संरक्षण मंत्रालय
लष्कर, नौदल आणि हवाई दल प्रमुखांची खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट
Posted On:
21 AUG 2021 7:33PM by PIB Mumbai
भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या प्रमुखांनी, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी या आपल्या मातृसंस्थेला 20 आणि 21 ऑगस्टला एकत्र भेट दिली. तिन्ही संरक्षण सेवांचे प्रशिक्षण देणाऱ्या या सुप्रसिद्ध प्रबोधिनीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणारे तीन ही अधिकारी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 56 व्या तुकडीचेच प्रशिक्षणार्थी होते. ही अत्यंत दुर्मिळ आणि एकमेवाद्वितीय घटना आहे. याआधी, 1991 साली, तिन्हीस सेवादलांचे प्रमुख एकाच तुकडीचे प्रशिक्षणार्थी म्हणून एनडीए ( त्यावेळेचा सामाईक सेवा विभाग) इथे होते. आपल्या मातृसंस्थेला एकत्रित भेट देण्यामागच्या या विशेष कल्पनेमागे केवळ प्रबोधिनीमध्ये एकत्र शिकतांना निर्माण झालेले मैत्रीबंध अधिक दृढ करणे हाच हेतू नव्हता, तर या तीन-सेवा प्रशिक्षण संस्थेची ओळख असलेल्या तिन्ही दलांमधील सौहार्दाची, एकत्रितपणाची भावना अधिक दृढ करणे, हाही हेतू होता.
तिन्ही संरक्षण दलांसाठीच्या या संयुक्त प्रशिक्षण प्रबोधिनीच्या स्थापनेची कल्पना, 1945 साली, त्यावेळेचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल सर क्लाउड ऑचिनलेक यांच्या नेतृत्वाखालील समितीतून निर्माण झाली होती. आणि त्यानंतर प्रत्यक्ष अकादमीची स्थापना होऊन, 1949 साली, त्यावेळच्या तात्पुरत्या स्थानी, डेहराडून इथे, अकादमीचे कामकाज सुरु झाले. सहा ऑक्टोबर 1949 साली खडकवासला इथे या प्रबोधिनीची पायाभरणी झाली आणि 16 जानेवारी 1955 रोजी तिचे उद्घाटन झाले. आपल्या साठ वर्षांच्या दैदीप्यमान इतिहासात, या प्रबोधिनीतून प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी 13 लष्करप्रमुख, 11 नौदलप्रमुख आणि नऊ हवाईदल प्रमुख झाले.
कमांडन्ट आणि डेप्युटी कमांडन्ट यांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना सलाम करतांना तिन्ही सैन्यदल प्रमुख
अॅडमिरल करमबीर सिंग, PVSM, AVSM, ADC यांनी नौदलप्रमुख म्हणून 31 मे 2019 रोजी कार्यभार स्वीकारला. राकेश कुमार भदौरिया PVSM, AVSM, VM, ADC यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी आणि जनरल एम एम नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC यांनी लष्करप्रमुख म्हणून, 31 डिसेंबर 2019 रोजी आपला कार्यभार स्वीकारला.
यावेळी तिन्ही सैन्यदलप्रमुखांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करतांना नौदलप्रमुखांनी आधुनिक युद्धशास्त्राच्या नवनव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. आधुनिक लष्करी नेतृत्वाचे मूलभूत सिद्धांत समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी कॅडेट्सना दिला. सर्व प्रमुखांनी सध्या सुरु असलेल्या प्रशिक्षणाचा आणि प्रशिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांचा आढावाही घेतला.
तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या वतीने, नौदलप्रमुख आपले मनोगत व्यक्त करतांना, एनडीए
‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या स्मृतिस्थळी श्रद्धांजली अर्पण करतांना लष्करप्रमुख
‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या स्मृतिस्थळी श्रद्धांजली अर्पण करतांना हवाई दलप्रमुख
आपल्या भेटीदरम्यान तिन्ही सैन्यदलप्रमुखांनी ‘हट ऑफ रिमेमबरन्स’ या शाहिद स्मृतिस्थळी श्रद्धांजली वाहिली. एनडीए संस्थेतून, प्रशिक्षित होऊन गेलेल्या, आणि कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या हुतात्मा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. तसेच या प्रमुखांनी, आपापल्या सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवादही साधला. त्याशिवाय प्रशिक्षक, व्याख्याते आणि एनडीएतील कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची ही भेट एनडीएसाठी प्रेरणादायक आणि अभिमानाची भावना जागृत करणारी ठरली. या भेटीतून प्रशिक्षणार्थी त्यांच्या लष्करी करियरमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच, तिन्ही सेवादलांमध्ये सौहार्द आणि एकत्रितपणाची भावना वाढीस लागेल.
एनडीएच्या ऐतिहासिक सुदान ब्लॉक समोर तिन्ही सैन्यदलप्रमुख
***
Jaydevi PS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747894)
Visitor Counter : 486