अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून आयटीसी परतावा फसवणुकीचे मोठे प्रकरण उघडकीस

Posted On: 21 AUG 2021 11:47AM by PIB Mumbai

मुंबई, 21 ऑगस्ट 2021

वस्तू आणि सेवाकर  गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू) च्या मुंबई विभागाने इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी ) परतावा फसवणुकीचे एक मोठे प्रकरण उघडकीला आणले असून संतोष दोशीला अटक केली आहे.  संतोष दोशी  अमल ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड,  सी-क्लस्टर एक्स्पोट्रेड प्रा. लि.,  एकॉन क्रिस्टलमर्चंट्स प्रा. लि., मेटीक्युलस ओव्हरसीज प्रा. लि.,  निनाद ओव्हरसीज प्रा. लि., परीस  ओव्हरसीज प्रा. लि.,  व्हाईट ओपल एक्स्पोट्रेड प्रा. लि. या 7 कंपन्या  नियंत्रित आणि परिचालन करत होता. त्याने कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता बनावट इनव्हॉइसच्या जोरावर फसवून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले आणि निर्यातीवरील परतावा म्हणून 118 कोटी रुपयांचा दावा केला होता.

या आर्थिक फसवणूकीची पद्धती अशी होती की बनावट कागदपत्रांच्या आधारे झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अनेक डमी युनिट्स तयार करण्यात आली. त्यांनी छत्तीसगडमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अनेक शेल कंपन्यांना बनावट  आयटीसी दिला. तसेच  महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे  निर्यात करण्यासाठी अनेक युनिट्स तयार करण्यात आली, ज्यांना छत्तीसगड मधील कारखान्यांनी  निर्यात करण्यासाठी कथित बनावट माल पाठवला. निर्यात युनिट्स केवळ फसव्या पद्धतीने परतावा मिळवण्याच्या हेतूने तयार केली होती.

आर्थिक फसवणुकीच्या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला  पकडण्यासाठी, जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालय, मुंबईने संबंधित सीएचए, सीए, सीएस, प्रमुख व्यक्ती आणि मालवाहतूक फॉरवर्डर्स यांचा शोध घेतला आणि अनेक जबाब  नोंदवले. तपासात हे उघड झाले की, महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवासी  संतोष दोशी, जो  मेसर्स मासुमी ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडचा  व्यवस्थापकीय संचालक आहे, तो  प्रत्यक्षात या 7 निर्यातदार कंपन्यांचा प्रवर्तक आणि ऑपरेटर होता. त्याने आयटीसी रोख स्वरूपात मिळवण्यासाठी उत्पादकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत आणि  निर्यातदारांपर्यंत विविध व्यवहारांचा वापर करून एक जाळे  तयार केले.

संतोष दोशीला 17.08.2021 रोजी अटक करण्यात आली आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याला 2016 मध्येही मुंबई सीमाशुल्क विभागाने  अटक केली होती.

याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

***

S.Thakur/S.Kane/Cyadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747819) Visitor Counter : 250


Read this release in: English