माहिती आणि प्रसारण मंत्रालय

स्वातंत्र्यदिन -2021 महोत्सवाचा भाग म्हणून फिल्मस डिव्हिजन तर्फे 'आजादि का अमृत महोत्सव चित्रपट महोत्सव'

Posted On: 14 AUG 2021 9:13PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑगस्ट 2021

फिल्म्स डिव्हिजन तीन दिवसीय आजादी का अमृत महोत्सव फिल्म महोत्सवासह देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिन  सोहळ्यात आपला सहभाग नोंदवणार आहे.  स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्य सैनिक यांच्यावर आधारित 20 माहितीपटांचे प्रसारण या चित्रपट महोत्सवांतर्गत होईल. फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावरून तसेच युट्युब वाहिनीवरून 15 ते 17 ऑगस्ट 2019 या कालावधीत हे माहितीपट प्रदर्शित केले जातील.

केंद्र सरकारच्या 'आजादी का अमृत महोत्सव'  या अद्वितीय उपक्रमाचा भाग म्हणून हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 'आजादी का अमृतमहोत्सव' हा भारताची 75 वर्षांमधील प्रगती आणि आपण भारतीय, आपली संस्कृती आणि यश यांची दैदीप्यमान ऐतिहासिक परंपरा यांचे स्मरण करण्याच्या उद्देशाने साजरा होणारा उपक्रम आहे.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला कलाटणी देणाऱ्या क्षणांवर आधारित निवडक माहितीपट यात समाविष्ट आहेत. यामध्ये 1857 मधील भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम ते गांधी युगाची पहाट, संपूर्ण स्वराज्याचे आवाहन, दांडी यात्रा, काळे पाणी आणि  स्वातंत्र्यानंतरचे संस्थानांचे विलिनीकरण अशा घटनांवरील माहितीपट या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केले जातील.

करोडो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या  योगदानामुळे भारताला स्वातंत्र्याच्या पहाटेचे सुवर्णक्षण अनुभवता आले. 'आजादी का अमृतमहोत्सव चित्रपट महोत्सव' चित्रपटांद्वारे अशा काही स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहणार आहे.

सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा , रामप्रसाद बिस्मिल , अश्फाक उल्ला खान, बाबा शाहमल , डॉक्टर गोपीनाथ बोर्डोलोई, बाघा जतीन, मातंगिनी हजारा, बंकिमचंद्र यांच्यावरील चरित्रपट प्रदर्शित होतील.  काही अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित चित्रपटही दाखवण्यात येतील. हनवंत सहाय, पंडित जयनंदन झा, शिवा गुरुनाथन, शांताराम वकील, मरिमुथ्थू चेट्टीयार कशा अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांवरील काही चित्रपटांचाही यात समावेश आहे.

'गांधी रिडिस्कव्हर्ड' हा  सध्याच्या  पार्श्वभूमीवर गांधीवाद आणि स्वदेशी ही समाज बदलाची साधने कशी ठरू शकतात यावर प्रकाश टाकणारा चित्रपट, या चित्रपट महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल.

हा चित्रपट महोत्सव 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2021 कालावधीत https://filmsdivision.org/ या संकेतस्थळावरून ‘Documentary of the Week’ या विभागाअंतर्गत प्रदर्शित होईल . याशिवाय  https://www.youtube.com/user/FilmsDivision या युट्युब वाहिनीवरून  दाखवण्यात येईल.

 

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745949) Visitor Counter : 218


Read this release in: English