सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत हिंगोलीतील 3 हजाराहून अधिक दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वितरण


दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सरकार कटीबद्ध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Posted On: 19 AUG 2021 4:30PM by PIB Mumbai

मुंबई, 19 ऑगस्‍ट 2021

 

ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत हिंगोलीत आयोजित "सामाजिक सक्षमीकरण शिबिराचे" केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आज उदघाटन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले मुंबईतून व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या माध्यमातून या शिबिरात सहभागी झाले होते. 

   

सध्या लागू असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन, दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करणारे आभासी ADIP शिबीर हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीतील वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुमारे 2.75 कोटींहून अधिक रुपयांच्या सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वितरण करण्यात आले. ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत हिंगोलीतील एकूण 3260 वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना सुमारे 6527 सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना मदत म्हणून देण्यात आलेल्या या एकवीस प्रकारच्या साहित्यांमध्ये ट्रायसिकल फोल्डिंग व्हीलचेअर, स्मार्ट कॅन, चष्मा, कृत्रिम दात आदींचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपले मंत्रालय दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी म्हणाले. कोविड-19 या काळातही सरकारच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधने आणि उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांना मदत करण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्याची सरकारची योजना असून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले.

दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी मदत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत 20 ते 25 लाखांहून अधिक दिव्यांगांना मदत करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले. दिव्यांगांचे भविष्य उज्वल करण्याची सरकारची जबाबदारी असून त्यासाठी समाजानेही साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. सरकारच्या विविध योजना तसेच कौशल्य प्रशिक्षण या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. कोविडची परिस्थिती निवळल्यानंतर मुंबईतही अशा प्रकारचे शिबिर भरवण्याचा विचार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.

 

* * *

S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1747379) Visitor Counter : 149


Read this release in: English