वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनांमुळे उद्योग स्नेही वातावरण; स्थानिक निर्यातदारांना चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून  संपुर्ण सहकार्य करु - नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला. आर यांचे प्रतिपादन


विदेश व्यापार महासंचालनालय आणि नागपूर जिल्हा उद्योग केंद्राद्वारे एक दिवसीय निर्यात संमेलन संपन्न

Posted On: 24 SEP 2021 3:15PM by PIB Mumbai

 

नागपूर, 24 सप्टेंबर 2021

केंद्र तसेच राज्य सरकारच्या व्होकल फॉर लोकल, एक जिल्हा एक उत्पादन तसेच आत्मनिर्भर भारत यासारख्या योजनांमुळे उद्योग स्नेही वातावरण निर्माण होत आहे.  स्थानिक निर्यातदारांना चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आपण आवश्यक तते सर्व सहकार्य करु, असे प्रतिपादन नागपूरच्या जिल्हाधिकारी   विमला. आर यांनी आज केलं. केंद्रीय  वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीने देशभरात देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  वाणिज्य सप्ताहाचे आयोजन केले जात असून  याच श्रुखंलेत नागपुरच्या नवीन सचिवालय भवन स्थित विदेश व्यापार महासंचालनालय  नागपुर  आणि  राज्य शासनाच्या नागपुर जिल्हा उद्योग केंद्राद्वारे  विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन- व्हीआयएच्या उद्योग भवन सिवील लाईन्स्थित   सभागृहामध्ये  एक दिवसीय निर्यात संमेलनाचे  आयोजन  करण्यात आले   होते.  याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून  त्या बोलत होत्या . याप्रसंगी विदेश  व्यापार महासंचालनालय नागपूरचे संयुक्त संचालक तसेच मिहान आर्थिक क्षेत्राचे विकास आयुक्त डॉ. वी सर्मन (आय.टी.एस.), जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष शिवकुमार राव, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, नागपूर उद्योग विभागाचे संयुक्त संचालक धर्माधिकारी उपस्थित होते.

भारत हा प्राचीन  काळापासून  मसाले, कापूस, रेशीम, मौल्यवान रत्ने यांच्या निर्यातीच्या बाबतीत अग्रस्थानी होता परंतु नंतर ब्रिटिशकालीन वसाहतवादामध्ये या निर्यातीचा ऱ्हास होत गेला.  भारताला निर्यातीची एक समृद्ध अशी परंपरा लाभलेली होती असे विचार  जिल्हाधिकारी विमला आरयांनी यावेळी मांडले.  नागपूरला  रस्त्यांची चांगली कनेक्टिविटी असून येथील विमानतळाची सुद्धा जोडणी याला मिळाली असून कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकोर), मिहान यांसारख्या संस्था नागपूर विभागात असून त्यांच्या  निर्यादारांना उपलब्ध असणा-या सेवांसंदर्भात  जनजागृती होणे आवश्यक आहे.  जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हेसुद्धा निर्यातदारांना मदत करण्यासाठी आहेत. या सर्व निर्यातदार संस्थांनी  परस्पर माहिती संकलनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी वाणिज्य उत्सवाद्वारे अशा सर्व घटकांना एका मंचावर आणून त्यांच्यात  चर्चा आणि संवाद घडवून आणण्याचा हा चांगला उपक्रम असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

विदेश व्यापार संचालनालय नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. सर्मन (आय.टी.एस.) यांनी भारत  हा निर्यात आधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमधून निर्यात होणे आवश्यक असल्याचे सांगताना प्रत्येक जिल्हा हा एक 'एक्सपोर्ट हब' -निर्यातीचे केंद्र बनला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली.   

इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कार्पोरेशन-वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव यांनी 'विदर्भातील निर्यातीच्या संधीयाविषयी विवेचन करताना सांगितलं कीविदर्भातील अतिरिक्त तांदळाचे उत्पादन हे संपूर्ण आफ्रिका खंडाला अन्न पुरवते इतके निर्यात मूल्य येथील तांदळात आहे.  विदर्भातील भाजीपाला सुद्धा  मध्य आशियाई देशात्त निर्यात होतो . नागपुर मधील  महाराष्ट्र दूससंवेदन उपयोजन संस्था (एमआरएसएसी‌) यांनी केलेल्या संशोधनानुसार विदर्भामध्ये 30 हजार जलसोत्र असून महाराष्ट्र पशु  वैद्यकीय  मत्स्य विद्यापीठ -माफ्सू  नागपूर यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार 'इनलॅंड फिशरीज  ऍक्वाकल्चर धोरण'   आखण्यात आले आहे. यामुळे  मध्य  आशियाई देशात सुद्धा  मत्स्यउत्पादनाच्या   निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार   आहेत . याशिवाय  विदर्भात  मोठ्या  प्रमाणात उत्पादन होणारे संत्रेवायगाव हळद भीवापूर मिरची यांनासुद्धा निर्यात मूल्य जास्त असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारतीय यांनी  भौगोलिक  सांकेतांक (जी.आय.)  प्राप्त  उत्पादने जसे भिवापुरी मिरची नागपुरी संत्रे आणि येथील  स्थानिक  उत्पादनांना 'वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट' या योजनेअंतर्गत  जगभरात निर्यात करता येईल असं सांगितलं. विदर्भात आटो इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान तसेच माहिती तंत्रज्ञान आधारित उद्योग,   संरक्षण यांत्रिकी  उद्योग  असून या सर्वांद्वारे निर्यात माहितीचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.  या सर्व घटकांना  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणा-या जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे आवश्यक ते सहकार्य मिळेल असेही भारती यांनी सांगितले. 

अमरावती व नागपूर येथील 11 जिल्ह्यातून निर्यातदार तसेच निर्यात संबंधित संघटना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  या संमेलनात  सहभागी  झाले, ज्यामध्ये निर्यातदारांनी आपल्या शंका प्रश्न सहभागी तज्ज्ञांना विचारले.

केंद्रीय वाणिज्य विभागाच्या वतीने 20 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात `वाणिज्य सप्ताह`   साजरा करण्यात येणार आहे. देशभरात अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी आहे. 

***

S.Rai/D.Wankhede/D.Dubey/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1757685) Visitor Counter : 71