संरक्षण मंत्रालय
एनडीए 141 व्या तुकडीचे दिमाखदार दीक्षांत संचलन संपन्न
Posted On:
29 OCT 2021 5:55PM by PIB Mumbai
पुणे, 29 ऑक्टोबर 2021
एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 141 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज म्हणजेच 29 ऑक्टोबर 2021 रोजी खडकवासल्याच्या खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC यांनी संचलनाचे निरीक्षण केले.
कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत यंदा दीक्षांत संचलनाच्या स्वरूपात अनुरूप बदल करण्यात आले होते. मात्र, उत्तीर्ण छात्रांच्या पालकांना या सोहळयाला आमंत्रित करण्यात आले होते. टीव्ही आणि सोशल मिडीयावरुन या समारंभाचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले.
या संचलनात, एकूण 1000 कॅडेट्स सहभागी झाले होते, त्यापैकी 305 कॅडेट्स 141 व्या तुकडीचे होते. यात 220 लष्कर , 41 नौदल आणि 44 हवाई दलाच्या छात्रांचा समावेश होता. त्याशिवाय, 19 छात्र भारताच्या मित्र राष्ट्रांमधील होते. (भूतान, ताझिकिस्तान, मालदीव व्हीएतनाम, टांझानिया, किर्गीस्तान, अफगाणीस्तान, श्रीलंका, म्यानमार, तुर्कमेनिस्तान, सुदान, उझबेकिस्तान). कॅडेट्सना आता आठ आठवड्यांची सत्र सुटी मिळणार असून त्यानंतर ते आपापल्या कमिशन पूर्व प्रशिक्षण अकादमीत जातील. तर इतर कॅडेट्स, 27 डिसेंबर 2021 रोजी एनडीए मध्ये परत रुजु होतील.
या वेळी विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या कॅडेट्सचा लष्कर प्रमुखांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अकादमी कॅडेट्कॅप्टन वंशी कृष्णा यांना सर्व विषयात प्रथम आल्याबद्दल राष्ट्रपती सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले . बटालियन कॅडेट कॅप्टन सिरीपुरापुलिखीत यांनी या अभ्यासक्रमात द्वीतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती रौप्य पदकाने गौरवण्यात आले. आणि बटालियन कॅडेट कॅप्टन हर्षवर्धन सिंग यांनी तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल, त्यांना राष्ट्रपती कांस्य पदकाने गौरवण्यात आले.
ऑस्कर स्कॉर्डनला प्रतिष्ठेच्या ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जनरल नरवणे यांनी पदक विजेत्यांसह सर्व यशस्वी कॅडेट्सचे अभिनंदन केले. तंत्रज्ञानात होणारे बदल आणि आधुनिक युद्ध पद्धतींचा अभ्यास करुन कायम स्वतःला सज्ज ठेवायला हवे, अशी सूचना त्यांनी केली. एनडीए च्या प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा म्हणजे, देशसेवेसाठीचे पहिले पाऊल आहे,असेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलांना लष्करी सेवेत येण्यासाठी पाठींबा दिल्याबद्दल, नरवणे यांनी सर्व छात्रांच्या पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तीन वर्षांच्या एनडीए प्रशिक्षणाच्या काळात आपल्या मुलांना सातत्याने पाठबळ दिल्याबाद्द्ल देखील त्यांनी पालकांचे कौतुक केले. महामारीमुळे उद्भवलेल्या अनेक संकटांवर मात करत, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी एनडीचेही अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना, जनरल नरवणे यांनी सांगितले की एनडीए मध्ये महिला कॅडेट्ससाठी दिले जाणारे प्रशिक्षण, पुरूषांप्रमाणेच त्याच दर्जाचे असेल.
* * *
M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767589)
Visitor Counter : 209