अर्थ मंत्रालय
आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत हे जीएसटीचे उत्साहवर्धक संकलन दर्शविते : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, डॉ. भागवत कराड
पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे उद्घाटन
Posted On:
11 NOV 2021 5:38PM by PIB Mumbai
अपेक्षित 1 लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलनापेक्षा आता 1.30 लाख रुपयांचे जीएसटी संकलन होंताना दिसत आहे, यावरून आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत, हे दिसून येते.आर्थिक समावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवत कराड यांनी पुण्यात सांगितले.महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एमटीपीए), अखिल भारतीय कर व्यावयिक महासंघ (एआयएफटीपी), महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर व्यावसायिक संघटना (जीएसटीपीएएम) आणि उत्तर महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एनएमटीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेमध्ये ते बोलत होते.
मंत्री म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी कोविडपासून प्रतिबंधासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या परिषदेत वस्तू आणि सेवा कर अंतर्गत अपील, प्राप्तिकराचे फेसलेस निर्धारण यांसारख्या अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अशी परिषद नियमितपणे आयोजित करणे ही एक स्वागतार्ह पद्धत आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी सांगितले.
“करदाते हे राष्ट्रनिर्माते आहेत'' हे .आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अगदी बरोबर म्हटले आहे. 7 वर्षांपूर्वी 17 लाख कोटींचा रुपयांचा असलेला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपटीने वाढला आहे आणि प्रामाणिक करदात्यांमुळेच हे शक्य झाले. आणि कर व्यावसायिक हे अनुपालनासाठी मुख्य प्रेरक आहेत, असे श्री. कराड यांनी सांगितले.
श्री. कराड पुढे म्हणाले की, चार वर्षांपूर्वी जेव्हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला तेव्हा त्याच्या रचनेत काही त्रुटी होत्या. पण हळूहळू कर व्यावसायिकांचे अभिप्राय आणि सूचनांमुळे या समस्या दूर केल्या जात आहेत. नव भारत आरोग्य, संपदा , पायाभूत सुविधा ह्यांनी परिपूर्ण असेल आणि वित्त या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. आणि कर संकलनात पारदर्शकता आणणारी स्वच्छ आणि स्पष्ट व्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
यावेळी सीए योगेश इंगळे लिखित 'जीएसटी शास्त्र', स्वप्नील शाह लिखित 'जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर' व सीए वैशाली खर्डे लिखित 'अ प्रॅक्टिकल गाईड ऑन जीएसटी ऍक्ट' या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले.
यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष श्री. सतीश मगर, एमटीपीएचे चेअरमन श्री. नरेंद्र सोनवणे, एआयएफटीपीचे श्री. श्रीनिवास राव, एमटीपीएचे अध्यक्ष श्री. मनोज चितळीकर आदी उपस्थित होते.
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770991)
Visitor Counter : 266