कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आता वर्षभर घेता येणार मानकुरादचा आस्वाद, आयसीएआरचे संशोधन


राज्याला भाजीपाला क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचा केंद्रीय बटाटे संशोधन संस्थेशी सामंजस्य करार

Posted On: 04 OCT 2021 5:21PM by PIB Mumbai

पणजी, 4 ऑक्टोबर 2021

 

प्रसिद्ध मानकुराद आणि गोवन सॉस, कोळंबी/डक करीचा आस्वाद आता वर्षभर घेता येईल. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक प्रवीण कुमार यांनी आज संस्थेच्या जुने गोवा येथील कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याला भाजीपाला क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संस्थेने शिमला येथील केंद्रीय बटाटे संशोधन संस्थेसोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. यामुळे राज्यात भाजीपाला आणि चारा उत्पादन वाढण्यास मदत होईल.

सध्या राज्यात दररोज 320 टन भाजीपाला शेजारील राज्यांतून आयात करण्यात येतो. राज्यात आयसीएआरच्या मदतीने भाजीपाला लागवड केल्यास आयात कमी होऊन राज्य कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनेल. राज्यात लागवडीसाठी बटाट्याची पाच वाणे निवडण्यात आली आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात 18,000 एकर खजान जमीन उपलब्ध आहे. या जमिनीवर भातपिकाच्या विविध वाणांचे उत्पादन घेण्यात येईल. तसेच पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पिकांकडेही लक्ष देण्यात येईल. बहुविध पीक पद्धतीचा प्रसार करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात मदत होईल तसेच पोषण सुरक्षितता मिळेल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पोल्ट्री आणि ओरनामेन्टल शेतीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आयसीएआरकडून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती नियमितपणे देण्यात येत आहे. यासाठी 7,000 शेतकऱ्यांना वॉटसअपच्या माध्यमातून जोडण्यात आल्याचे संचालक प्रवीण कुमार यांनी सांगितले. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे तिन्ही हंगामात मिळून एकूण उत्पन्न 9 कोटी रुपयांनी वाढले आहे.  

आयसीएआरने विकसित केलेल्या गोवा काजू फेणी, खोर्ला मिरची आणि मानदोली केळी या पिकांना भौगोलिक मानांकन (GI) मिळाले आहे तर गोवा पोर्क सॉसला मानांकनाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

 

* * *

VK/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760833) Visitor Counter : 184


Read this release in: English