पर्यटन मंत्रालय
'चित्रपट पर्यटन' या विषयावर मुंबईत उद्या चर्चासत्र आयोजित
पर्यटन मंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय संयुक्तपणे चित्रपट पर्यटनाला देणार वेग
चित्रपट निर्मात्यांना देशात विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी परिसंवादाचे आयोजन
Posted On:
07 NOV 2021 2:30PM by PIB Mumbai
मुंबई, 07 नोव्हेंबर 2021
पर्यटन मंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या एकत्रित सहयोगातून उद्या, दिनांक 8 नोव्हेंबर, 2021 रोजी संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून मुंबईतील ताज लँड्स एंड, येथे चित्रपट पर्यटनावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट पर्यटनाला चालना देण्याचे आणि देशांतर्गत विविध स्थळांना प्राधान्याने चित्रीकरणाची ठिकाणे म्हणून प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला चालना देणे, हे या परिसंवादाचे उद्दिष्ट आहे. यामुळे उत्पन्नात भर पडून, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीत वाढ होऊन संबंधित स्थळांच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला हातभार लागेल. केंद्रीय पर्यटन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचे सचिव या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
प्रेक्षकांच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलांवर सिनेमाचा प्रभाव पाहता, अलिकडच्या वर्षांत ,विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी ते एक समर्थ साधन म्हणून उदयास आले आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लोकप्रिय सिनेमांचे जिथे चित्रीकरण झाले आहे, त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढलेला दिसून आला आहे.

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी चित्रपटांमधील ही क्षमता ओळखून, चित्रपट शूटिंग आयोजित करण्यासाठी विविध राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींद्वारे पर्यटन उद्योगापर्यंत पोहोचणे हा या परिसंवादाचा उद्देश आहे. चित्रपट क्षेत्रातील बंधुभाव वाढविण्यासाठी तसेच देशभरात त्या क्षेत्रातील निर्णय घेणाऱ्या विशेष करून निर्मात्यांच्या लाभांसाठी, विविध राज्यांतून चित्रीकरणासाठी प्रोत्साहन आणि इतर निर्मिती प्रक्रियांबद्दल संवेदनशीलता आणि जागरुकता निर्माण करण्याला यामुळे चालना मिळेल.
या परिसंवादात, महाराष्ट्र, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि तामिळनाडू ही राज्ये आपापल्या राज्यांत चित्रपट पर्यटनाच्या या संधींबद्दल थोडक्यात सादरीकरण करतील. चित्रपट निर्मात्यांना देशातील विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यास प्रोत्साहन देणार्या घटकांवर निर्माता संघटना यासंदर्भात माहिती देतील. यानंतर विविध राज्ये, उद्योग संघटना आणि केंद्रीय पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांचे सचिव यांच्यात सहसंवाद सत्र होईल.
देशभरातील प्रोड्युसर्स ट्रेड असोसिएशन आणि फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स या परिसंवादात भाग घेणार आहेत. सहभागी संस्थांमध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI), इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिल (IFTPC), इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI), मोशन पिक्चर्स असोसिएशन, इंडिया, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने यांचा समावेश आहे. कर्मचारी (FWICE), इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA), अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ (ABMCM), वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन (WIFPA), फिल्म मेकर्स कंबाईन, एशियन सोसायटी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (AAFT), MX प्लेयर, अॅमेझॉन प्राइम, वूट, द साउथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स, कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स, केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोड्यूसर्स कौन्सिल, आसाम, फिल्ममेकर्स असोसिएशन ऑफ नागालँड (FAN), बंगाल फिल्म अँड टेलिव्हिजन चेंबर ऑफ कॉमर्स (BFTCC) सिक्कीम फिल्म कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ साउथ इंडिया, यांचा समावेश आहे.
पर्यटन मंत्रालयाचे सचिव श्री अरविंद सिंग; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव श्री अपूर्व चंद्रा; पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार; आणि चित्रपट सुविधा कार्यालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC),प्रमुख,श्री विक्रमजीत रॉय या संमेलनाला संबोधित करणार आहेत.
***
R.Aghor/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769848)
Visitor Counter : 287