महिला आणि बालविकास मंत्रालय
पोषण अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकार पोचले मुंबईतील अल्पसंख्याक समुदायांच्या दारी
गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी
“आम्हाला नवा एक सुदृढ आणि निरोगी भारत घडवायचा आहे.”- केंद्रीय मंत्री मुखतार अब्बास नकवी
Posted On:
06 SEP 2021 5:33PM by PIB Mumbai
मुंबई, 6 सप्टेंबर 2021
समाजातील विविध घटकांमध्ये “पोषण अभियान” बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने “पोषण अभियाना”अंतर्गत सप्टेंबर 2021 हा महिना “पोषण माह” म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत विविध कार्यक्रमांत सहभागी होत पोषण जागरूकता सप्ताहाचे महत्व अधोरेखित केले. योग्य आहार आणि पोषणाचे फायदे जाणून घेण्यासाठी मुंबईतील ख्रिस्ती, बौद्ध, मुस्लीम, पारशी, जैन आणि शीख समुदायांतील महिला तसेच गरीब आणि मागास भागातील महिला , त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या. गरजू महिला आणि कुपोषित बालकांना पोषण किट्सचे वाटप यावेळी करण्यात आले.
आज दिवसभर झालेल्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्ती, आणि पारशी समुदायांतील सदस्यांशी संवाद साधला. बांद्रा येथील अंजुमन-ई-इस्लाम कन्या शाळा येथे मुस्लीम समुदायाशी, बांद्रा येथील महात्मा गांधी सेवा मंडळ येथे जैन, शीख आणि बौद्ध समुदायांशी तर सायनच्या अवर लेडी उच्च माध्यमिक शाळेत ख्रिस्ती समुदायाशी तसेच दादर येथील दादर अथोर्नन संस्थेत पार्झर फाउंडेशन येथे पारशी समुदायाशी संवाद साधण्यात आला.
महिलांच्या समस्या आता सामाजिक प्रश्न झाल्या असून त्या मुख्य प्रवाहाचा भाग आहेत.
महिलांच्या समस्यांना पंतप्रधानांनी सामाजिक समस्येचे व्यापक रूप दिले असे सांगत केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी म्हणाल्या की पोषण अभियान हे केवळ महिला आणि बालविकास मंत्रालयाचे अभियान नसून हे समग्र सामाजिक अभियान आहे आणि यात मुख्तार अब्बास नक्वी यांच्या अल्पसंख्यक मंत्रालयाने सक्रीयतेने सहभागी होऊन या विषयाबाबत विविध अल्पसंख्यक समुदायांमध्ये जागृती करण्यासाठी हातभार लावला आहे.
कोरोनाच्या संकटग्रस्त परिस्थितीत देखील याबाबत 13 कोटी उपक्रम आयोजित आकाण्यात आले आहेत.यात अधिक वाढ होईल अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या पोषणात काय सुधारणा होत आहे याचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी कोणतीही साधने उपलब्ध नव्हती मात्र पंतप्रधानांनी देशभरातील सुमारे 10 लाख अंगणवाड्यांना विकास परीक्षण उपकरणे उपलब्ध करून दिली. त्याद्वारे प्रत्येक लाभार्थ्याला मिळालेल्या लाभांची नोंद ठेवण्यासाठी मोबाईलवर आधारित ट्रॅकींग प्रणाली सुरु केली. आजमितीला 9 कोटी लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषण विषयक दर्जाचे ट्रॅकींग सुरु आहे अशी माहिती इराणी यांनी दिली.
“पीएमएमव्हीवाय योजनेचे लाभ सर्व गरजू गर्भवतींपर्यंत पोहोचविण्याची सुनिश्चिती करण्याची गरज”
पंतप्रधान मातृ वंदना योजनेद्वारे सरकार गर्भवती महिलांच्या खात्यात थेट पैसे टाकत आहे जेणेकरून त्यांना लस, आहार इत्यादींची काळजी घेता येईल.”गर्भवती महिलेच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ महिलांची जबाबदारी न राहता संपूर्ण कुटुंबाची, समाजाची जबाबदारी व्हावी यासाठी सरकारने हे अभियान मंत्रालयापुरते सीमित न ठेवता केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालयाला यात समाविष्ट करून घेऊन केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह आज दिवसभर मुंबईत कोविड संबंधी नियमांचे पालन करत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत असे इराणी म्हणाल्या .
प्रशासकीय चौकटीत राहून गरीब घरातील गर्भवती महिलेला लसीकरण, नियमित तपासणी तसेच रुग्णालयाच्या आरोग्यपूर्ण तसेच सुरक्षित वातावरणात मूल जन्माला घालण्यासाठी मदत म्हणून काही रक्कम देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आणि त्यानुसार गेल्या 3 वर्षांच्या काळात 2 कोटी गर्भवती महिलांच्या बँक खात्यांमध्ये भारत सरकारच्या तिजोरीतून 8,800 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली आहे अशी माहिती इराणी यांनी दिली “. या योजनेचे लाभ सर्व गरजू गर्भवतींपर्यंत पोहोचविण्याची सुनिश्चिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली .
भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्व समुदायांच्या सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
आपल्या परिसरातील एखादी गर्भवती एखादे कुपोषित बालक असेल तर त्यांच्या समस्यांमध्ये मदत करून त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःची मानली पाहिजे. असे सांगत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्वांनी स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू तेव्हा एकही कुपोषित मूल असणार नाही” अशी शपथ घेण्याचे आवाहन श्रीमती इराणी यांनी विविध समुदायातील व्यक्तींना यावेळी केले.
“आपल्याला नव्या भारताची, सशक्त आणि निरोगी भारताची निर्मिती करायची आहे.”
यावेळी बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, पंतप्रधानांनी स्वच्छता आणि आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या 7 वर्षात सरकार मुलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वच्छता ही आता जनतेची सवय झाली आहे. पोषण अभियानाला एका क्रांतिकारक बदलाचे स्वरूप देण्याचे अभिनंदनीय काम केंद्र सरकार करत आहे असे नक्वी यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांमध्ये जनतेच्या आरोग्याशी, स्वास्थ्याशी तसेच सुखरूपतेशी संबंधित विषयांची जनजागृती करण्यासाठी कोणत्याही सरकारने क्रांती आणि अभियान कार्यक्रमाला परिणामकारक मोहिमेच्या स्वरुपात चालविलेले आपण कधीच पाहिले नाही. आता मात्र, सर्व जन प्रतिनिधी, राज्य सरकारे, केंद्रातील संबंधित मंत्रालये यामधील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हे पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी सहभाग घ्यावा आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी असा आदेशच पंतप्रधानांनी दिला आहे असे ते म्हणाले . हे अभियान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना अधिक सशक्त, निरोगी तसेच अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेलच पण त्याचबरोबर ज्या नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी देखील या अभियानाचा मोठा हातभार लागेल असे नक्वी यांनी सांगितले.
नक्वी पुढे म्हणाले "डिसीजन विथ डिलीव्हरी" हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा संकल्प आहे. मोदी सरकारने सर्वांना स्वस्त-सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी युद्धपातळीवर काम केले आहे.
महाराष्ट्र सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती चंद्रकांत ठाकूर; खासदार पूनम महाजन, गोपाल शेट्टी, मनोज कोटक आणि राहुल शेवाळे; आमदार एम. पी. लोढा आणि आशिष शेलार; केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव इंदेवार पांडे; केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव रेणुका कुमार; एनसीएम सचिव आणि एनएमडीएफसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक एस के देव वर्मन; केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहसचिव पल्लवी अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच अंजुमन-इ-इस्लामचे अध्यक्ष, डॉ.जहीर काझी; बॉम्बे पारसी पंचायत अध्यक्ष अरमायती तिरंदाज आणि सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील इतर मान्यवर मुंबईत विविध ठिकाणी पोषण अभियान जनजागृती मोहिमेला उपस्थित होते.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी यांनी आज सकाळी प्रथम मुंबईतील धारावी आयसीडीएस अर्थात एकात्मिक बाल विकास सेवा केंद्राला भेट दिली.हे केंद्र “स्नेहा”ही स्वयंसेवी संस्था शासनाच्या मदतीने चालविते. केंद्रीय मंत्र्यांनी या सेवा केंद्राच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांच्या निवासस्थानांना देखील भेट दिली. ईराणी यांनी या प्रसंगी पोषण अभियाना अंतर्गत गंभीर स्वरूपातील कुपोषित मुले, गर्भवती माता तसेच स्तनदा मातांना फळे आणि पोषण आहार किट प्रदान केले .
केंद्रीय मंत्री ईराणी यांनी यावेळी आयसीडीएस परिसरातील, डिजिटल बाहुली-बाहुला फळ्याचे देखील उद्घाटन केले. हा फळा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमाअंतर्गत गोळा होणाऱ्या जन्मआकडेवारीचे अद्यतन, परीक्षण आणि प्रदर्शन यांचे सादरीकरण करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन ईराणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी’ उत्तर वॉर्डच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात देखील सहभागी झाल्या.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
(Release ID: 1752589)
Visitor Counter : 406