रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
विदर्भातील स्थानिक परिस्थिती तसेच दुर्गम भागात असणाऱ्या समस्यावर सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था -व्हि.एन.आय.टी. सारख्या संस्थानी पुढाकार घ्यावा - नितीन गडकरी यांच आवाहन
व्हि.एन.आय.टी. संस्थेचा दीक्षांत समारंभाला मुख्य अतिथी म्हणून गडकरींनी संबोधित केले
Posted On:
15 SEP 2021 7:13PM by PIB Mumbai
नागपुर, 15 सप्टेंबर 2021
विदर्भासारख्या खनिज आणि नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असलेल्या प्रदेशात येथील स्थानिक परिस्थिती तसेच येथील गडचिरोली व मेळघाटसारख्या दुर्गम भागात असणाऱ्या समस्या यामध्ये सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्यासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था -व्हि.एन.आय.टी. सारख्या संस्थानी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केल . राष्ट्रीय अभियंता दिन आणि भारतरत्न सर एम. विश्वेशवरय्या यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील व्हि.एन.आय.टी. संस्थेचा 19 वा दीक्षांत समारंभ सोहळा आभासी पद्धतीने ऑनलाईन स्वरूपात आयोजित केला होता. यावेळी नितीन गडकरी मुख्य अतिथी म्हणून आभासी माध्यमाद्वारे बोलत होते. याप्रसंगी व्हि.एन.आय.टी. चे व्यवस्थापक आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर, प्रोफेसर पडोळे, वैज्ञानिक आणि उद्योगिक संशोधन परिषद- सीएसआयआरचे महाव्यवस्थापक डॉ. शेखर मांडे उपस्थित होते.

शासकीय संस्थाचे बांधकाम करताना तयार होणारे विस्तृत प्रकल्प अहवाल सुद्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तपासावेत आणि तशा सूचना शासनाला कराव्यात त्यामुळे त्यांचे व्यावसायिक ज्ञान वाढेल परंतु अशा सूचना मुळे वास्तूंचे बांधकाम सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. रस्त्याच्या बांधकामात वेस्ट प्लास्टिक, ज्यूट, फ्लाय अॅश तसेच तत्सम टाकाऊ पदार्थांचे वापर करून त्याचा डीपीआर व्हेरिफिकेशन, रस्ते सुरक्षा अशासारख्या उपक्रमात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सामील करून घेण्यास माझे मंत्रालय तयार आहे . वर्ल्ड बेस्ट अशा प्रॅक्टिसेस आपण वापरल्या पाहिजे ज्यामुळे प्रकल्प हा शाश्वत तसेच सक्षम अशाप्रकारचा राहील आणि त्याची गुणवत्ता सुद्धा कायम राहील, असे गडकरींनी यावेळी सांगितल.

विदर्भात विपुल प्रमाणात असणारा तांदूळ, बांबू याचे अतिरिक्त उत्पादन होत असते. संत्रा, कापूस पिकाचे सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात होते. या सर्वांचं व्यवस्थापन करून विदर्भाला समृद्ध बनण्यासाठी व्हि.एन. आय.टी. आपल्या तंत्रज्ञानाच्या आधारे चालना द्यावी. रस्ते अभियांत्रिकी मध्ये सुद्धा नागपुरातील अपघात कमी करण्यासाठी व्हि.एन. आय.टी. ने सहकार्य करावं, असेही त्यांनी सांगितले.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था -व्हि.एन. आय.टी. उत्कृष्ट अभियंत्रिकी शैक्षणिक संस्थानांमध्ये एनआयआरएफ रॅकिंग मध्ये 24 वे स्थान प्राप्त केल्याबद्दल नितीन गडकरी यांनी संस्थेचे विशेष कौतुक केले. व्हीएनआयटीच्या दीक्षांत समारंभाला भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अणु उर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांसारख्या दिग्गजांनी संबोधित केल्याचा उल्लेख करत आता यंदाच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असं त्यांनी सांगितलं. अभियंता दिवस ज्यांच्या नावाने सादर केला जातो त्या सर विश्वेश्वरय्या यांचे नाव व्हीएनआयटीला दिले गेले आहे याचाही मला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड संकटाच्या सावटात सुद्धा व्ही एन आय टी ने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त करुन दिल्या असेही त्यांनी सांगितल. केंद्र सरकार स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया सारख्या योजना युवकांच्या नवकल्पना आणि संकल्पना यात राबवून त्यांच्या या सर्व कल्पनांना चालना देण्याचं काम करत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

या दीक्षांत समारंभात एकूण ११३४ पदव्या प्रदान केल्या गेल्या असून यात, ४९ डॉक्टर ऑफ फिलॉसफी, ३३२ मास्टर ऑफ टेक्नलॉजी, ६० मास्टर ऑफ सायन्स, ६३४ विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी,आणि ५९ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर यांचा समावेश आहे.
* * *
S.Rai/D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755198)
Visitor Counter : 130