माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जर संगीत हे प्रेमाचे खाद्य असेल तर तुमची चित्रपटांवरील प्रेमाची भूक ‘ द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ ने भागवा
इफ्फी 52 चा प्रारंभ होणार स्पॅनिश संगीताचा आनंद देणाऱ्या ‘द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(El Rey de Todo El Mundo) च्या आंतरराष्ट्रीय प्रिमियरने
पणजी, 19 नोव्हेंबर 2021
आशियामधील सर्वाधिक जुन्या आणि भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे एका संगीतमय चित्रपटाच्या प्रदर्शनाने. ही सुरुवात नक्कीच संगीतामधील सामर्थ्याविषयी मानवाला असलेला जिव्हाळा आणि परस्परांमध्ये बंध निर्माण करून त्यांची जोपासना करण्याची अमर्याद क्षमता यांची प्रचिती देणारी ठरेल. कारण 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे, एका संगीत सोहळ्याच्या आयोजनावर आधारित असलेल्या ‘ द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(El Rey de Todo El Mundo) या स्पॅनिश म्युझिकल ड्रामाने. कार्लोस सौरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. मेक्सिको आणि स्पेन यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे मेक्सिको आणि स्पेन या दोन्ही देशांना कलेच्या माध्यमातून जोडण्याचा आणि या दोन्ही देशांमध्ये एकेकाळी असलेल्या संबंधांचे संगीत आणि नृत्याचे नव्या आणि आधुनिक प्रकारांमध्ये मिश्रण करून पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.
मेक्सिकन कोरिओग्राफर साराच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. साराला तिच्या पूर्वाश्रमीचा पती आणि रंगमच दिग्दर्शक असलेल्या मॅन्युएल जी याने एका नव्या म्युझिकल शो ची निर्मिती करायला निमंत्रित केले आहे. या चित्रपटात इनेस(ऍग्नेस) नावाच्या एका तरुणीची देखील कहाणी आहे जी एक उदयोन्मुख कलाकार आहे आणि तिचे वडील आणि स्थानिक गटांना तोंड देत आहे.
दोन देशांमधील संबंधांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या चित्रपटात दोन्ही देशांच्या कलाकारांची आणि नर्तकांची मांदियाळी आहे. आना दे रेगेरा, मानुएल गार्सिया रुल्फो, दामिएन अल्कासार, एनरिके आर्स, मानोलो, कार्दोना, आइसाक हेर्नान्देस आणि ग्रेता एलिखोन्दो यांनी यात भूमिका साकारल्या आहेत.
अतिशय उत्तमोत्तम चित्रकृतींचा समावेश असलेल्या या नऊ दिवसांच्या 52 व्या इफ्फी महोत्सवाचा प्रारंभ शोकांतिका, काल्पनिक कथा आणि वस्तुस्थिती यांचा मेळ असलेल्या संगीतमय मेजवानीने होत आहे. हा चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये हायब्रिड स्वरुपात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773335)
Visitor Counter : 184