युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

नेहरु युवा केंद्र, गोव्याकडून 744 युथ क्लबच्या मदतीने प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता मोहीम


आज बेतालभाटी बीचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

Posted On: 23 OCT 2021 3:04PM by PIB Mumbai

गोवा, 23 ऑक्टोबर 2021

नेहरु युवा केंद्राच्या गोवा विभागाकडून देशपातळीवर सुरु असलेल्या स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत राज्यातही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज बेतालभाटी बीचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी रमेश गावकर आणि नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पुढाकाराने सध्या सुरु असलेल्या क्लीन इंडिया मोहिमेत नेहरु युवा केंद्राचे मोठे योगदान असल्याचा आनंद आहे, असे प्रकाश मनुरे याप्रसंगी म्हणाले. त्यांनी युवकांना गावागावांमध्ये जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. ऑक्टोबर महिनाअखेर या मोहिमेअंतर्गत देशभर 75 लाख किलो कचरा संकलन करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने एकल वापर प्लास्टीक संकलनावर भर देण्यात आल्याचे प्रकाश मनुरे यांनी सांगितले.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात स्वच्छता फार महत्त्वाची आहे. याच दृष्टीकोनातून राज्य सरकार विविध केंद्रीय संस्थांच्या मदतीने यावर युद्धपातळीने कार्यरत असल्याचे दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी रमेश गावकर म्हणाले.

राज्यात नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या मदतीला 744 युथ क्लब आहेत. त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि कचरा संकलन करण्यात येत असल्याचे नेहरु युवा केंद्राचे उपसंचालक कालिदास घाटवळ यांनी याप्रसंगी सांगितले.

नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यभर 1 ऑक्टोबरपासून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने प्लास्टीक कचरा संकलन, ऐतिहासिक आणि प्रमुख स्थळांचे सुशोभीकरण, पारंपरिक जलस्रोतांची निगा या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. राज्यात 3,809  विद्यार्थ्यांचा स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने क्लीन इंडिया कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. देशभर 744 जिल्ह्यातील सहा लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि युथ क्लबच्या माध्यमातून मोहीम राबवली जात आहे.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765958) Visitor Counter : 168


Read this release in: English