री-टॅगिंग" आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज "हज मोबाईल ॲप" ने भारतीय यात्रेकरूंसाठी पारदर्शक, परवडणारी आणि आरामदायी हज यात्रा सुनिश्चित केली आहे, असे मंत्री म्हणाले

हज 2022 दरम्यान कोरोना प्रतिबंधासाठी नियम लक्षात घेऊन, हज यात्रेकरूंची निवड प्रक्रिया ही दोन मात्रा घेऊन पूर्ण झालेले कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि भारत आणि सौदी अरेबिया सरकारने ठरवले निकष आणि मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार केली जाईल. 

1 नोव्हेंबरपासून हज साठी अर्ज दाखल करण्याची  प्रक्रिया सुरू झाली आहे.हज 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे. नागरिक हजसाठी ऑनलाइन आणि "हज मोबाईल अॅप" द्वारे अर्ज करत आहेत. हे अॅप "हज अॅप इन युवर हँड" या घोषवाक्यासह  अद्ययावत  करण्यात आले आहे.अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून  वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्यासाठी माहिती, अर्जदारांना अर्ज  भरण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती देणाऱ्या चित्रफितीं यात समाविष्ट आहेत

आतापर्यंत 20,000हून अधिक लोकांनी हज 2022 यात्रेसाठी अर्ज केला असून त्यामध्ये मेहरम श्रेणीशिवाय हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या 90 महिलांचा समावेश आहे.याआधी 2020 आणि 2021 या वर्षींच्या हज यात्रेसाठी 3000 हून अधिक महिलांनी मेहरम म्हणजे पुरुष सहकाऱ्याविना या श्रेणीअंतर्गत अर्ज केले होते.जर त्या महिलांना 2022 साली देखील यात्रा करायची असेल तर त्यासाठी त्यांचे आधीचे अर्ज पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय इतर महिला देखील मेहरम श्रेणीशिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज करू शकतात. मेहरम श्रेणीशिवाय यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांना लॉटरी पद्धतीतून सूट देण्यात आली आहे.  

केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की हज 2022 च्या यात्रेकरूंना यात्रा प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या 21 ऐवजी आता 10 प्रवासी बिंदू  व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदाबाद, बेंगळूरु, कोचीन,दिल्ली,गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता,लखनौ, मुंबई आणि श्रीनगर या 10 शहरांतून हज 2022 यात्रा प्रवास सुरु होईल.

अहमदाबादचा प्रवेश बिंदू संपूर्ण गुजरातेतील यात्रेकरूंसाठी असेल. तसेच बेंगळूरु प्रवेश बिंदू संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील चित्तूर साठी असेल. कोचीन प्रवेश बिंदू केरळ, लक्षद्वीप, पुदुचेरी, तामीळनाडू आणि अंदमान-निकोबार या भागांसाठी असेल. दिल्लीचा प्रवेशबिंदू दिल्ली, पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश,चंदीगड, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पश्चिमी जिल्ह्यांसाठी असेल, गुवाहाटी प्रवेश बिंदू आसाम, मेघालय, मणिपूर,अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालँड साठी असेल, हैदराबाद हे स्थानक आंध्रप्रदेश आणि तेलंगणासाठी असेल, कोलकाता प्रवेश बिंदू, पश्चिम बंगाल, ओदिशा,त्रिपुरा,झारखंड आणि बिहारच्या यात्रेकरूंसाठी असेल, लखनौ हे स्थानक उत्तरप्रदेशच्या पश्चिमी भागाखेरीज उर्वरित भागासाठी असेल, मुंबई हा बिंदू महाराष्ट्र, गोवा,मध्यप्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव तसेच दादरा आणि नगर हवेली यांसाठी असेल तर श्रीनगर हे ठिकाण,संपूर्ण जम्मू-काश्मीर,केह-लडाख आणि कारगिल क्षेत्रासाठी असेल.

हज यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू पाठविणारा आपला देश हा इंडोनेशियाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

 

Jaydevi PS/Sanjana/Sonal/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775032) Visitor Counter : 198


Read this release in: English