माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सत्यजित रे शताब्दी महोत्सव : फिल्म्स डिव्हिजनतर्फे 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान ‘कालातीत रे (‘Timeless Ray’) महोत्सव आणि वेबिनारचे आयोजन
Posted On:
25 SEP 2021 10:32PM by PIB Mumbai
सत्यजित रे आणि त्यांच्या चित्रपटांनी जागतिक सिनेमाच्या कालपटलावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. रे यांची सृजनात्मक सोंदर्यदृष्टी आणि सामाजिक परिस्थितीची प्रगल्भ जाणीव यातून त्यांच्या अनेक दर्जेदार कलाकृतींचा जन्म झाला आहे. या श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या अजरामर कलाकृतींचा पुन्हा एकदा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना देत, फिल्म डिव्हिजनने 25 ते 27 सप्टेंबर 2021 दरम्यान एक विशेष चित्रपट महोत्सव- ‘कालातीत रे’ (Timeless Ray) आणि रे- कल्पना, प्रतिमा आणि अभिव्यक्ती (Ray – Ideas, Images and idioms) या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले आहे. सत्यजित रे जन्मशताब्दी वर्ष महोत्सवाचा भाग म्हणून हे उपक्रम घेतले जाणार आहेत. हे चित्रपट फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर दाखवले जातील.
https://filmsdivision.org/ हे चित्रपट मोफत असून, गुगल मीट वरील वेबिनार मात्र निमंत्रितांसाठी आहे.
कालातीत रे या चित्रपट महोत्सवानंतर लगेचच, 27 सप्टेंबर रोजी हा वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये, रेखाचित्रकार देबाशिष देब, चित्रपट निर्माते साग्निक चटर्जी, चित्रपट अभ्यासक अमृत गंगर, समीक्षक अशोक विश्वनाथन, आदि मान्यवर सहभागी होणार आहेत. चित्रपट निर्माते आणि पूर्व प्रदेश निर्मिती केंद्राचे प्रमुख जोसी जोसेफ या वेबिनारचे सूत्रसंचालन करतील.
या महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट:
रबिन्द्रनाथ टागोर : (सत्यजित रे /फिल्म डिव्हिजन/54 Mins/1961) – या माहितीपटात रबिन्द्रनाथ टागोर यांचे जीवनकार्य दाखवले आहे.
द इनर आय (सत्यजित रे / फिल्म डिव्हिजन/20 Mins/ 1972) – कलाकार बेनोडे बेहारी मुखर्जी यांच्यावरील चित्रपट .
क्रियेटीव्ह आर्टिस्ट ऑफ इंडिया : सत्यजित रे (बी डी गर्ग / फिल्म डिव्हिजन /14 Mins/1974) - सत्यजित रे यांच्यावरील माहितीपट.
सत्यजित रे (श्याम बेनेगल/ फिल्म डिव्हिजन /132 Mins/1985) – श्याम बेनेगल यांनी सत्यजित रे यांची घेतलेली मुलाखत आणि त्यांच्यावरील चरित्रपट
सद्गती (सत्यजित रे /दूरदर्शन/52 Mins/1981) – समाजातील जातीव्यवस्थेवरील सत्यजित रे यांचा चित्रपट.
रे (गौतम घोष /बंगाल सरकार /105 Mins/1999) – रे यांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडवणारा चित्रपट
सुकुमार रे (सत्यजित रे / बंगाल सरकार / 29 Mins/1987) – आपले पिता आणि लेखक सुकुमार रे यांच्यावरील सत्यजित रे यांचा चित्रपट.
फेलुदा – (साग्निक चटर्जी /111 Mins/2019) -
https://filmsdivision.org/Documentary वर आपण या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकाल.
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758161)
Visitor Counter : 181