माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून फिल्मस डिव्हिजनकडून चित्रपट महोत्सव आणि वेबिनारचे आयोजन

Posted On: 22 AUG 2021 4:07PM by PIB Mumbai

मुंबई , 22 ऑगस्ट 2021

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले  आहे. फिल्म्स डिव्हिजनने 'राष्ट्राला सलाम' हा  एक आठवड्याचा कार्यक्रम 23 ते 29 ऑगस्ट, 2021 दरम्यान  आयोजित केला असून यात आभासी मंचावर चित्रपट महोत्सव आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत, ' ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस'  आणि 'रत्नज ऑफ इंडिया' या  ऑनलाईन चित्रपट महोत्सवांचे  आणि   'कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती' या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

' ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस' चे आयोजन 23 ते 25 ऑगस्ट 2021 या दरम्यान करण्यात आले असून   भारतातील महत्त्वाचे प्रकल्प, उद्योग आणि प्रतिष्ठित संस्थांवरील माहितीपट यात दाखवण्यात येणार आहेत.  महोत्सवात  भाक्रा- नांगल, हिराकुड आणि नागार्जुन सागर, ही धरणे, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, भाभा अणू  संशोधन केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्था(TIFR), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ( BHEL), नौवहन आणि तेल उद्योग, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था  (DRDO) आणि चांद्रयान व पीएसएलव्हीसारख्या अंतराळ प्रकल्पांच्या यशोगाथा दाखवण्यात येणार आहेत.

'राष्ट्राला सलाम' च्या दुसऱ्या भागात, सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आलेले विज्ञान, कला आणि संस्कृती क्षेत्रातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचे चरित्रपट दाखवून त्यांचे स्मरण केले जाईल. 'रत्नज ऑफ इंडिया'  महोत्सव 26 ते 28 ऑगस्ट, 2021 दरम्यान दाखवला जाईल. यात  प्रा.सी.व्ही. रमण, डॉ. एम. विश्वेश्वरय्या, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रा. सी. एन. आर. राव, सत्यजित रे, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, पं. रवीशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि पं.भीमसेन जोशी यांच्या चरित्रपटाचा समावेश आहे.

29 ऑगस्ट, 2021 रोजी 'कालौघात चित्रपट निर्मितीमध्ये तांत्रिक प्रगती' या  वेबिनारने  आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप होईल. वेबिनारमध्ये चर्चेनंतर   चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ  चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञ देशभरातील माध्यम क्षेत्रातल्या  विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

हे चित्रपट, https://filmsdivision.org/ à ‘Documentary of the Week’ आणि  https://www.youtube.com/user/FilmsDivision यावर 23 ते  28 ऑगस्ट, 2021 दरम्यान विनामूल्य दाखवण्यात येणार असून वेबिनारचे आयोजन गूगल मीटवर 29 ऑगस्ट रोजी (केवळ निमंत्रितांसाठी) करण्यात येणार आहे.

 

 

S.Thakur/S.Kulkarni/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1748052) Visitor Counter : 246


Read this release in: English