गृह मंत्रालय
हिंदी दिवस 2021 निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उपस्थित
हिंदीचा कोणत्याही स्थानिक भाषेशी मतभेद नाही, हिंदी भाषा ही भारतातल्या सर्व भाषांची सखी असून सहयोगानेच पुढे जाऊ शकते-अमित शहा
देशाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय सर्वोच्च मंचावर हिंदीत बोलतात, आपल्या भाषेत बोलतात तर आपल्याला कशाचा संकोच आहे
Posted On:
14 SEP 2021 7:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2021
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज हिंदी दिवस 2021निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी,2018-19, 2019-20 आणि 2020-21 मधे राजभाषा हिंदीमध्ये उत्कृष्ट काम करणारी मंत्रालये, विभाग आणि उपक्रमांना राजभाषा कीर्ती आणि राजभाषा गौरव पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी राजभाषा भारती पुस्तिकेच्या 160 व्या अंकाचे प्रकाशन केले.
आपण संविधानाचा स्वीकार केला त्याबरोबरच 14 सप्टेंबर 1949 ला या देशाची राजभाषा हिंदी राहील आणि लिपी देवनागरी राहील या निर्णयाचा स्वीकार केल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावेळी सांगितले. हे पुरस्कार अनेकांना प्रेरणा देतात आणि राजभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्साहदायी ठरतात. बिगर हिंदी पुरस्कार विजेत्यांचे विशेष अभिनंदन करत आपण ज्या प्रदेशातून येता त्या प्रदेशातल्या भाषेबरोबरच राजभाषाही त्या प्रदेशात पोहोचवण्याचे आपण उत्तम काम केल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. हिंदीचा कोणत्याही स्थानिक भाषेशी मतभेद नाही, हिंदी भाषा ही भारतातल्या सर्व भाषांची सखी असून सहयोगानेच पुढे जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
14 सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी, आपण आपल्या देशाच्या भाषा आणि राजभाषा यासाठी काय केले, त्यांच्या संवर्धनासाठी काय केले, विशेषकरून नव्या पिढीमध्ये, त्यांच्या रोजच्या वापरामध्ये आपल्या स्थानिक भाषांना मानाचे स्थान देण्यासाठी काय केले, याचे मूल्यमापन करण्याचा दिवस आहे. मागच्या काळाकडे पाहिले तर भाषेची लढाई देश हरेल असे वाटण्याचा एक काळ आला होता.आपण ही लढाई कधीच हरणार नाही,युगानुयुगे भारत आपल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करेल आणि त्याच बरोबर या भाषांना लवचिक आणि लोकोपयोगीही करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवघा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधानांनी, लाल किल्याच्या तटावरून अमृत महोत्सवानिमित्त ठेवलेल्या उद्दिष्टांपैकी एक लक्ष्य आत्मनिर्भर भारत हे आहे असेही त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर ही संज्ञा फक्त उत्पादन वा व्यापारी क्षेत्राला लागू नाही तर आत्मनिर्भर असणे भाषेच्या बाबतीतही लागू आहे आणि तेव्हाच आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. भाषांच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर बनलो नाही तर आत्मनिर्भर भारत हे म्हणणे निरर्थक आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय गृह व सहकारमंत्र्यांनी यावेळी सांगीतले की जेव्हा महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यचळवळ सुरू होती त्यावेळी महात्मा गांधीच नाही तर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, के एम मुन्शी अश्या अनेक नेत्यांनी स्वभाषेच्या वापरावर भर दिला. विनोबा भावेंना तर भारतीय भाषांची बाजू मजबूत करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले.
महात्मा गांधींनी तर राजभाषेला राष्ट्रीयत्वाशी जोडले होते. ते म्हणत की, या देशाचे चैतन्य हे आमच्या भाषांविना समजून घेता येणार नाही. गांधीजींचे हे वाक्य 1920 पासून 1947 पर्य़ंत जेवढे समर्पक होते तेवढेच आताही आहे असे अमित शाह म्हणाले. यासाठीच गांधीजींनी वृत्तपत्रे काढली, गुजराथ साहित्य परिषदेची निवडणूकही गांधीजींनी लढवली, साहित्यपरिषदेचे ते अध्यक्ष होते आणि गुजराती शब्दकोशाची रचनाही त्यांनी केली. एवढ्या मोठ्या आंदोलनात व्यग्र राहणारी व्यक्ती, स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करणारी व्यक्ती पण आपली स्वभाषा मजबूत व्हावी म्हणून त्यांनी केवढा वेळ दिला. यावरून आपल्याला हिंदी मजबूत करण्याचे महत्व समजून घेतले पाहिजे.
आपला देश अनेक विविधतांनी नटलेला आहे. अनेक प्रदेश, केंद्रशासित प्रदेशांचा आपापला गौरवास्पद इतिहास आहे आणि तो वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये आहे, असे अमित शाह म्हणाले. देशातील प्रत्येक भागाचा त्या त्या स्थानिक भाषांमध्ये असलेल्या इतिहासाचा अनुवाद तसेच भावानुवाद राजभाषेत झाला पाहिजे, जेणेकरून एकच भाग नाही तर संपूर्ण देश हा इतिहास वाचू शकेल, असेही ते म्हणाले. स्वराज्यासाठी महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांच्या नेतृत्वाखाली झालेला संग्राम, गुजराथेतील संग्राम याबद्दल जाणून घेणे हा देशातील प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि जर राजभाषेत अनुवाद झाले तरच हे शक्य आहे.
एकेकाळी भारतातील नेते परदेशी गेल्यावर जे वक्तव्य करत ते देशाला समजत नसे. जेथे जाऊ तेथे मग ते कोणतेही आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असो आपले वक्तव्य भारतीय भाषा वा राजभाषेतच देऊ याचा आरंभ अटलजींनी केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो रिवाजच करून टाकला याचा उल्लेख करत केंद्रीय गृह व सहकारमंत्री म्हणाले की, यामुळे राजभाषा बळकट होण्यास मोठे योगदान मिळाले.
MC/NC/VS/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754852)
Visitor Counter : 345