संरक्षण मंत्रालय
पश्चिम नौदल कमांडकडून विजयी मशालीचे स्वागत
Posted On:
02 SEP 2021 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2021
1971 च्या भारत-पाक युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सध्या देशभर स्वर्णिम विजय वर्ष साजरे केले जात आहे. या उत्सवाचा भाग म्हणून विजय मशाल देशाच्या कानाकोपऱ्यात नेली जात आहे. यातील पश्चिम विभागाची मशाल काल म्हणजेच एक सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे पोहोचली. 15 पंजाब रेजिमेंटचे जवान ही मशाल सन्मानपूर्वक कार्यस्थळी घेऊन आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मशालीचे स्वागत केले. यावेळी तिन्ही सैन्यदलांचे वरिष्ठ अधिकारी, 1971 च्या युद्धात सहभागी झालेले ज्येष्ठ सैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आज, म्हणजेच 2 सप्टेंबर 21 रोजी ही विजयी मशाल मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड इथे नेण्यात आली. पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी गौरव स्तंभ स्मारकाजवळ समारंभपूर्वक ह्या मशालीचे स्वागत केले. कमांडर इन चीफ यांनी यावेळी या स्तंभस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन युद्धातील वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या प्रसंगानिमित्त पथसंचलन करुन सलामीही देण्यात आली.
या समारंभाच्या सांगतेनंतर, ही विजयी मशाल 22 व्या मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन, इथे नेण्यात आली. शौर्य आणि अतुल्य पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या या किलर स्क्वॉड्रनने, 1971 च्या युद्धात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. या किलर स्क्वॉड्रनच्या क्षेपणास्त्र बोटीनी डिसेंबर 1971 मध्ये कराची हादरवून सोडत आपले ‘किलर’ हे नाव सार्थ ठरवले होते. भारतीय नौदलाच्या याच वीरश्रीपूर्ण कारवाईची स्मृति म्हणून दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. आज झालेल्या समारंभाला किलर स्क्वॉड्रन मधील काही मान्यवर ज्येष्ठ नौसेनानी सहभागी झाले होते. या नौसेनानींनी या युद्धादरम्यान ऑपरेशन पायथन आणि ऑपरेशन ट्रायडंट मध्ये सहभाग घेतला होता.
आज झालेल्या सोहळ्यात व्हाईस ॲडमिरल आर हरी कुमार यांनी या सर्व ज्येष्ठ नौसैनिकांचा सत्कार केला. या नौसैनिकांनी आपल्या युद्धाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रीयर ॲडमिरल अतुल आनंद यांनी आभार प्रदर्शन केले आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी शत्रूशी दोन हात करण्यासाठी किलर स्क्वॉड्रन सदैव सज्ज असल्याच्या कटिबद्धतेचा उल्लेख केला.
M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751484)
Visitor Counter : 140