माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपटनिर्मात्यांना अखंड प्रेरणा देणारे सत्यजित रे यांचे चित्रपट पाहायलाच हवेत : एफटीआयआयच्या प्राध्यापकांचे इफ्फी 52 मास्टरक्लासमध्ये मार्गदर्शन


“सत्यजित रे यांनी रुळलेल्या वाटांवरून न जात आपले स्वतःच्या वाटा निवडत वैशिष्ठयपूर्ण चित्रपट निर्माण केले ”: प्रा. गंगा मुखी

Posted On: 22 NOV 2021 8:15PM by PIB Mumbai

पणजी, 22 नोव्‍हेंबर 2021 

 

“सिनेमाची स्वतःची भाषा असली पाहिजे, असे सत्यजित रे मानत असत.  स्वत:च्या अभ्यासातून त्यांनी स्वत:ची चित्रपटनिर्मितीची शैली निर्माण केली. रे यांचे चित्रपट सर्व चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट निर्मात्यांनी आवर्जून पाहायला हवेत. भौगोलिकता आणि भाषेचे अडथळे पार करत त्यांचे चित्रपट सर्वांनाच भावतात. असोसिएट प्रोफेसर, , फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,येथील दिग्दर्शन आणि पटकथा लेखन विभागातील सह प्राध्यापक   गंगा मुखी यांनी 52 व्या इफ्फीमध्ये आज आयोजित ' डायरेक्टोरिअल प्रॅक्टिसेस ऑन सत्यजित रे' या विषयावरील मास्टरक्लास दरम्यान मार्गदर्शन केले. मास्टरक्लास https://virtual.iffigoa.org/ वर प्रसारित झाला.

अनेक दशकांनंतरही रे  यांचे चित्रपट आजही कसे वैशिष्ठयपूर्ण ठरतात,हे प्रा. गंगा मुखी यांनी विशद केले.  " चित्रपट निर्मितीचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण रे यांनी घेतले नव्हते.  पण चित्रपट निर्मात्यांना ते अखंड प्रेरणा देणारे आहेत,"असे त्या म्हणाल्या.

त्यांनी सत्यजित रे यांच्या चित्रपट दिग्दर्शनाच्या कौशल्याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच, अपू  त्रयी साठी सत्यजित रे यांनी वापरलेल्या त्यांच्या खास शैलीविषयीही गंगा यांनी माहिती दिली.

रे यांचा चित्रपट त्यांच्या शीर्षकांपासूनच आपल्याशी संवाद साधायला सुरुवात करतो. चित्रपटाची श्रेयनामावली सुरू होताच, त्याचं स्वरुप आणि संकल्पना प्रेक्षकांना समजते, असेही त्यांनी सांगितले.

पथेर पांचाली मधील अगदी सुरुवातीचाच प्रसंग अत्यंत सुंदरतेने दाखवण्यात आला आहे. फ्रेममध्ये केवळ नायकाचे डोळेच आहेत; या डोळ्यातून प्रेक्षकांना सूचित करण्यात आले की या नायकाला बाहेरचे जग बघण्याची ओढ आहे.

 

रे यांच्या व्यक्तिरेखा अनेकदा दाराच्या चौकटीत, खिडकीच्या फ्रेममध्ये दाखवण्यात येतात. एखादी व्यक्तिरेखा तिथे आहे, आणि नाहीही, ती द्वीधा आहे, हे यातून ते प्रभावीपणे सूचित करतात.

एखादी गोष्ट थेट दाखवायची नसते, केवळ जाणवून द्यायची असते, मात्र, त्या दृश्यातील व्यक्तिरेखांच्या भावना थेट प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचवयाच्या असतात, अशी दृश्ये चित्रित करण्यात रे यांचा हातखंडा होता, असे त्यांनी पुढे सांगितले.

चित्रपट निर्मितीसाठी वापरल्या त्याच त्या चौकटीतत्या पद्धती मोडून नवे तंत्रज्ञान आणि पद्धत वापरण्याचे धाडस सत्यजित रे यांनी त्याकाळी कसे केले, हे ही गंगा यांनी सांगितले. यातूनच त्यांचे चित्रपट जगावेगळे ठरले, असे त्या म्हणाल्या.

सत्यजित रे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त या दिग्गज, जगप्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला आदरांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारतर्फे भारतात आणि परदेशात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत.

सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत आणि सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्षही आहे.त्यानिमित्ताने, इफफी जीवन गौरव पुरस्काराला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

 यंदा, म्हणजेच 52 व्या इफफीमध्ये अमेरिकन चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेझी आणि इस्तेवान सोबो यांना 20 नोव्हेंबर 2021 रोजी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

सत्यजित रे यांनी आधुनिक चित्रपट सृष्टीचा पाया रचला असे मानले जाते. जगभरातील चित्रपट रसिकांच्या मनात त्यांचे अढळ स्थान आहे.

* * *

Jaydevi PS/S.Kakade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774050) Visitor Counter : 195


Read this release in: Bengali , English , Urdu , Hindi