रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रिय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील उड्डाणपुलाचे भूमीपूजन संपन्न

Posted On: 24 SEP 2021 5:35PM by PIB Mumbai

पुणे, दि. 24 सप्टेंबर 2021

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमीपूजन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार दि. 24 सप्टेंबर 21 रोजी झाले. उप मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री श्री अजित पवार, खासदार श्री गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे , पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ,आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह विविध मान्यवर तसेच अधिकारी यावेळी उपस्थीत होते.

याप्रसंगी बोलताना श्री गडकरी यांनी पुण्यातील मेट्रोचे काम जलदगतीने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रिंग रोडचे भूमी अधिग्रहण राज्य सरकारने करावे आणि केंद्र सरकार या प्रकल्पाचा सर्व खर्च करून प्रकल्प पूर्ण करेल असेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील हवा, जल आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे वाढवायला हवे, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी गाड्यांचे हॉर्न हे भारतीय वाद्यांच्या आवाजाचे असावेत अशी सूचना केल्याचे श्री गडकरी यांनी सांगितले. पुणे शहरातील मेट्रो रेल्वे, विमानतळाचे विस्तारीकरण आणि जायका नदी सुधार प्रकल्प हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या येणार असून त्यासाठी इथेनाॅल पंपांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  तसंच पुणे ते बंगळूरु हा सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचा नवीन महामार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहीतीही त्यांनी दिली.  मुंबईतील नरिमन पॉईंट ते दिल्ली महामार्गाने जोडण्याचा विचार आहे. वरळी ते वांद्रे सि लिंक तयार झाला असून हा रस्ता वसई विरार पर्यंत नेण्यात येणार आहे. असेही श्री गडकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. वाघोली ते शिरूर या रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून तळेगाव ते अहमदनगर या मार्गासाठी 50 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

उप मुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले की, पुण्यासह संपूर्ण राज्यातील रस्तेविकासाला नवी दिशा आणि गती देण्याचे काम केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्य शासन करेल , राज्यातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी  लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच राज्याच्या रस्ते विकासाच्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

***

DM/SP/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1757760) Visitor Counter : 93


Read this release in: English