माहिती आणि प्रसारण मंत्रालय
52 व्या इफ्फीचा रंगतदार आणि भव्य सोहळ्याने शुभारंभ, चित्रपटनिर्मितीच्या प्रेरणारसाचा भरपूर आस्वाद घेण्याची संधी
52व्या इफ्फीमध्ये 73 देशांतल्या 148 आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह 300 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार
सत्यजित रे यांच्या चित्रपटांतून माझ्यासाठी एका नव्याच जगाचे दार उघडले गेले: सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार विजेते मार्टिन स्कॉरसेझी
सत्यजित रे यांचा तेजस्वी करिष्मा कायमच माझ्या स्मृतिपटलावर कोरला गेला: सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार विजेते इस्तेवान साबो
हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान
इफ्फी 52 मध्ये ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा
निवड झालेल्या विजेत्यांमध्ये बिहारमधील केवळ 16 वर्षांच्या प्रतिभावान तरुणाचा समावेश- माहिती आणि प्रसारणमंत्र्यांची माहिती
या, आणि भारतातील, चित्रपटांच्या विविधतेचे रंग एकत्रित दाखवणाऱ्या “चित्रपटांच्या कॅलिडोस्कोप” चा भाग व्हा : केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री
भारताला, जागतिक चित्रपट निर्मितीचे केंद्र, चित्रपटनिर्मात्यांसाठी आणि चित्रपट रसिकांसाठीही पसंतीचे स्थान बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट : अनुराग ठाकूर
ब्रिक्स चित्रपट महोत्सव आणि फोकस कंट्री विभागात ब्रिक्स राष्ट्रांमधील सर्वोत्तम चित्रपटांची मेजवानी
इफ्फीच्या इतिहासामध्ये यंदा प्रथमच प्रमुख ओटीटी मंचाचा सहभाग
पणजी, 20 नोव्हेंबर 2021
आपला देश आणि संपूर्ण जगच, आज कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या हिमालयाएवढ्या संकटांचा अत्यंत धैर्याने सामना करतो आहे, अशावेळी आपल्या सामूहिक मानवतेच्या निश्चय आणि चिकाटीमुळे या निराशेच्या वातावरणात, आता आशेचे किरण चमकू लागले आहेत. याच आशेतून आपला उत्तम वर्तमानकाळ आणि भविष्याचा पाठपुरवठा आपण करत आहोत.
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, अत्यंत कौशल्याने,निवडलेल्या उत्तमोत्तम भारतीय आणि जागतिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून, आज गोव्याची राजधानी पणजी इथे, श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयममध्ये महोत्सवाची अत्यंत रंगतदार आणि उत्तम कलाकृतीच्या सादरीकरणातून सुरुवात झाली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख चित्रपट कलाकारांनी सादर केलेल्या मनोरंजनाच्या भव्य आणि रंगारंग सोहळ्याने गोव्यातील पणजी येथे 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. अद्याप कोविड-19 चे आव्हान असतानाही यंदा हा महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे. यंदा मिश्र स्वरूपात चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले असले तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त देशांतून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 69 देशातून चित्रपट आले होते, यंदा 96 देशांमधून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हंगेरियन चित्रपट निर्माते आणि चित्रपट समीक्षक श्री. इस्तेवन स्झाबो आणि हॉलीवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेस यांना पहिला सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते पणजी गोवा इथे झालेल्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
21 व्या शतकातील चित्रपटांची सर्वोत्तम जाण असलेल्यांपैकी एक हॉलीवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेसी यांनी गुडफेलाज, टॅक्सी ड्रायव्हर, रेजिंग बुल, द डीपारटेड, शटर आयलंड, द वर्ल्ड ऑफ द वॉल स्ट्रीट या सारखे मास्टरपीस चित्रपट तयार केले आहेत.
त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहराच्या क्वीन्स येथे झाला. आणि त्यांनी द बिग शेव आणि इट्स नॉट जस्ट यू, मरे यासारख्या लघुटांद्वारे चित्रपट जगतात पाऊल ठेवले.
स्कॉरसेसी यांनी 1990 मध्ये द फिल्म फाउंडेशन ही सेवाभावी संस्था स्थापन केली, तर 2007 मध्ये वर्ल्ड सिनेमा फाउंडेशन आणि 2017 मध्ये आफ्रिकन फिल्म हेरिटेज प्रोजेक्ट सुरु केले. त्यांना या आधी गोल्डन ग्लोब, बीएएफटीए आणि अकॅडेमी अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या 50 पेक्षा अधिक वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत, स्कॉरसेसी यांनी 90 पेक्षा जास्त चित्रपट, माहितीपट, लघुपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि संगीत व्हिडिओ दिग्दर्शित केले आहेत आणि त्यांची निर्मिती केली आहे.
त्यांना गोल्डन ग्लोब, बाफ्टा आणि ऑस्करसह, चित्रपटसृष्टीतील अनेक मोठमोठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
इस्तेवान सोबो, हे चित्रपट समीक्षक आणि रसिकांमध्ये नावाजलेले हंगेरियन चित्रपट निर्माते आहेत. बुडापेस्टमध्ये जन्मलेल्या इस्तेवान यांना लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीत रस होता.
त्यांचे मास्टरपीस मानला जाणारा चित्रपट म्हणजे, मेफिस्तोसाठी, साबो यांना सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक चित्रपटविषयक ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांचे चित्रपट, फादर, कर्नल रेडल, सनशाईन, टेकिंग साईडस,बीइंग जुलिया इत्यादी चित्रपट रसिक आणि समीक्षक वर्तुळातही लोकप्रिय ठरले.
चित्रपटासाठी कथालेखन आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यासोबतच, त्यांनी लेखन, तिहो शो, लघुपट आणि माहितीपटांचीही निर्मिती केली आहे.
त्याशिवाय, अनेक चित्रपटांसाठी त्यांनी सहायक दिगार्षक, पटकथालेखक, निर्माते आणि कलाकार म्हणून अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांवर त्यांच्या खास दिग्दर्शन शैलीचा ठसा असतो. सोबो यांनी अनेक ऑपेरांचेही दिग्दर्शन केले आहे तसेच संपूर्ण युरोपात त्यांनी अनेक चित्रपट प्रशिक्षण शाळांमधून मार्गदर्शन आणि अध्ययन केले आहे .
सत्यजित रे, भारतात आधुनिक चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सकस दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जगभरातल्या चित्रपट रासिईक समीक्षकांमध्ये त्यांचे अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांचे चित्रपट- द अप्पू ट्रायोलॉजी, द म्युझिक रूम, इत्यादीमुळे भारतीय चित्रपटाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले असून, आजही त्यांच्या कलाकृती तेवढ्याच लोकप्रिय आहेत.
यंदाच्या वर्षात सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. या निमित्ताने, इफ्फी जीवनगौरव पुरस्काराला, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे.
या सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021, हा पुरस्कार अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान केला. समाजातील विविध स्तरांमधील चित्रपट रसिकांच्या अनेक पिढ्यांना आपल्या सौदर्यांने आणि अभिनयाने भुरळ घालणाऱ्या या दिग्गज अभिनेत्रीने हा पुरस्कार स्वीकारताना, इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल महोत्सवाचे आभार मानले. या वर्षाचा भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021 हा पुरस्कार स्वीकारत असताना मला अतिशय आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या. तरुण आणि उदयोन्मुख प्रतिभावंतांच्या प्रतिभेला न्याय देण्यासाठी ‘उद्याचे 75 सर्जनशील प्रतिभावंत’ या स्पर्धेच्या माध्यमातून करत असलेल्या प्रयत्नांबद्दल या ज्येष्ठ अभिनेत्रींनी इफ्फीची प्रशंसा केली. आपल्या सर्जनशील तरुणांना या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन इफ्फी अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष श्री प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.
देश आपल्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असल्याच्या पार्श्वभूमीवर,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ध्वज देशातील प्रत्येक राज्यात फडकत असताना, विशेष अतिथी म्हणून इफ्फीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून 75 युवा उदयोन्मुख चित्रपटकारांची “उद्याची 75 सर्जनशील मने “ उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
या 75 उदयोन्मुख कलावंतांमध्ये भारतातील अनेक लहान शहरे आणि नगरांमधून निवडण्यात आलेल्या गुणी कलावंतांचा समावेश आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली. भारतातील 23 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधून ते इफ्फीमध्ये आले आहेत. त्यामध्ये आसाम आणि मणीपूर या ईशान्येकडील राज्यांमधील पाच जणांचा आणि जम्मू आणि काश्मीरमधील एकाचा समावेश आहे. हे सर्व 75 तरुण गुणवंत भारतातील विविध राज्यांमधून निवडण्यात आले आहेत.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले, “ भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना आम्ही पहिल्यांदाच 75 तरुण उदयोन्मुख गुणवंतांची निवड करणार आहोत आणि त्यांना मार्गदर्शन उपलब्ध करणार आहोत. त्यांची निवड प्रमुख परीक्षक आणि निवड परीक्षकांकडून अतिशय बारकाईने केलेल्या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.”
यामध्ये निवडण्यात आलेला सर्वात तरुण उमेदवार केवळ 16 वर्षांचा आहे, बिहारमधील 16 वर्षांच्या आर्यन खानची निवड त्याच्या चित्रपट दिग्दर्शनातील कौशल्यासाठी झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या ज्युरीने निवडलेल्या 75 तरुण सर्जनशील कलाकारांचे अभिनंदन करून मंत्र्यांनी सांगितले केले की, हे चित्रपटकार, अभिनेते, गायक, पटकथा लेखक आणि इतरांना त्यांची सर्जनशीलता जगप्रसिद्ध कार्यक्रमात प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील सरकारचा उद्देश आहे.
महोत्सवासाठी सर्व अतिथी आणि प्रतिनिधीना आपल्या शुभेच्छा देतांना गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, की साहित्य, कला आणि चित्रपटांचा आपल्या देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यात महत्वाचा वाटा आहे.
या उद्घाटन समारंभाला गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, एल मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच, चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार, सलमान खान, रणवीर सिंह, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि श्रद्धा कपूर यांच्यासह चित्रपटसृष्टीतले तारे-तारका यावेळी उपस्थित होत्या.
चित्रपट रसिकांसमोर आपले मनोगत मांडतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतातील आणि जगभरातीलच सर्व चित्रपट निर्मात्यांना इफ्फीमध्ये सहभागी होण्याची आग्रही विनंती केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतला,चित्रपटसृष्टीतले विविध रंग एकत्रित दाखवणारा हा सोहळा असून सर्वांनी इथे या, आणि या सोहळ्याचा भाग व्हा, असे आमंत्रण त्यांनी दिले”.
चित्रपटासाठी लागणा-या सर्व प्रकारच्या साहित्य-सामुग्रीच्या निर्मितीचे ऊर्जाकेंद्र भारताला बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी विशेषतः प्रादेशिक चित्रपट महोत्सवांचा सहभाग वाढता राहील यावर आमचं भर आहे. त्याचबरोबर आमच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यात येणार आहे; आणि हे तंत्रज्ञान हाताळण्यामध्ये युवापिढी अतिशय कुशल आहे, हे लक्षात घेऊन चित्रपट निर्मितीनंतरच्या प्रक्रियेमध्ये भारताला जगामध्ये आघाडीचे केंद्र बनविण्यासाठी सरकारने दृढनिश्चिय केला आहे. चित्रपट निर्मिते आणि चित्रपटप्रेमींचे त्याचबरोबर चित्रपट आणि महोत्सवांचे सर्वांच्या पसंतीचे गंतव्यस्थान भारताला बनविण्याचे आमचे ध्येय आहे!”
जागतिक चित्रपटाच्या नकाशावर इफ्फीची भूमिका आणि उद्दिष्ट यांच्याविषयीच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना अनुरागसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘ चित्रकलेची उत्कृष्ट मांडणी करणा-या जगातल्या चित्रपटांना एक संयुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे इफ्फीचे उद्दिष्ट आहे. विविध देशांची संस्कृती, त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक आचारसंहिता यांच्याविषयी अधिक चांगल्या पद्धतीने माहिती घेणे, त्यांची चांगली ओळख सर्वांना करून देणे आणि जगभरातल्या चित्रपट क्षेत्रातल्या व्यक्तींबरोबर मैत्रीपूर्ण, सौहार्दाचे संबंध निर्माण करून एकमेकांना सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.’’
इफ्फीविषयी सरकारचे ‘व्हिजन’ नेमके काय आहे, याची माहिती देताना मंत्री म्हणाले, ‘‘ आमच्या सरकारच्या दृष्टीने इफ्फी काही एखाद्या कार्यक्रमापुरतेच मर्यादित नाही. ज्यावेळी भारत स्वातंत्र्याचे 100 वे वर्ष साजरे करणार आहे, त्यावेळी इफ्फीचे स्वरूप कसे असावे, याचाही विचार केला गेला आहे.
प्रथमच, प्रमुख ओटीटी मंच भारताच्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहेत आणि त्याबद्दल प्रचंड आनंद आहे असे अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, “मला हे सांगताना आनंद होत आहे की, प्रथमच इफ्फीने ओटीटी मंचांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
''इफ्फीबरोबर प्रथमच ब्रीक्स चित्रपट महोत्सवाद्वारे 5 ब्रीक्स राष्ट्रे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहेत, असे सांगत यावर्षी इफ्फिमध्ये काही अनोख्या उपक्रमांची भर पडली आहे, असे ठाकूर म्हणाले.
52 व्या इफ्फीसाठी आलेले प्रतिनिधी आणि पाहुण्यांचे स्वागत करतांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवंगत डॉ मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. पर्रीकर मुख्यमंत्री असतांना पहिल्यांदाच ईफ्फीचे यजमानपद गोव्याला मिळाले होते. त्यानंतर, सलग 17 वर्षे इफ्फी या समुद्रकिनारी असलेल्या पणजी शहरात साजरा होतो आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांत, केंद्र सरकाच्या समर्थनाने चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात, आत्मनिर्भर होण्याचे गोव्याचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यावेळी उपस्थित होते ते म्हणाले “इफ्फीमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिमत्ता समजून घेणे आणि जागतिक चित्रपटांचे कौतुक शक्य होत आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली चित्रपटनिर्मितीचे एक जागतिक पसंतीचे स्थान बनण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.”
माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा यावेळी म्हणाले की, इफ्फी हा 50 वर्षापेक्षा जास्त काळाचा समृद्ध वारसा असलेला देशातला सर्वात मोठा आणि सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सव आहे. इफ्फीच्या नऊ दिवसांच्या काळामध्ये या महोत्सवात एकाच ठिकाणी देशातल्या आणि जगभरातल्या सर्वोत्तम चित्रपटांचा आस्वाद घेता येतो.’’
अद्याप कोविड-19 चे आव्हान असतानाही यंदा हा महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे, असे सांगताना सचिवांनी स्पष्ट केले की, यंदा मिश्र स्वरूपात चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले असले तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त देशांतून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी 69 देशातून चित्रपट आले होते, यंदा 96 देशांमधून आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावरूनच आम्ही कोविड संकटाच्या आव्हानाचा सामना करीत असल्याचे दिसून येत आहे. इफ्फीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व प्रमुख ओटीटी मंचाचा सहभाग या महोत्सवात होत असल्याचे सचिव चंद्रा यांनी यावेळी सांगितले.
महोत्सवासाठी सर्व अतिथी आणि प्रतिनिधीना आपल्या शुभेच्छा देतांना गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, की साहित्य, कला आणि चित्रपटांचा आपल्या देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यात महत्वाचा वाटा आहे.
पहिला ब्रिक्स चित्रपट महोत्सव
प्रथमच, पाच ब्रिक्स राष्ट्रांचे चित्रपट इफ्फीसोबत ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून दाखवले जातील. ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारत हे पाच देश 52 व्या IFFI चे फोकस देश आहेत. कंट्री ऑफ फोकस हा एक विशेष विभाग आहे जो त्या विशिष्टदेशाची चित्रपट संबंधी उत्कृष्टता आणि योगदान यांचा सन्मान करतो.
इफ्फी 52 चा प्रारंभ झाला स्पॅनिश संगीताचा आनंद देणाऱ्या ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(El Rey de Todo El Mundo) च्या आंतरराष्ट्रीय प्रिमियरने आशियामधील सर्वाधिक जुन्या आणि भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे एका संगीतमय चित्रपटाच्या प्रदर्शनाने. ही सुरुवात नक्कीच संगीतामधील सामर्थ्याविषयी मानवाला असलेला जिव्हाळा आणि परस्परांमध्ये बंध निर्माण करून त्यांची जोपासना करण्याची अमर्याद क्षमता यांची प्रचिती देणारी ठरेल. कारण 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे, एका संगीत सोहळ्याच्या आयोजनावर आधारित असलेल्या ‘ द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(El Rey de Todo El Mundo) या स्पॅनिश म्युझिकल ड्रामाने. कार्लोस सौरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. मेक्सिको आणि स्पेन यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे मेक्सिको आणि स्पेन या दोन्ही देशांना कलेच्या माध्यमातून जोडण्याचा आणि या दोन्ही देशांमध्ये एकेकाळी असलेल्या संबंधांचे संगीत आणि नृत्याचे नव्या आणि आधुनिक प्रकारांमध्ये मिश्रण करून पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.
इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी एनएफडीसी फिल्म बाजारविषयी माहिती देणारी एक चित्रफीत ही जारी केली.
पणजीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण रंगारंग सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आणि सूत्र संचालक अभिनेता मनीष पॉल यांनी संयुक्तपणे केले. प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि रणवीर सिंग यांच्यासह चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार या भव्य सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला सिद्धार्थ आनंद, मधुर भांडारकर, समंथा रुथ प्रभू, मनोज बाजपेयी, खुशबू सुंदर, रवी कोट्टारकारा, राज निदिमोरू, कृष्णा डीके इत्यादींसह प्रसिद्ध चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शकांची उपस्थिती होती.
येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत चालणार्या 52 व्या इफ्फी मध्ये, 12 जागतिक प्रीमियर्स, 7आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 26 आशियाई प्रीमियर्स आणि 64 भारतीय प्रीमियर्ससह 73 देशांतील 148 चित्रपट आंतरराष्ट्रीय विभागात दाखवले जातील.
व्हेनिस चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार विजेत्या जेन कॅम्पियन यांनी दिग्दर्शित केलेला ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाची ‘मिड फेस्ट फिल्म’ म्हणून निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शक असगर फरहादी यांचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार विजेता ‘ए हिरो’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
गमावलेल्या ता-यांना श्रद्धांजली
इफ्फीच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये चित्रपट क्षेत्राने आपल्या ज्या ता-यांना गमावले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. यंदाच्या आवृत्तीमध्ये बर्ट्रांड टवेर्निअर, ख्रिस्तोफर प्लमर, जीन-क्लूड कॅरिएर आणि जीन पॉल बेल्मॉन्डो यांना मान्यवरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातले महान दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता, अभिनेते दिलीप कुमार, अभिनेता नेदुमुडी वेणू, पुनीत राजकुमार, संचारी विजय, दिग्दर्शिका सुमित्रा भावे, अभिनेत्री सुरेखा सिक्री, चित्रपट संपादक वामन भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
मोठ्या रूपेरी पडद्यावरचे पहिले जेम्स बाँड सर शान कॉनेरी यांना विशेष आदरांजली या महोत्सवामध्ये वाहण्यात येणार आहे.
रेट्रोस्पेक्टिव्ह
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात, सुप्रसिद्ध हंगेरियन चित्रपट निर्माते, बेला टा यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यांच्या चित्रपटांबी बर्लिन, कान्स आणि लोकार्नो अशा नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात मानसन्मान मिळवले आहेत.
बेला टा यांचची चित्रपटनिर्मितीची स्वतःची प्रभावी शैली आहे, ज्यामुळे, हा चित्रपट त्यांचाच चित्रपट बनून जातो.
याच विभागात, रशियन चित्रपट निर्माते आणि रंगभूमी दिग्दर्शक, आंद्रेई कोन्चालोव्ह्स्की यांचेही चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यांच्या चित्रपटांनाही विविध महोत्सवात गौरवण्यात आले आहे, ज्यात कानच्या ग्रां प्री विशेष ज्युरी सन्मानाचाही समावेश आहे. त्याशिवाय FIPRESCI पुरस्कार, दोन सिल्व्हर लायन्स पुरस्कार, तीन गोल्डन ईगल पुरस्कार, आणि एका प्राईमटाईम एमी पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत.
* * *
Jaydevi PS/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773683)
Visitor Counter : 314