विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे (एनआयओ) माजी शास्त्रज्ञ डॉ राजीव निगम यांची आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
Posted On:
22 OCT 2021 7:27PM by PIB Mumbai
पणजी, 22 ऑक्टोबर 2021
अमेरिकेत पोर्टलँड, ओरेगॉन येथे 10-13 ऑक्टोबर, 2021 याकाळात कुशमन फाउंडेशन फॉर फॉरामिनिफेरल रिसर्चच्या वार्षिक संचालक मंडळाची बैठक झाली. यात डॉ. राजीव निगम (माजी मुख्य वैज्ञानिक, सीएसआयआर- राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था, गोवा, भारत), यांची 2022 च्या जे ए कुशमन पुरस्कारासाठी निवड झाली. फॉरामिनिफेरल अर्थात विशिष्ट समुद्री जिवांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा कुशमन फाउंडेशनचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेत कोलोरॅडो, डेन्व्हर येथे 2022 जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या सभेत ऑक्टोबर 9-12-2022 रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

जोसेफ ए कुशमन पुरस्काराची सुरुवात 1979 साली अमेरिकेतील कुशमन फाऊंडेशन फॉर फॉरॅमिनिफेरल रिसर्चने केली. फॉरमॅनिफेरॉलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संशोधकांना या माध्यमातून सन्मानित केले जाते. जगभरातील विविध देशांतील 41 शास्त्रज्ञांना आतापर्यंत हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ.राजीव निगम हे पहिले भारतीय आहेत. फॉरामिनिफेरा (मायक्रोफॉसिल) वरील उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विज्ञान आणि संशोधन परिषदेचा (सीएसआयआर) युवा वैज्ञानिक पुरस्कार, कृष्णन सुवर्णपदक, राष्ट्रीय खनिज पुरस्कार, एमआर साहनी व्याख्यान पुरस्कार आणि पॅलेओन्टोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मायक्रोपॅलेंटोलॉजीमध्ये उत्कृष्टतेसाठी भल्ला सुवर्णपदक, इंडियन जिओफिजिकल युनियनद्वारे एचएनएस सिद्दीकी व्याख्यान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्काराने याआधी डॉ निगम यांना गौरवण्यात आले आहे.
डॉ. निगम यांनी मनुष्यबळ विकासातही मोलाचे योगदान दिले असून ते गोवा विद्यापीठाचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक (सागरी विज्ञान आणि भूविज्ञान) आहेत. त्यांनी एसीएसआयआर (AcSIR) चे प्राध्यापक म्हणून 15 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी यशस्वी मार्गदर्शन केले आहे.
M.Chopade/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765834)
Visitor Counter : 261