भूविज्ञान मंत्रालय
गोव्यात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 चे आयोजन, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची घोषणा
गोव्यातील 5 हजार विद्यार्थी तीन कार्यक्रमांच्या माध्यमातून करणार जागतिक विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
Posted On:
16 NOV 2021 3:55PM by PIB Mumbai
पणजी, 16 नोव्हेंबर 2021
गोव्यात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 चे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज केली. केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान भारती आणि राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन संस्थेने गोवा सरकारच्या सहार्याने आयआयएसएफचे आयोजन केले आहे.
राज्यात अशा प्रकारच्या विज्ञान महोत्सवाचे आयोजन होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे विद्यार्थी आणि जनसामान्यांमध्ये विज्ञानाची रुची निर्माण होऊन संशोधन आणि नवोन्मेषाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आयआयएसएफ 2021 मध्ये गोव्यातील पाच हजार विद्यार्थ्यांच्या तीन उपक्रमांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. तर 7,000 विद्यार्थी पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टींग) मध्ये सहभागी होत संदेश देणार आहेत. तसेच महोत्सवात विद्यार्थ्यांना जगातील सर्वात मोठी दुर्बीण पाहण्याची संधी मिळणार आहे. तिसऱ्या घटनेत विद्यार्थी गगनयान रॉकेटची प्रतिकृती तयार करणार आहेत.
यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना ‘विज्ञानातील सर्जनशीलता साजरी करणे’ ही आहे. आयआयएसएफ 2021 मध्ये भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनासह एकूण 12 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने महोत्सवातील कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी कोविड-19 महामारीमुळे महोत्सव आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यावर्षी 10 ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला महोत्सव आभासी आणि प्रत्यक्ष स्वरुप असा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. महोत्सवात 2,000 पारंपरिक कारागीर आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून विज्ञानविषयक भूमिका मांडणार आहेत. महोत्सवात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772301)
Visitor Counter : 216